Friday, January 20, 2023

वाळू आणि दगड..!


 

जॉन आणि जेम्स दोघे चांगले मित्र होते. त्या दोघांच्यात अनेक वेळा काही कारणांनी भांडणं होत असत, पण त्यांनी त्यांची मैत्री कधीच तोडली नाही. एकदा ते दोघे नोकरीच्या शोधात बाहेर पडले आणि पैसे कमावण्यासाठी बऱ्याच ठिकाणी फिरु लागले. त्यांनी अनेक स्थळे, गावं, खेडी, जंगले आणि समुद्रतटांना पार केले. पूर्ण यात्रे दरम्यान ते एक-दुसऱ्याला साथ देत राहिले.

 

एके दिवशी ते एका वाळवंटात पोहोचले. त्यांच्या जवळ अन्न आणि पाणी फार कमी राहिले होते. जॉन म्हणाला की, "आपण खायच्या वस्तू आणि पाणी पुढच्या प्रवासासाठी जपून ठेवायला हवे.” पण  जेम्स नाराज झाला कारण त्याला तहान लागली होती म्हणून पाणी प्यायचे होते. ते भांडायला लागले. जॉनने जेम्सला थप्पड मारली आणि नंतर ते तेथून गप्प होऊन पुढे निघाले. जेम्सने वाळूवर लिहिले, “माझ्या सर्वात चांगल्या मित्राने मला थप्पड मारली!”   

 

शेवटी ते एका हिरवळीच्या प्रदेशात (ओएसिस) पोहोचले. त्यांना फार आनंद झाला आणि त्यांनी पाण्यात खूप मस्ती केली. जेंव्हा ते पाण्यात मस्ती करत होते, तेंव्हा जेम्स अनावधनाने पाण्यात बुडू लागला. जॉन घाईने त्याच्याकडे गेला आणि त्याने त्याचा जीव वाचवला.

   

जेम्सने मित्राला मिठी मारून त्याचे आभार मानले. तेथे त्यांनी थोडा वेळ विश्रांती घेतली आणि पुढे जाण्याचा निर्णय घेतला.

  

ते जायला निघणार, तेव्हां जेम्सने दगडावर कोरले की, “आज माझ्या सर्वात चांगल्या मित्राने माझे प्राण वाचविले!”

 

तो जॉनला म्हणाला, "जेव्हां तू मला थप्पड मारलीस, तेंव्हा मी ते वाळूवर लिहिले.आता वाऱ्यामुळे,मी वाळूवर लिहिलेले पुसले गेले असेल.पणं जेंव्हा तू माझे प्राण वाचविलेस, तेव्हां मी ते  दगडावर कोरले.कारण ते कायमस्वरूपी आता तीथेच राहील.”

 

 

 

      श्री पाटील..

No comments:

Post a Comment