Saturday, January 21, 2023

ना खंत ना दुःख..!


घरच्या देव्हाऱ्याच्या तोरणाची निर्माल्याच्या दिशेने रवानगी होत असताना तुटलेल्या धाग्यातून ओघळून एक झेंडू खाली पडला. 

तो कालच्या इतका टवटवीत नसला, तरी अजूनही रंग-रूप राखून होता. 
थोडं निरखून पाहिलं त्याच्याकडे, तो तटस्थ होता. 
आपले जीवितकार्य संपल्याचा शोक त्याच्या पाकाळ्यांवर दिसत नव्हता. 

गडद केशरी रंग आपली शान टिकवून होता. 
हिरव्या देठाचा भाग असंख्य पाकळ्यांना सांधून होता. 
हार करताना अंतर्बाह्य गेलेल्या सुईच्या जखमा पोटात दडवून होता. 
धागा आरपार जाताना नाईलाजाने विभक्त झालेल्या पाकळ्या झेंडूची ओळख लेवून बाहेर पडल्या होत्या. कित्येकांच्या पायदळी तुडवल्या जाऊनही त्यांच्या सुकोमलतेत रागाचा, द्वेषाचा, सुडाचा लवलेश नव्हता. 
त्यांच्या ठायी भावना होती ती फक्त समर्पणाची ! 

एवढी सहनशक्ती, एवढा संयम, एवढं समर्पण करूनही आपल्या दातृत्वाची कुठेही वाच्यता न करता, त्याने आपला प्रवास पूर्ण केला होता...

फुल असूनही गंध नाही,
रूप असूनही गर्व नाही,
सण लोकांचा साजरा केला,
आता निर्माल्य झाल्याचेही दुःखं नाही...


                                                श्री पाटील..

No comments:

Post a Comment