Saturday, January 21, 2023

राधा ही बावरी..!


रंगात रंग तो श्यामरंग
पाहण्या नजर भिरभिरते
ऐकून तान, विसरुन भान
ही वाट कुणाची बघते
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनी
साद ऐकुनी होई
*राधा ही बावरी हरीची*
*राधा ही बावरी.....*

               बांदोडकरांच्या स्वप्नीलने गायलेल्या नि चंद्रशेखर सानेकरांनी लिहिलेल्या गाण्यानं साद घातली, की आपणही राधाकृष्णाच्या अनोख्या प्रेमानं राधेसारखे बावरे होतो. अभंगापासून ते फ्यूजनपर्यंत, उस्तादांच्या बंदिशीपासून ते *राधा ही बावरी* या नव्या गाण्यातल्या राधेच्या भक्तीचं आणि प्रीतीचं प्रतीक आपल्यावर विलक्षण भुरळ घालतं.

               या गाण्यातल्या ओळींचा जसा वेध घेऊ लागतो,श्रतसा राधा-कृष्णाच्या प्रेमसंबंधाची रंग, गंध, नाद आणि स्पर्शाच्या मार्गांनी नवी ओळख होते. त्या शब्दरुपांतून हिरव्या गर्दरानातली, सोनसळी पानांतली श्रावणसरींनी सचैल भिजलेली चारुगात्री राधा साकार होते. कृष्णाच्या बासरींत नादावलेली, मृदगंधानं भारावलेली राधा हरिदर्शनासाठी आतुरली आहे आणि त्यात हा उनाड वारा....कृष्णाच्या धीट अन् खट्याळ स्पर्शाची हुरहुर लावतो आहे. त्याच्या वेणूचे सूर सारखे खुणावत आहेत. बावरलेल्या नजरेनं, चिंब भिजलेली राधा त्या शामलवर्णी श्रीकृष्णाला तिथे शोधत आहे. तेवढ्यात, तो त्या कबतरुतळी साक्षात सामोरा येतो. राधेची पावले थबकतात, तोच हा मनमोहन, घनश्याम, ही त्याची सावळी तनु, त्याच्या डोईवरचं मोरपीस, अंगावरील रानफुलांच्या माळा, हाच तो वनमाळी.....हरपलेल्या चित्तानं राधा कृष्णाच्या स्वाधीन होते. त्याचे उष्ण श्वास आणि नसानसांतून ओसंडणारं प्रेम, त्याचा दिव्य स्पर्श....हे अलैकिक दृश्य पाहायला ढगाआडून चंद्र डोकावतोय. आपणही या रोमांचक अनुभवानं थरारतो. हे मिलन दोन मनांचं. माया आणि ब्रह्माचं....त्यातून विलक्षण ऊर्जा आपल्याला आयुष्यभर पुरुन उरणारी..



                                               श्री पाटील..

No comments:

Post a Comment