Saturday, January 21, 2023

आमचं हळदी कुंकू..!


हॅलो... पिंकी.. अग ऐक ना... 
- काय ग सुमे.. आहेस कुठे.. किती दिवसांनी कॉल केलास? मी जिवंत आहे का खात्री करायला केलास का ग मने? 

ए हॅलो... जरा तोंड आवर ग... जिवंत आहेस म्हणूनच केला असंच समज, पण गप्प बस आणि मी काय सांगते ऐक. 

- बोल बाई बोल... ऐकते, शाळेत असतानाही तुझीच दादागिरी आणि आताही तुझीच. बोल तू... 

हो, दादागिरीच, आता शांतपणे ऐक आणि नंतर तुझ्या 'सोसो' बाईंना पण सांग, तुला जमणार नसेल सांगायला तर मी येऊन सांगते त्यांना, तू माझ्याकडे हळदीकुंकवाला येणार आहेस म्हणून, बावळटासारखी 'छाछु बाई मी ज्याऊ क्याय' करत बसू नको.
रविवारी माझ्याकडे हळदीकुंकू आहे... फक्त आपले म्हणजे तू , मी, पद्मि, कविता, विभा, अर्पि, अंजु, आणि अजून तुझ्या ओळखीत कोणी आपल्या सारख्या असतील तर त्यांना ही सांग. किमान बारा जणी व्हायला हव्यात. 

- काय... काय ग बरी आहेस ना... एकदम हळदीकुंकू? हे गं काय नवीन खुळ? ते ही फक्त आपले?? 

हो, फक्त आपले, नवरे नसलेल्या, लग्न न केलेल्या किंवा घटस्फोट घेतलेल्या बायकांचे. चल ठेवते फोन अजून बाकीच्यांना कॉल करायचे आहेत.. 

पिंकी आणि मनी दोघी अगदी बालवाडीत पासून एकाच वर्गात आणि एकाच वाडीत रहाणाऱ्या, साहजिकच शाळेत जाणं-येणं, खेळ, अभ्यास... सर्व एकत्रच होत असे. बालपणाच्या आठवणी मागे ठेवून ते दिवस कधीच कापरासारखे उडून गेले.. या दोघींच्या बरोबर सर्वच मित्रमैत्रिणी मोठे होऊन आपापल्या मार्गाला लागले.. अनेक मैत्रिणी लग्न होऊन वेगवेगळ्या गावी गेल्या आणि अगदी मोजक्याच या गावात राहिल्या!
मनी.. म्हणजे मनीषा.. जन्मजात तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेली... कधी एखादी वस्तू-खेळणं हवं म्हणून हट्ट करावा अथवा रडावं लागलं नाही, प्रचंड लाडात पण शिस्तीत वाढलेली! दुःख म्हणजे काय याची सावलीही तिला कधी शिवली नाही.. अर्थात तिच्या लग्नापर्यंतच. त्या नंतर सासर अगदी घराजवळ व तितक्याच तोलामोलाचं मिळालं.. खरंतर तिने कॉलेजला असतानाच अगदी प्लॅनिंगकरून त्याला जाळ्यात ओढलं आणि लग्न ही केलं. तशी ती जात्याच कोणालाही न घाबरणारी त्यातही खानदानी श्रीमंतीमुळे वागण्यात आलेला थोडा बेदरकारपणा यामुळे घरच्यांचा विरोध असतानाही तिने स्वतःच्या मर्जीने लग्न केलं, तिच्याच जातीतल्या मुलाशी, ते ही 'मी आत्ता लग्न करायला जातेय दाखवा अडवून' असं चॅलेंज देऊन! त्यामुळे नंतर जरी घरच्या लोकांबरोबर संबंध पूर्ववत झाले तरी चुकलेल्या निर्णयाची तोशीष तिने कधी माहेरच्या लोकांना लागू दिली नाही. लग्नानंतर काही वर्षातच दारुत आकंठ बुडालेला नवरा म्हणजे गळ्यातील धोंड झाली तिच्या. त्यातच त्याच्या पैशासाठी एकीने याला जाळ्यात ओढला आणि तो ही नवीन फ्लॅट घेऊन तिच्यासोबत राहू लागला. हे कळताच सासऱ्यांना भरीस पाडून प्रॉपर्टीची वाटणी करून घेत त्याच्यासह स्वतःचे नाव लावून घेण्याचा शहाणपणा दाखवला. मुख्य म्हणजे तेव्हा सासूबाईंनीही खंबीरपणे सुनेची बाजू घेतली! मी सर्व सोडून आलेय आता परत जाणार नाही, इथेच रहाणार तू जा घर सोडून असं नवऱ्याला निक्षून सांगून नंतर रीतसर विभक्त झाली होती ती. या गोष्टीलाही आता किमान दहा वर्ष होऊन गेली !
त्या नंतर मात्र कोणताही सण असला की तिच्या मनात एक अनामिक भीती निर्माण व्हायची. नटण्या मुरडण्याची आवड असणारी ती सण आला की कोशात जायला लागली. विशेषतः कुठे हळदीकुंकू असलं की तिच्या घरी बोलावणं तर यायचं पण हिला जाणवेल असं सासूबाईंच्या नावाचा पुकारा करत ते केलं जायचं व केवळ तोंड देखलं 'तू ही ये ग.. ' असं म्हणून तू येऊ नको हेच सुचवलं जायचं. सासूबाई कितीही प्रेमळ व खंबीर असल्या तरी या समारंभाच्या वेळी त्यांचीही द्विधा मनस्थिती व्हायची. एकदा त्या बळेच हिला स्वतः बरोबर हळदीकुंकवाला घेऊन गेल्या आणि तिकडून येताना आपल्याच मैत्रिणीच्या घरुन इतरांनी दिलेलं टोमण्यांचे वाण घेऊन घायाळ होऊन दोघीही परत आल्या! त्या नंतर मात्र दोघींनीही या समारंभाला जाणेच सोडले. दोन वर्षांपूर्वी सासरे अचानक गेले, आता तर आपल्याला हळदीकुंकवाचे कधीच बोलावणे येणार नाही हे स्पष्ट होताच तिच्यातला बंडखोरपणा उफाळून वरती आला आणि या वर्षी हळदीकुंकू करणारच असं तिने मनोमन ठरवून टाकलं! 

वरचा कॉल हा त्यासाठीच होता. 

सर्वात आधी तिला पिंकीच आठवली दोघींच्या आयुष्याची कथा फार वेगळी नव्हती... फक्त, पिंकीचे लग्न घरच्यांनी ठरवलेल्या मुलाबरोबर झालं, पदरात दोन कच्ची बच्ची टाकून एक दिवस तो जो गायब झाला त्याचा गेल्या पंधरा वर्षात कुठे पत्ता लागला नाही... सांगणारे सांगतात कोणी वेगवेगळ्या गावाची नावं घेत तिकडे पाहिला म्हणून, पण जोवर आपलं माणूस आपणाहून घरी येत नाही तोवर त्याला आपलं तरी कसं म्हणावं? असो... तर ही पिंकी मात्र अजूनही सासूबाईंच्या नजरेच्या धाकात. साधं भाजी आणायला बाजारात जायचं तरी त्यांच्या परवानगीने! त्यातही ती बाहेर पडताना त्यांच्या नजरेचे स्कॅनर निमिषार्धात सर्व गोष्टी टिपून घेतात तेव्हा हिला स्वतः चीच चीड येते आणि ती त्यावर काहीही करु शकत नाही म्हणून परत हतबल- निराश ही होते. जेव्हा नवरोबा गायब झाले त्याच वर्षी तिला हळदीकुंकवाला जायला सासूबाईंनी मनाई करून 'तुमचं कुंकू घरी आलं की जावा मिरवायला...' असं म्हणून हे तिच्या आनंदाचे क्षण कुपीत बंद करून टाकले! अर्थात एका अर्थी त्यांनी बाकी बायकांच्या तिला 'बिच्चारी' करुन टाकणाऱ्या नजरा व टोमण्यांपासून वाचवले ही.

एक एक करता करता आयुष्यात नवरोबाची जागा रिक्त असणाऱ्या ओळखीतल्याच सात आठ जणी सहज नजरेसमोर आल्या. प्रत्येकीची कथा वेगळी पण सारांश आणि व्यथा एकच! नवरा नाही म्हणून प्रत्येक सण-समारंभात सपत्नभावाची वागणूक! यांचा काहीही दोष नसताना सगळीकडे कानकोंडं होऊन वागायला लागायचं... सहज बोलतानाही समोरचा गोड शब्दात जखमेवरची खपली काढुन वार करुन जायचा! विशेषकरून यात ओळखीचे महिलामंडळच अग्रेसर!! 
या साऱ्या मनस्ताप देणाऱ्या मानभंग करणाऱ्या गोष्टी टाळून कोणत्याही दबावाशिवाय या साऱ्या मैत्रिणींसह मनसोक्त गप्पा मारत अगदी हसत खेळत हा कार्यक्रम व्हावा अशीच तिची इच्छा होती. यात तिच्या आई म्हणजे सासूबाईही साथीला होत्याच. खरोखरच दुसरी आई होत्या त्या! येणाऱ्या प्रत्येकीला लुटण्यासाठी काय ठेवायचं असा प्रश्न समोर येताच त्या उत्स्फूर्तपणे म्हणाल्या कुठे केवड्याचे पोये मिळतात का बघ.. आपलं बायकांचं आयुष्य तसंच असतं... केवड्या सारखं.. स्वतःला काट्यात बांधून संपर्कातील प्रत्येक गोष्ट सुगंधित करत जाणारं... अगदी वाळून गेलो तरी सुगंधाची उधळण करणारं...! 
आस्ते आस्ते तो हळदीकुंकवाचा दिवस उजाडला... त्या दिवशी नशिबाने केवड्याचे पोये ही मिळाले होते... पूर्ण घरभर केवड्याच्या गंध पसरला होता. सकाळीच मनिषाने मोहक आणि मयुरेशला - तिच्या मुलांना त्यांच्या फार्महाऊसवर पिटाळले होते, दोघेही लेक आता हाताशी आले होते, हळूहळू घरच्या व्यवसायात त्यांना सामील करुन घेत होती ती. ते गेल्यानंतर मात्र ती प्रत्येकीला कॉल करत संध्याकाळी येण्याची आठवण करुन देण्यात मग्न होती. आज येणारी प्रत्येक मैत्रीण-शेजारीण तिच्यासाठी खास होती... येणारीच्या आयुष्यातही आजची संध्याकाळ संस्मरणीय व्हावी अशी तिचीही मनापासून इच्छां होती! एक नवी सुरुवात काहीवेळ तरी मोकळा श्वास घेण्याची... लादली गेलेली बंधने काही काळ तरी झुगारून आपली नटण्या मुरडण्याची, खळखळून हसण्याची संधी आज प्रत्येक जण परत साधणार होती. आमंत्रण केलेल्या प्रत्येकीला घरातून निघताना नाही म्हटलं तरी थोडं दडपण असणार हे जाणून मनीषाने बाहेरच्या व्हरांड्याच्या बाजूच्या खोलीत पायातल्या खटव्या जोडव्यापासून गळ्यातल्या मंगळसूत्रापर्यंत आणि पावडर लिपस्टिक पासून टिकली, नेलपेंट, गजऱ्यापर्यंत सर्व तयार ठेवलं होतं. येणाऱ्या प्रत्येकीने तिकडे जाऊन नीट तयार होऊन यायचं ही अटच होती तिची! आज ती स्वतः तिच्या आईंसह अगदी भरगच्च बांगड्या, वेणीत गजरा, ठसठशीत कुंकू, मंगळसूत्र घालून तयार झाली होती. एक एक मैत्रीण यायला लागली, आधी नाही नाही म्हणत नंतर अगदी आनंदाने सर्व साजशृंगार करुन तयार झाल्यावर प्रत्येकीच्या चेहेऱ्यावर एक वेगळा आनंद विलसत होता. रोजच्या वागण्यातली मरगळ-उदासीनता कुठच्या कुठे पळून गेली होती. जसजशा बायका यायला लागल्या तसे एकमेकींबरोबरच्या गप्पा हस्यविनोदात घर बुडून गेलं.. प्रत्येक जण आपल्याला आलेले अनुभवही एकमेकांना सांगत होती. त्यातच आईंच्या ओळखीतल्या एक खूप वयस्क आजीची सामील होत्या, सर्वांनीच त्या येताच खूप मनापासून व जल्लोषात त्यांचं स्वागत केलं... त्याचे लग्न तर त्या केवळ बारा वर्षाच्या असताना झालं आणि प्लेगच्या साथीत सतराव्या वर्षी त्यांचा संसार संपला.. सर्व सुखाची- संसाराच्या इच्छा आकांक्षांची, सणवाराची आहुती तेव्हाच पडली होती. त्यांचं केशवपन झालं आणि अंगावर आयुष्यभरासाठी लाल लुगडं आलं.. आपल्या आयुष्यात परत कधी असा दिवस उजाडेल याची त्यांनी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. आधी थोडं कानकोंडं होत त्याही अट म्हणून किंचित पावडर लावून आल्या मात्र त्यांना असे बघताच मनिषाच्या सासूबाई त्यांना बळेबळेच परत खोलीत घेऊन गेल्या. त्यांची स्वतःचीच एक घडी न मोडलेली वजनाला हलकी अशी छान नऊवारी घेऊन आल्या आणि अगदी हक्काने आजींना ती नेसण्याचा आग्रह करकरून नेसायला लावली. नंतर सर्व आभूषणे अंगावर घातली आणि हलकेच मंगळसूत्र त्यांच्या हातात दिलं... हा निर्णय मात्र आईंनी त्या आजींच्यावर सोपवला! आपले थरथरणारे हात जास्तच कंपित होत आहेत असं आजींना वाटलं.. एकदम थिजून गेल्या त्या.. त्यांनी एकवार आईंकडे पाहिलं तेव्हा आईंची नजरच त्यांना 'घाला ते ही एकदातरी' असं सांगून सुचवून गेली. आजींनीही हलकेच आपला गळा त्या सौभाग्यलेण्याने भरुन टाकला आणि अनेक दशकांपूर्वी गमावलेल्या आपल्या जोडीदाराची आठवण येऊन सद्गतीत झाल्या. त्यांच्या खांद्यावर धीराचा आश्वासक हात ठेवत एक हात धरून आई आजींना घेऊन हॉलमध्ये येताच सर्वजणी आश्चर्याने त्यांच्याकडे पहातच राहिल्या मग तर त्यांचीही हलकी चेष्टा मस्करी झाली. जेव्हा मनिषाने मोबाईल मध्ये त्यांचा फोटो काढून त्यांना दाखवला तेव्हाचे त्यांच्या चेहेऱ्यावरचे भाव टिपून घेण्यासारखे होते. फोटो बघत असतानाच 'माझं आयुष्य जाळून कोळसा झालं ग चिमणे...' अस म्हणत त्या पुन्हा रडायला लागताच मनिषाने पटकन त्यांनाच उखाणा घेण्याची गळ घातली आणि सर्व जणींना शांत रहायला सांगितले. परत एकदा दुःखाचे भाव नाहीसे झाले आणि एक छानसा उखाणा घेऊन त्या सर्वांच्या आनंदात सामील झाल्या. "हे खरं हळदीकुंकू, माहित नाही पुढच्या वर्षी मी असेन नसेन पण आज मी आनंदात आहे अगदी तृप्त झाले" असं गहिवरून सांगत त्यांनी सर्वच जणींना शुभाशिर्वाद दिले. अशीच थोडी वेगळी कथा होती अस्मिताची.. 
अमित ची स्मिता म्हणून हीचे नाव लग्नात तिनेच हौसेने बदलायला लावून अस्मिता ठेवायला लावलं, पण... केवळ पाच वर्षांचा संसार करुन अमितला एका भीषण अपघातात गमावल्यावर तीन वर्षांची इरा पदरात घेऊन आता ती आयुष्याशी दोन हात करत होती. काही काळानंतर तिने परत एकदा संसाराचा सारीपाट मांडलाही असता पण आज मात्र ती इथे यांच्यातीलच एक होती! अस्मिता येताना सोबत इरालाही घेऊन आली होती आणि ही छोटी बाहुलीही आल्यावर मस्त नटून सगळीकडे सराईतपणे वावरत होती. अस्मिता रोज ऑफिसला जाताना जरी सौभाग्यलेणं घालत होती तरी त्या मागचा उद्देश वेगळा होता. आज मात्र इथे तिच्या मनात काहूर उठलं... अमितच्या आठवणींनी ती बेचैन झाली, मात्र काही मिनिटातच स्वतःला सावरुन ती सगळ्याजणींबरोबर आनंदाच्या या जल्लोषात सामील झाली! 
स्वयंपाकघर सांभाळत सर्वजणींची सरबराई करणाऱ्या सुशिलाताईनाही आज वेगळे नियम नव्हते, त्या ही आपलं वेगळेपण न विसरता जमेल तितकं सर्व गोष्टीत सामील होत होत्या. मात्र त्यांना त्यांचे अनुभव सांगायचा आग्रह केल्यावर अनुभव ऐकताना समाजातील श्वापदांचा निकटचा वावर सर्वांच्या अंगावर शहारे उमटवून गेला! शेवटी त्या मात्र निर्विकारपणे म्हणून गेल्या.. "भायेरचे लांडगे परवडले, मी समर्थ हाय अजून बी त्यांला धडा शिकवायला पन घरचा लांडगा लय वाईट त्याला रोकता  बी येत नाय नि घालवता बी येत नाय त्या परिस त्यो मेला त्येच बेस झालं न्हाईतर मीच एक दिस त्याचा मुडदा बशिवला असता. मला आजिबात वाईट वाटलं न्हाय कुकू मिटल्याचा"
नंतर सर्वजणींना गोड मिठाई, मसाला दूध आणि तिळगुळ देऊन तोंड गोड करत हातात एक छानसा कुंकवाचा करंडा, रोजच्या उपयोगात येईल अशी भेटवस्तू व केवड्याचा पोया असं सर्व एक सुंदर पिशवीत भरून देण्यात आले... हे सर्व सुरु असतानाच अचानक सागर तिथे आला.. हा सागर म्हणजे शहरातील नामवंत फोटोग्राफर! त्याचे आगमन होताच सर्वजणी अक्षरशः नाचायच्या बाकी राहिल्या! नंतर जवळजवळ तासभर केवळ आणि केवळ एकमेकींच्या गळ्यात गळे घालून तसंच वेगवेगळ्या पोज देत तर कधी एक एकटीचे फोटो काढण्याचा कार्यक्रम सुरू होता, सर्वच जणींच्या उत्साहाला उधाण आले होते... हे आनंदाचे क्षण फोटोच्या रुपात प्रत्येकीलाच परत परत अनुभवता येणार होते. जणू प्रत्येक फोटोत काळ गोठवून ठेवला जात होता... शेवटी सर्वजणींचा ग्रुप फोटो घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली!
त्या नंतर मात्र काहीजणी सर्व मेकअप वगैरे धुवून परत आपल्या आधीच्या कोशात सुरक्षितपणे बंदिस्त झाल्या... जणू सत्यातून स्वप्नात आणि स्वप्नातून परत सत्यात... वास्तवात परत आल्या!! आता हल्लीच्या प्रथेप्रमाणे एकमेकांचे नंबर शेअर करण्यात आले, लगेचच एक  छान व्हाट्सप ग्रुप तयार झाला!!
एकंदरीत सर्व कार्यक्रम मनीषा आणि तिच्या आईंच्या अपेक्षेपेक्षा खूपच छान झाला, अतिशय उत्साहात पार पडला. आज प्रत्येकीला परत एक सौभाग्याच्या आनंदाची गंगा सापडली होती जी दरवर्षी एकदा नक्कीच भरभरून वाहणार होती.. अगदी नक्कीच...!



                                                     श्री पाटील..


No comments:

Post a Comment