Saturday, January 21, 2023

अंबर..!


  मागच्याच आठवड्यात कसब्यात मित्राबरोबर बोलत थांबलो होतो.आमच्या शेजारून दोन ‘आज्या’ म्हणाव्या इतपत वयस्कर बायका बोलत चालल्या होत्या.”वहिनी उद्या पहाटे वेळेत येताय ना धुंधुरमासाच्या कीर्तनाला?”मग ‘वहिनींनीही किंचित खोकत,”होहो आज मुलालाच सांगून ठेवते सोडायला, उद्या नै हो उशीर होणार !”,बोलत दोघी पुढे निघून गेल्या.मला मात्र त्यानिमित्तानी कित्त्येक महिन्यांनी ‘धुंधुरमासाची’ आठवण झाली.

मग विचार केला की धुंधुरमास शब्द ऐकल्यावर म्हणजे काय?हा प्रश्न तरी निदान मला आणी माझ्या मित्राला पडला नाही.कारण नशिबानी माझ्या पिढीला तरी धुंधुरमास म्हणजे काय?हे सांगणारे लोक आजूबाजूला तरी होते.पण आजकाल अनेक ठिकाणी मुद्दलातच घोटाळा असतो.त्यामुळे आजच्या मुलांना धुंधुरमास म्हणजे काय ते सांगण्यासाठी चार शब्द तरी लिहायलाच  पाहिजेत.

 सूर्य धनु राशीत भ्रमण करतो तो म्हणजे धनुर्मास ऊर्फ ‘धुंधुरमास’.आयुर्वेदानुसार मकर संक्रमणाच्या आधी हेमंत ऋतूमध्ये येणाऱ्या ह्या धनुर्मासात सामान्य लोकांचा जठराग्नी (भूक)भल्या पहाटे जागृत होतो.त्यामुळे ह्या महिन्यात पहाटे उठून ह्या ऋतूमध्ये मिळणाऱ्या भाज्या,बाजरीसारखी धान्ये खायचे महत्व फार आहे.हे खाणं इतर ऋतुंमध्ये  पचायला जड असलं तरी ह्या महिन्यात/ऋतूमध्ये मात्र ‘राजस’ मानलं गेलंय.वर्षभर खाण्यातून मिळणारी ‘एनर्जी’ आपल्याला फक्त ह्या एका महिन्यातल्या खाण्यातून मिळवता येते,येवढं ह्याच प्रचंड महत्व पूर्वजांकडून सांगितलं गेलय.आत्ताच्या पिढीला हे माहिती असण्याची शक्यता कमी कारण आजकाल जिथे लोकांना मराठी महिनेच पाठ नसतात तिथे कालनिर्णय मधेही उल्लेख नसलेला ‘धुंधुरमास’ कोण लक्षात ठेवणार?

 ह्या ऋतुंमध्ये खरी चव मिळणाऱ्या गवार,फरसबी,वांगी,मटारासारख्या ‘लेकुरवाळ्या’ फळभाज्या आणि बाजरी सारखी पिठं,पहाटेच्या वेळी जेव्हा पोटातली भूक पूर्णपणे ऐन भरात असते त्यावेळी खाण्यातली मजा आणी त्यांची सहज होणारी पचनक्रिया ह्यांचा विचार,जेवणाकडे “अन्न हे पूर्णब्रम्ह”म्हणत वैज्ञानिक दृष्टीकोनातून बघणाऱ्या संस्कृतीत प्राचीन कालापासून केला गेलाय.हे लक्षात आलं की त्याबद्दलचा आदर एक ‘फुडी’ म्हणून आजही वाढतो.

काही वर्षांपूर्वीपर्यंत अनेक लहान गावातच नाही तर अगदी पुण्यात देखील ठिकठीकाणी धुंधुरमास वेगळ्याच आनंदात साजरा व्हायचा.शहरातल्या जुन्या,प्रमुख मंदिरात काकड आरत्यांना जोडून नामवंत कीर्तनकारांची कीर्तनं व्हायची.घराघरातून सूर्याला अर्ध्य देऊन नैवेद्य दाखवून पहाटे साग्रसंगीत जेवणं व्हायची.तरीपण वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टीकोन वगेरे बाजूला ठेऊन खाण्याची धुंधुरमासाची खरी मजा लुटायची असेल तर एखाद्या लहानश्या खेड्यातून जावं.

 काही दिवस आधी,रामाच्या पारी घरच्या शेतावर धुंधुर्मासातल्या चुलीवरच्या साग्रसंगीत जेवणाचा बेत ठरतो आणि एका सूर्योदयाच्या सुमारास शुचिर्भूत होऊन समस्त कुटुंब स्वतःच्या शेतावर हजर होतं.तो नजारा पाहण्यासारखाच असतो.

 तांबडं फुटत असतानाच घरच्या गड्यांनी लावलेल्या सगळ्यात मोठ्या चुलीवर थोरल्या जाऊबाईंनी पदर खोचून मटार,गवार,गावरान गाजरं ह्यांची लेकुरवाळी भाजी स्वतः करायला घेतलेली असते.माहेरी आलेली लेक मटाराचे दाणे तोंडात टाकत मोठ्या वहिनीशी गप्पा मारत बसलेली असते.शेजारच्या दुसऱ्या चुलीवर फ़र्माईशीवरून भरतासाठी वेगळ काढलेलं मोठं,हिरवं वांगं गोवर्यांवर भाजण्यात दुसऱ्या सुनबाई दंग असतात.काटे काढून भाजलेल्या वांग्यात शेतातल्या ताज्या काढलेल्या भुईमुगाचे ‘कवळे’ दाणे पडतात.मुठीत मावतील येवढ्या हिरव्या मिरच्या,हाताशी असावी म्हणून बांधावरून नुकतीच खुडलेली कोथिंबीर दिमतीला असतेच.भाजत,गार होत आणि शेजारी लावलेल्या लोखंडी तव्यावरून ‘परतीचा’ प्रवास करत वांग्याचे भरीत ताटात पडतं.घरातल्याच असणाऱ्या रखमाच्या हातांतून पाणी लावून तव्यावर सर्रकन पडलेल्या,मुबलक तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकऱ्यांच्या वासानी एव्हाना हृदयाचा ठाव घेतलेला असतो.नैवेद्याच ताट सूर्यदेवाला दाखवल्यावर जेवणं सुरु होतात.

 चुलीवरचे भाजलेले पापड पटापटा पानात पडतात.घरी विरजून आणलेल्या दह्याचं लोणी वाढायचं काम घरातल्या आईसाहेबांनी स्वतःच्या हातात ठेवलेलं असतं.एकीकडे प्रत्येकाच्या पानाकडे लक्ष देत,आपल्या मनासारखं लोणी वाढत त्यांची देखरेख सुरु असते.

 चुलीतून भाजून वेगळ्या काढलेल्या मिरच्यांचा ठेचा वाटायचं काम दिलेली घरातली एखादी परकरातली मुलगी मधेच लाजत येऊन पहिल्यांदाच केलेला ठेचा घाईनी ताटात वाढायला घेते.तिच्या वाढण्यावर लक्ष असलेल्या तिच्या आईची,“सुलक्षणे ठेचा डाव्या बाजूला वाढावा की ग !”,अशी हाक आल्यावर पटकन आपली जीभ चावत धाकट्या काकाच्या ताटात डावीकडे ठेचा वाढते. “सुलक्षणाताई,आत्ता ठीकाय,पन सासरी गेल्यावर कसं व्हायाचं तुमचं?” म्हणाल्यावर “गपे काका,मला नै कधी लग्न करायचं”,म्हणत लाजून पसार होते.ते ऐकून समस्त काका,काकू,आत्याच्या हास्याचा आवाज ‘समद्या’ माळावर पसरतो.त्या नादात जेवताना तिखट लागल्यावर घरून बांधून आणलेल्या गुळपोळ्या प्रत्येकाच्या पानात पडत रहातात.हास्यविनोदात नेहमीपेक्षा चार घास जास्ती गेलेले कोणाला लक्षातही येत नाही.

 तालेवार घराण्यांतून आलेल्या मोठ्या सुनांच्यापुढे बोलायची टाप नसलेली नुकतीच लग्न होऊन आलेली धाकटी सून,खांद्यावरचा पदर सावरत कोपऱ्यातल्या चुलीवर मंद आचेवर ठेवलेली मुगडाळीची खिचडी ढवळत मधूनच आपल्या धन्याकडे चोरटा कटाक्ष टाकत लाजत कोपर्यात उभी असते.सगळ्यांना तिची आठवण होते ती आज मोठ्यांच्या पंक्तीत बसलेल्या लहान मुलांची जेवणं उरकताना.नवीन धाकट्या काकुला सयेनी बिलगणारी घरातली मुलं मग तिचा धावा करायला लागतात.“धाकल्या सुनबाई खिचडी घ्या वाढाया”,असा सासुबाईंचा आवाज आल्यावर तंद्रीतून भानावर आलेल्या धाकल्या सूनबाई लगबगीनी मऊसुत खिचडी पुतण्यांच्या पानात एकेक करून वाढायला घेतात.

 कुटुंबातले थोरले आण्णा,तात्या औंदाच्या पिकपान्याची चर्चा करीत आपल्या ‘बारदानाकडे’ बघून मनात समाधानानी हसत असतात.गावोगावी रंगणाऱ्या धुन्धुरमासाच्या ह्या जेवणावळी म्हणजे एकत्र कुटुंब व्यवस्थेला बांधून ठेवणारी ‘जान’ होती.

 माझ्या माहितीत हेमंत ऋतूत भारतात इतरत्र कुठे अश्या जेवणावळी होत असल्याचं ऐकिवात नाही.असतील तर जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल.

पण आज महाराष्ट्रातही आजूबाजूला पाहिलं तर शहरात घरोघरी होणारे धुन्धुरमासाचे कार्यक्रम आता होताना दिसत नाहीत.रा.स्व.संघासारख्या संघटनांमध्ये काही ठिकाणी वैयक्तिक पातळीवर ह्या जेवणाची परंपरा टिकवून धरली जाते.जे जे लोक,संस्था ही अस्सल मराठी परंपरा टिकवून ठेवतायत त्यांचे प्रत्येकानी स्वागत करायला हवं.पुन्हा घरोघरी अश्या धुंधुरमास स्पेशल जेवणावळीची सुरुवात व्हायला हवी.

 कारण धुंधुरमासाच्या ह्या जेवणामध्ये “हाय कॅल्शियम,प्रोटीन्सच्या” खाण्याबरोबरच अदृष्य अशी ‘इंडीयन फॅमेली व्हॅल्यू” आहे.त्याची सर एसी हॉटेलात मेलामाईनच्या डिशमध्ये प्रत्येकी १२५ ग्रॅम पंजाबी भाजी,बटर रोटी आणि जीरा राईस खाऊन,वरती प्रत्येकी एक स्कूप आईसक्रिमवर सांगता होणाऱ्या शहरी गेट टू-गेदर्सना येणं केवळ अशक्य.


                               
             

चेहरे..!

गेले काही दिवस त्या नियमितपणे मॉर्निंग वॉकला जात होत्या. रस्त्यात अंतरा अंतरावर ठराविक चेहरे रोज दिसत. 
       सोसायटीतून बाहेर पडल्याबरोबर समोरून येणारी एक टीनएजर मुलगी दिसे. सडसडीत, फॅशनेबल कपडे वापरणारी, आकर्षक. तिच्या कुरळ्या केसांच्या अस्ताव्यस्त बटा तिच्या सौंदर्यात भर घालत. आताशा काकू दिसल्या की ती मिस्कीलपणे डोळे मिचकवून हसे. ही अनोळखी गोड पोरगी आवडू लागली काकूंना.
       जरा पुढे गेलं की भावल्यांसारख्या दिसणाऱ्या दोन चिमुरड्या जुळ्या मुली आणि त्यांची आई स्कूलबसची वाट पहात त्यांच्या सोसायटीच्या गेटपाशी उभ्या असायच्या.   
       तिथून पुढे सरकलं की पंचविशीचा एक उंचनिंच तरुण लांब ढांगा टाकत समोरून येत असे. एक मध्यमवयीन बाई काकूंना मागे टाकून जवळपास धावतच जायची. रोजची लोकल चुकू नये म्हणून असणार ! एकदा न राहवून काकू तिला थांबवत म्हणाल्या,"जरा सावकाश. धडपडून पडाल बिडाल एखाद दिवशी."
       रस्त्यातली भटकी कुत्री, झाडं, सगळंच माहितीचं झालं होतं. एकदा नाक्यावरच्या भल्या थोरल्या वृक्षाकडे काकू मान वर करून बघत होत्या. त्या कशाला तरी अडखळल्या आणि....... खालीच पडल्या एकदम. डोक्यात कळ गेली आणि त्यांच्या डोळ्यासमोर अंधारी आली.
       त्यांनी डोळे उघडले तेव्हा भलाथोरला घोळका त्यांच्याभवती जमला होता. त्यात नेहमी दिसणारे सगळेच होते. "काकू, मला 'धडपडशील' म्हणताना आज तुम्हीच धडपडून पडलात. आता बरं वाटतंय ना ?" ती लोकलवाली बाई म्हणाली. काकूंच्या काळजीने आज लोकल चुकण्याची पर्वा न करता ती तिथे थांबली होती. जुळ्या भावल्यांची सोसायटी अगदीच जवळ होती. कुणीतरी काकूंना दंडाला धरून उठवलं आणि सोसायटीत बाकड्यावर नेऊन बसवलं. सगळा घोळका मागोमाग आला.
        "काकू, पाणी हवंय का ?"  त्या टीनएजर गोड पोरीने पाण्याची बाटली काकूंसमोर धरली. जुळ्या भावल्यांची आई त्यांच्या शेजारी बसली. तिने त्यांचा हात हातात घेतला. केवढी ऊब होती तिच्या स्पर्शात ! "तुम्ही इथे जवळच रहाता ना? चला. मी तुम्हाला घरी सोडायला येते."
      "नको हो. आता मी जाईन."  
       "मी येते म्हणते तर !" ती खरोखरच काकूंना घरी सोडायला आली.
       "एवढ्या मोठ्ठ्या तीन बेडरूमच्या फ्लॅटमध्ये आम्ही दोघेच. दोन्ही मुलं अमेरिकेत. हे रिटायर झाले हल्लीच. हा फ्लॅट पूर्वीच घेऊन ठेवलाय. हे रिटायर झाल्यानंतर आता आलो इथे रहायला. पण ह्यांचं विश्व वेगळं. माझं वेगळं. दोघांचा स्वैपाक व्हायला कितीसा वेळ लागतो ! त्यामुळे वेळ खायला उठतो मला." काकूंनी सांगितलं.
       "ओके."
      "आज भाज्यांचं कटलेट केलंय नाश्त्याला. खाऊन बघा कसं झालंय."
       "काकू,  मला अहो जाहो करू नका. माझं नाव गौरी. कटलेट झक्कास झालंय. कसं केलं ?" 
       काकूंचा चेहरा खुलला. "वाटीभर मटार घेतले. बारीक चिरलेली फरसबी. गाजर, बीट किसून......." काकू रेसिपी सांगू लागल्या.
        आता रोज दिसणारे चेहरे अनोळखी राहिले नाहीत. काकू रस्त्यात थांबून सगळ्यांशी चार शब्द बोलू लागल्या. गौरी तिच्या मुलींना घेऊन वरचेवर काकूंकडे येऊ लागली. एकदा काकूंनी मुलींना पम्पकीन मध्ये बसून 'चल रे भोपळ्या टुणुक टुणुक'  म्हणत मॅन इटर टायगरला चकवून गेलेल्या स्मार्ट आजीची गोष्ट सांगितली. मुली बेहद्द खूश झाल्या. त्यांना गोष्ट आणि तालासुरात म्हटलेलं 'चल रे भोपळ्या टुणुक टुणुक' फार म्हणजे फारच आवडलं ! त्यांनी काकूंना ती एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगायला लावली. भोपळा, नरभक्षक वाघ हे मराठी शब्दसुद्धा मुलींना माहीत झाले.
       "काकू, तुम्ही संस्कार वर्ग घ्या ना !"
        "बापरे ! ते काय असतं ?" 
        "छोट्या मुलांना गोष्टी सांगायच्या. गाणी, श्लोकबिक शिकवायचे. असं सगळं. आणि पैसे घ्यायचे त्याचे."
        "पैसे बिसे नाही घेणार. पण तू म्हणते आहेस ते जमेल मला. माझी मुलं लहान होती तेव्हा मी रोज संध्याकाळी परवचा म्हणून घेत असे त्यांच्याकडून. आता काय ! सगळंच बदललंय. मुलं आणि आई वडील..... सर्वचजण मोबाईलमध्ये घुसून बसलेले असतात घरोघरी."
       काकूंचा संस्कार वर्ग सुरू झाला. खूप बोलबाला झाला त्याचा. चिमुरडी मुलं या छान, छान गोष्टी सांगणाऱ्या, उड्या मारून, नाचून गाणी म्हणणाऱ्या, रोज नवीन नवीन yummy खाऊ करून देणाऱ्या काकूंवर जाम खूष झाली.
        गौरीने काकूंना स्मार्टफोन व्यवस्थित वापरायला शिकवला. फेसबुकवर अकाउंट उघडून दिला. काकूंना अलीबाबाची गुहाच उघडल्यासारखं वाटलं !  पटलं, की सोशल मिडियाला आभासी जग वगैरे म्हणत असले तरी माहिती भरपूर मिळते तिथे. छान करमणूकसुद्धा होते. वेळ बरा जातो. खाद्यपदार्थ, स्वयंपाक याच्याशी संबंधित ग्रुप्स  जॉईन केले काकूंनी. त्यांच्या पारंपरिक रेसिपीजवर भरभरून लाईक्स, कमेंट्स येऊ लागले.
         ह्यापूर्वी काकूंना आयुष्यात रितेपण आल्यासारखं वाटत होतं. रोज बदलणाऱ्या या आधुनिक जगात आपण निरुपयोगी कुचकामी आहोत, अडगळीत पडल्यासारख्या झालोय अशी विचित्र नैराश्याची भावना मूळ धरू लागली होती. मात्र आता आपलाही उपयोग आहे, अनेक गोष्टी आपल्याला उत्तम जमतात, आपणही इतरांना ज्ञान, माहिती देऊ शकतो हा 'साक्षात्कार'  झाला आणि त्यांचं जगच बदललं ! निरुत्साह, निराशा, मरगळ पार कुठल्या कुठे पळून गेली ! तब्येतीच्या तक्रारी आपोआप दूर झाल्या. त्यांचं त्यांनाच जाणवलं की त्यांची दुखणी शारीरिक कमी आणि मानसिक जास्त होती.
        काकूंनी वीकएण्डला छोटीशी पार्टी द्यायचं ठरवलं. त्या रोजच्यासारख्या मॉर्निंग वॉकला गेल्या तेव्हा आता ओळखीच्या झालेल्या सर्व चेहऱ्यांना त्यांनी शनिवारच्या पार्टीचं आमंत्रण दिलं. एका पायावर तयार झाले सगळे !"
        गौरी खोदून खोदून विचारू लागली. "कशाबद्दल पार्टी ? काय कारण ? सांगा ना काकू."
      "आधी अनोळखी असलेल्या चेहऱ्यांमुळे मला माझा खरा चेहरा सापडला. म्हणून."
      "म्हणजे ?" गौरी गोंधळून गेली.
      "अगं, म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मला माणसात आणलंत. ही म्हातारी अजून कामाची आहे याची जाणीव करून दिलीत. मग कृतज्ञता व्यक्त करायला नको का ? मला माझी स्वतःची ओळख नव्याने पटली. माझा चेहरा मला मिळाला तुमच्यामुळे. म्हणून आहे ही पार्टी."
      गौरी आश्चर्याने बघतच राहिली काकूंकडे. त्यांचा चेहरा आत्मविश्वासपूर्ण, तजेलदार दिसत होता.


                                                  श्री पाटील..

मोठेपणा..!


मोठा माणूस हो, असा आशीर्वाद वडीलधारी मंडळी मुलांना देत असतात. वयाने मोठे तर सगळेच होतात, कर्तृत्वाने मोठे होणे महत्त्वाचे, कर्तृत्ववान बनायचे तर प्रत्येक कृतीत शिस्तबद्धता हवी. नीतिमत्ता आणि आचरण शुद्ध हवे. मोठा माणूस बनायचे तर खूप संपत्ती मिळवायला हवी. मग त्यासाठी कोणत्याही मागनि कुठल्याही थराला जाऊन संपत्ती मिळवणे हे एकच ध्येय काही लोकांचे असते. असतील शिते तर नाचतील भुते अशी एक म्हण आहे. पैसेवाल्यांशी लोक जवळीक वाढवतात. त्यांचा आदर सत्कार केला जातो. पैसा किंवा श्रीमंती शाश्वत नसते, त्यामुळे त्यातून येणारा मोठेपणा हाही शाश्वत नसतो, लोक स्वार्थासाठी जवळ आलेले असतात तसेच दूरही जातात. मान सन्मान आदर वगैरे फक्त समोर दाखवण्यासाठी नसावेत. एखाद्या मोठ्या माणसाच्या सन्मानानंतर त्याच्या अनुपस्थितीतही जेव्हा त्याच्याबद्दल आदराने बोलले जाते, त्याची स्तुती केली जाते, तेव्हा तो खऱ्या अर्थाने मोठा माणूस असतो. आपल्याला लोकांनी मोठा म्हणावे, मोठेपणाचा मान द्यावा, कायम आपल्या भोवती लोकांचा गराडा असावा, यातून फक्त अहंकाराला खतपाणी मिळत असते. मला मोठा म्हणा, चांगला म्हणा किंवा माझ्या नावाचा जयजयकार करा, असे लोकांना सांगण्याची वेळ आपल्यावर कधीही येऊ नये फुलाचा सुगंध दरवळत असतो. आपला सुगंध किती मनमोहक हे त्याला ओरडून सांगावे लागत नाही. आपली माणुसकी, आपले कर्तृत्व, नीतिमान आचरण हे सगळे बघून समाजात चांगला माणूस म्हणून आपोआप ओळख निर्माण होत असते.

इतिहासात जे थोर पुरुष होऊन गेले, त्यांनी समाजाच्या कल्याणासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करून, आपले आयुष्य खर्ची घातलेले असते. त्यांच्या स्मृती आपण जपतो. मोठेपणाचा हव्यास असणारी मीपणाचा अहंकार असणारी व्यक्ती, कधीही सर्वस्वाचा त्याग करू शकत नाही. थोर पुरुषाने प्रथम आपल्या अहंकाराची होळी केलेली असते. शिवरायांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता रयतेच्या शत्रूंशी लढून स्वराज्य मिळवले. कीर्तिमान, नीतिमान राजा म्हणून आजही जग छत्रपतींच्या नावाचा जयजयकार करते. आपल्या नावाचा जयजयकार व्हावा आपल्याला मोठेपणा मिळावा, हेच जर शिवरायांचे ध्येय असते तर कल्पना करा सध्याचे चित्र काय असते. मोठे व्हायचे म्हणजे सर्वस्वाचा त्याग करून संत किंवा महात्मा पदालाच पोहोचायला पाहिजे असे नाही. आपण माणूस आहोत आणि आपल्यातली माणुसकी कायम जिवंत राहावी यासाठी प्रयत्नशील असणारा प्रत्येक जण मोठा माणूस असतो..




ओझं..!


रणरणत्या उन्हात ते दोघे सोसायटीच्या गेटबाहेर आले...हा देखील बहुतेक नकारच. संधीवातामुळे आता आईचं येणं शक्य नव्हते म्हणून बापलेक दोघंच जायचे स्थळ बघायला. वडील साठी ओलांडलेले आणि मुलगी तिशीची...उशीरा झालेली..लग्नाचं अजूनही कुठे जमत नाही. आजचं कदाचित सत्तावीसावं किंवा कदाचित तिसावं स्थळ.... मुलाच्या चेहऱ्यावर नकार स्पष्ट दिसत होता. सोफ्यावर बसताक्षणी तिसऱ्या मिनिटात तो मोबाईलमधे डोकं खुपसून बसला. खोपोलीहून इतक्या धावपळीत दोन गाड्या बदलून येणं अगदीच फुकट गेलं.... तिला बाबांची काळजी सतत वाटते. आताशा त्यांना बीपीचा त्रास होतो. आईसारखे अगदीच सांधे कामातून गेले नसले तरी आता गुडघे कुरकुरतात त्यांचे....नंबर वाढलाय तो वेगळाच.

ती देखील अगदी चारचौघींसारखी. साधी सरळ, नाकासमोर चालणारी, खालमानेने वावरणारी, शांत, सोशिक....तिघांचाच संसार आणि इवलंसं विश्व. ती इतकी साधी की नाक्यावरची टवाळ पोरं तिची दखलही घेत नाहीत, कधीतरी आपल्याला बघून एकाने तरी शिटी मारावी अशी सुप्त इच्छा व्हायची तिला, ते कधीच झाले नाही. ती शेजारुन गेली की कडक मास्तरीण वर्गावर आल्यावर कार्टी गप्प बसतात तसा क्षणभर नाका शांत होई...

बाबा रिटायर होऊन तीन वर्षे...आई अंथरुणाला खिळलेली.... तिची टीचभर नोकरी... परिस्थिती ठीकठाक...तिचा छोटासा पगार आणि बाबांचं इवलंसं पेन्शन मिळून रुखुटुखु सुरु होतं. दोनेकशे माणसांचं जमेल इतपत लग्नाचं बजेट होतं बाबांचं. साधंच लावूया लग्न असं ती म्हणे... कधी होणार?

उन मी म्हणत होतं. दोघं निःशब्दपणे पावलं टाकत चालत होते. “सुनिता, रस घेऊया चल” बाबा म्हणाले. दोघं रसवंतीगृहात शिरले. किंचित बरं वाटलं. छन्नक छन्नक करत मशीन सुरु होतं... "अद्रक निंबू डालना हां" ...बाबा उगाच काहीतरी म्हणाले. "काका, मी सातारचा. मराठीतनं बोला की" रसवाला हसला. बाबा किंचित वरमले...
तिच्याकडे वळून म्हणाले, “त्या केळकर गुरुजींनी सांगितलेले अकरा सोमवार झाले का गं सुनिता?” वास्तविक पाहता ते सोमवार होऊन तीन महिने झाले होते आणि बाबांनी हा प्रश्न अनेकदा विचारुनही झाला होता..."हो" ती म्हणाली. केळकर गुरुजींच्या मते खरंतर खडतर योगच होते. तिच्या ऑफिसमधल्या रणदिवेचा चुलतभाऊ पत्रिका बघून म्हणाला होता, हिचं लग्न होणं next to impossible आहे.... अर्थात ते तिनं बाबांना सांगितले नव्हते.

रसाचे ग्लास आले. कोणीतरी अंतरात्म्यावर थंड अभिषेक करावा असं वाटलं. तिच्या घामेजलेल्या म्लान चेहऱ्यावर तरतरी आली. बाबा डोळे बंद करून रस पित होते. आताशा त्यांच्या चेहऱ्यावर थकवा आणि सुरकुत्या एकदमच दिसत होत्या. दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या चपलांच्या टाचा झिजल्या नसल्या तरी चपलांच्या कडांवरची धुळीची पुटं आता दिसत होती. साईबाबा बसायचे तसे एकावर एक पाय टाकून बसण्याची बाबांची जुनी पध्दत... आपल्यामुळे किती त्रास होत असेल या थकलेल्या जीवाला? तिच्या मनात आलं. बाबा शांतपणे रस पित होते....

तिचं लक्ष बाहेर गेलं. रसवंतीगृहाबाहेर उन्हाची तलखी कमी व्हायला पाणी शिंपडलं होतं. एक छोटीशी चिमणी तितक्यात आली, शेजारच्या इवल्याशा हौदात चोच बुडवून पाणी प्यायली आणि मग तेच पाणी त्या नखभर चोचीत घेत तिची आंघोळ सुरु झाली. सुनिता रस पिता पिता शांतपणे सगळं न्याहाळत होती. सचैल स्नान झाल्यावर ती एकटी चिमणी अंगणात थुईथुई बागडत कसलेसे दाणे टिपत होती. तिचं एकटेपण उपभोगत होती... तिचं कशातही लक्ष नव्हते. ती आणि तिचं स्वच्छंद एकटेपण...शेजारी अजून दोन चिमणा चिमणीच्या जोड्या आल्या. ते त्यांच्या त्यांच्यातच होते पण हिचं एकटेपण मोहक होतं. त्यात एक दिमाख होता...तिच्या वावरण्यात कुठेही औदासिन्य नव्हतं की एकटेपणाची कुतरओढ नव्हती. ती अतिशय आनंदाने बागडत होती. दाणे टिपून झाल्यावर पुन्हा थोडावेळ हौदात मस्ती केली आणि चिवचिवत उडून गेली....सुनिताचे डोळे एक क्षणभर भरुन आले आणि पुढच्या क्षणी.... 

“बाबा” तिने बाबांचं मनगट धरलं.... “अजून एकेक हाफ ग्लास घेऊया का?” बाबांना तिचं लहानपण आठवलं. फडतरे रसवंतीगृहात गेली की सुनिता अशीच एक फुल ग्लास आधी आणि नंतर एक हाफ ग्लास घ्यायची. पण आज एकदम अचानक? तेही हो म्हणाले...पुन्हा नव्याने ऑर्डर दिली. याक्षणी तिच्या मनावरचं औदासिन्याचं जळमट नावालाही जाणवत नव्हतं....रस पिऊन झाल्यावर दोघे एस्टीस्टँडकडे निघाले... 

“सुनिता....” बाबांची गाडी पुन्हा मूळपदावर आली “गांगल बाई म्हणत होत्या...त्यांच्या चुलत दीराचा मुलगा आहे म्हणे....निर्व्यसनी, पुण्यात स्वतःचं घर” तिने पुन्हा बाबांचा हात धरला...ते गप्प झाले. काय गं?... “बाबा ऐका ना...आपण स्पेशल कार करुन गणपतीपुळ्याला जाऊया? आईला पण खूप दिवसांत बाहेर कुठे नेलं नाहीये. तिलाही कोकण बघायचंय हो... थोडा चेंज...मी साठवलेत पैसे. होईल मॅनेज” तिच्या चेहर्‍यावर एक आगळावेगळा आनंद दिसत होता.... “हरकत नाही... पण ते गांगल बाई...” 

ती क्षणभर थांबली. बाबा पण थांबले.... “बाबा, एक सांगू? आता खरंच पुरे झालं हे सगळं. व्हायचं तेव्हा होईल लग्न किंवा होणारही नाही. आता मला खरंच काही फरक पडत नाही बाबा....आनंद हा सतत द्वैतातच का शोधायचा? कधीतरी कोणीतरी स्वतःतही अद्वैत शोधायला काय हरकत आहे? बाबा, आता यापुढे आपण चपला घासत कुठेही जायचं नाही म्हणजे नाही...आपण सोफ्यावर बसताक्षणी तो मुलगा पाच मिनिटात मोबाईलमधे डोकं खुपसून बसला? असल्या माजोरड्यांसोबत मला आयुष्य काढायचं नाही. तुम्हाला खरंच मनापासून सांगू? माझ्या नशिबात खरंच कोणी असेल तर येईलच की....आणि नसेल तरी ठीक आहे बाबा... एकट्याने आयुष्य आनंदाने जगता येतं हे आज मला कोणीतरी दाखवलंय” बाबांना नीट धड काही समजलं नाही...सुनिता लग्नाला तयार आहे पण यापुढे आपण दारोदार भटकायचं नाही हे नक्की.... त्यांच्यासाठी तेवढं पुरेसं होतं... 

उन्हं उतरली होती. एस्टीचा थांबा हळूहळू माणसांनी गजबजत होता. आज तिच्या डोक्यावरुन मणामणाचे ओझं उतरल्यासारखं झाले होते.... 

 
                                               श्री पाटील..

गुलदस्ता..!


नुकतेच मनू , माझ्या लहान मुलीचे लग्न होऊन तीन 
महिने झाले होते. . 
मी व बायको दोघेच घरी. . 
दोन हजार बारा सालातला  तो मे महीना होता. . 
मी या विश्वात याच महिन्यात प्रकटलो होतो
खरा तर हा आमचा उत्साहाचा महिना असतो. 
वाढदिवसाचे अवचित साधून आम्ही सी बीचवर जाण्याचे ठरवले.
आणि निघालो !!
जशी जशी आमची कार गगनबावड्याचा करुळ घाट उतरू लागली तसे अधिकच उत्साह जाणवू लागला.
हिरव्यागार निसर्गातुन ड्रायव्हिंग करणे  म्हणजे एनर्जीचा डोज घेतल्या सारखे वाटते . करुळ घाट उतरताना दिसणारे ते हिरव्यारंगाचे विविध छटाचे दृश्य, न्याहळताना डोळ्याचे पारणे फिटल्याचे अक्षरशः जाणवते
सगळ्याच घाटातला रस्ता नागमोडी असतो खरा , पण करूळ घाटातले  नागमोडी रस्ते वेगळाच भीतीयुक्त  आनंद देत असतात, एक थ्रिलिंग असते
एका वळणावर उंच पाहिल्यावर गगनगिरी महाराजांचा मठ दिसतो, तिथे न कळत मनांत हात जोडले जातात.
दोन तीन  वळणावर कार थांबण्यासाठी जागा केल्या मूळे
तिथे थांबून करूळ घाटाचा विस्तृत डोंगररांगा पाहता येतात
दहा अकरा वाजता तेथून जाताना   धुक्यामधून ऊन पसरलेले दिसते, त्या धुक्यातून दिसणारे अस्पष्ट डोंगर झाडी, खूप दूर वर दिसत असतात. 

भोगवेबीच वर आम्ही एक च्या दरम्यान पोहचलो
सामंत काका आमची वाट पहातच होते
त्यांच्या रिसोर्ट कडे जाताना, लांब गाडी पार्क करावी लागते  समुद्राच्या बाजूने गरम वाळूतून जाताना थोडी कसरत करावी लागते.
समुद्राकडे तोंड करून असलेल्या रूम मध्ये 
आम्ही बॅग ठेवली 
आणि पहिल्यांदा कोकणी  जेवणाचा आस्वाद घेतला,
संध्याकाळी समुद्र किनारी फेरफटका मारताना खूप आनंद वाटत होता
संध्याकाळच्या कातरवेळी त्या  लाटांकडे बघितल्यावर मनातली जळमटं पार विरून गेली.किती सुंदर होत्या त्या लाटा! एकेक लाट स्वच्छंदपणे खेळणारी , उत्साही, वेगळाच आहे हा भोगवे समुद्र किनारा.
त्या लाटांमध्ये तेवढ्याच मनमुरादपणे किनाऱ्यालगत आम्ही दोघे उभे. . . 
"वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आनंद"
कुमुदच्या गोड गळ्यातुन व्यक्त झालेली भावना ती हृदयातून आली होती
भावना तीच.....व्यक्त करण्याची अचूक  वेळ व ती हटके पद्धत मात्र वेगळी 
त्या सहजीवनातल्या व्यतीत झालेल्या जगण्यावर ती प्रेम करणारी  भावना माझ्या हृदयात स्थिरावली  आणि अश्या या वेळी  किनाऱ्यावर येणारी प्रत्येक लाट पाहताना मला अस वाटू लागलं की या लाटेनी  जणू पक्क ठरवलंय  की किनाऱ्याला भेटुनच यायचंच, कुणाचीही तमा न बाळगता.  आपलं प्रेम दर्शविणारी एकेक पांढरी लाट अन् त्यावर मावळत्या सूर्यप्रकाशाची सोनेरी किनार, ते बघताना , जरतारी पांढरे वस्त्र लेऊन ती लाट किनाऱ्याला भेटायला येते आणि
कुमुदच्या व्यक्त केलेल्या भावनेत मिसळून जाते , अश्या अनोख्या भेटी मुळे  मला माझा आजचा वाढदिवस खूप आगळा वेगळा वाटला

एकच मिनिट हं । 

कुमुद ने जपून आणलेला शिवाय स्वहस्ते केलेला केक कापून सागर किनारी वाढदिवस साजरा केला.
व्वा! किती सुंदर  . . . . !!!
रात्री रिसीर्ट वर एक वीस बावीस वर्षाचा ,हसरा तरुण भेटायला आला 
नाव काय तुझे ?

सागर  !  
उद्या सकाळी डॉल्फिन राईड करायची आहे ना, त्या साठीच भेटायला आलोय

फक्त डॉल्फिन राईड नको, कांही खास दाखवशील का?

म्हणजे ?

अरे  सुनामी बेट, शिंपली बेट ,कवडा  बेट
व  जवळपासचे सगळे पॉईंट बघून झालेत, 
थोडं कांही वेगळं दाखवशील का?

साहेब , पहाटे सव्वा पाचला तयार राहव्वा, नक्कीच कांही तरी वेगळं दाखवतो
मी फक्त त्याच्या कडे पाहून हसलो
कुमुद ने त्याला केक दिला, तो खुश झाला

पैसे किती द्यायचे?

समजून कांही पण द्या. . !

तो पैशासाठी काम करत  नव्हता,

पहाटे पाच लाच आम्ही तयार झालो
पाच दहा ला सागर ची हाक आली

साहेब sssss !!!

कांही अंतरापर्यंत आम्ही कार नी गेलो
थोडे डाव्याबाजूला चालत गेल्यावर समुद्र किनारा दिसू
लागला, सागर नी आपली बोट तयार ठेवली होती
खरतर ती फिशिंगची बोट होती, प्रवासी नव्हती

सागर, अरे   सेफ्टीजॅकेट कुठे आहेत ?

दोन मिनिट थांबा सायबानू लगेच आणतो

साधारण पाच चाळीस ला आम्ही सी राईड ला निघालो

अजून उजाडले नव्हते
समुद्र शांत होता

सायबानो तुमच्या साठी नाश्ता आणलाय बर का!
हे ठेवा।

त्यांनी आमच्या साठी घावन व खोबऱ्याची चटणी आणली होती, 

आई नी लवकर उठून  बनवलं. . 

किती प्रेमानी सांगत होता तो

व्वा ! छान, त्यांना धन्यवाद सांग

अर्ध्या तासात तो एका बेटा जवळ येऊन थांबला

हे बेट तुम्ही नक्कीच पाहिला नसणार,
कारण इथे कोणाला यायला परवानगीच नाही

आमच्या रिसोर्ट पासून आम्ही खूप लांब आलो होतो
आणि खरोखर आम्ही हे बेट पाहिले नव्हते

त्याच्या नांवेला त्यांनी नांगर केलं
व पूर्वे ला आम्ही चालत निघालो
त्या खडकाच्या बाजूने चालताना पाय घसरत होते
अजुनी पूर्ण उजाडले नव्हते
एका खडका जवळ जाऊन तो थांबला
आम्हाला त्या खडकावर त्यांनी बसवले
तो बाजूला थांबला
समोर अथांग सागर, पण शांत...!
हेलकावणार्या लाटा...!!
थंडगार वारा....!!!
जिकडे पाहिलं तिकडे नुसते पाणीच पाणी....!!!!
कांही क्षणात रंगी बेरंगी आकाश दिसू लागले
लाटांचा वेग वाढू लागला. .!
आम्ही बसलेल्या खडकावर त्या धडकू लागल्या
पूर्वेकडील क्षितिज तांबड्या,पिवळ्या,नारंगी रंगानी
सजू लागले        
आणि. . . !!!
सुर्यनारायणाच्या आगमनाची चाहूल लागली
बालसुर्यानी आपले अस्तित्व दाखवले
खूप लांबून समुद्राच्या पाण्यातुन तो उगवू लागला
तसे समुद्राच्या लाटांना वेग येऊ लागला व आम्ही
बसलेल्या खडकावर आदळून ते फेसळलेले समुद्राचे पाणी आमच्या वर पडू लागले
जस जसा सूर्य वरती वरती येऊ लगला तसे तसे त्या खडकावर आदळलेल्या लाटानवर सुर्यप्रकाश पडू लागला व ते फेसळलेले
पाणी सप्तरंगी होऊन आमच्यावर बरसू लागले
बराच वेळ आम्ही तो सप्तरंगी फवाऱ्यात मस्त खडकावर बसून 
भिजत राहिलो, अवर्णनीय आनंद मिळत राहिला,
इतक्यात सागर ची धडपड चालू झालेली दिसली
मी व कुमुद त्या खडकवरून उठलो

अरे सागर काय झाले?

साहेबानू, समोर पहा!

त्या अथांग समुद्रात बऱ्याच लांब,  एक बोट हेलकावताना दिसत होती
सागर ची नाव नांगरातून निसटून समुद्रात निघून गेली होती

साहेब तुमचे जरा ते सेफ्टीजॅकेट द्या

मी त्याला दिल्यावर 
साहेब घाबरू नका बर का
मी येतोच आपली बोट घेऊन 
असे म्हणून त्यांनी त्या बोटीच्या दिशेने उडी मारली सुद्धा...
आम्ही थक्क होऊन फक्त त्याच्या कडे पहात राहिलो
समुद्राच्या लाटावरून तो लीलया पोहत आपल्या बोटी जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता
आम्ही  त्या बोटी कडे व सागर कडे पहात खडकावर उभे होतो
काही वेळात ते दोघेही दिसेनासे झाले
मग मात्र आम्ही कांहीसे घाबरलो
पण  उसने धैर्य आणत एकमेकांना समजवत राहिलो
आठ वाजत आले होते , दोन तास आम्ही खडकावर बसून राहिलो होतो. समुद्रात उडी मारण्या अगोदर त्याचा मोबाईल
घड्याळ सगळं टाकून गेला होता तो
आम्ही रिसीर्ट मालकाला फोन करण्याचा वायफळ प्रयत्न करू लागलो , त्या बेटा वर रेंजच नव्हती
कुमुदने आणलेला कालचा केक व त्यांनी दिलेला नाष्टा व आणलेला कांही खाऊ आम्ही  तश्या भीतीयुक्त वातावरणात फस्त केला, 
आता नऊ वाजत आले होते
आमचा कोणाशीच संपर्क होत नव्हता
चार तास झाले तरी सागरचा कांहीच पत्ता नव्हता
नको नको ते विचार येत होते
पण व्यक्त कसे करायचे असे एकमेकांना वाटू लागले
आताआम्ही ज्या खडकाजवळ थांबलो होतो तिथे समुद्राने आपले अस्तित्व विस्तारले होते 
प्रत्येक लाटे बरोबर खेकडे येऊ लागले होते 
कांही मिनिटात खूप खेकडे आजूबाजूला जमा झाले
आम्हाला भीती वाटू लागल्याने
त्या बेटाच्या वरच्या भागात जाण्या साठी रस्ता शोधू लागलो
एका ठिकाणी पाय वाट दिसली, एकएकटे जाऊ शकत होतो.
पायवाटेने जाताना बऱ्याचदा काट्याची झाडे हाताला लागत होती, रस्ता वळणाचा होता त्या मुळे पुढे काय असेल याचा अंदाज येत नव्हता, पुढे कुमुद होती व ती चालत असल्याने मला तिच्या मागे जावेच लागत होते
वाऱ्याने पाने सळसळली तरी एक अनामिक भीतीची लकेर
उठायची 
जरी छोटे बेट वाटत असले तरी आता खूप चालतोय असे वाटू लागले होते
चालता चालता कुमुद एकदम थांबली
त्या बेटा वरती छोटेशे पठार होते
एक बऱ्यापैकी उंच झाडा भोवती स्वच्छ केलेली जागा दिसली
ती शेणाने सारवल्या सारखी दिसत होती, व एक कोपऱ्यात
नुकतीच लावलेली उदबत्ती होती,तिचा सुगंधी वास पसरला होता
स्वच्छ जागा व उदबत्ती लावलेली दिसल्या मुळे नक्कीच
कोणीतरी असावे म्हणून हाका मारल्या
पण कोणीच प्रतिसाद दिला नाही
पुन्हा एक अनामिक भीती मनांत उदभवली,
आम्ही दोघे ही तिथे खालती बसलो
थोड्याश्या विश्रांती नंतर आम्ही नकळत  तिथे बसून गुरुगीता म्हणू लागलो, गुरुगीता झाली आरती म्हंटली आणि जयजयकार केला,  थोडे धैर्य आले

आता अकरा वाजत आले होते
सागर चा तरी पत्ता नव्हताच तो म्हणाला होता या बेटा वर यायला परवानगी नाही म्हणून
म्हणजे आता कोणच  इथे आले नाही तर....!!!
पुन्हा गुरुदेवांना नमस्कार केला व विनवणी केली
आम्हाला आमच्या जागेवर सुखरूप पोहचवा
तेव्हड्यात तिथे मोबाईल वाजू लागला
रिसोर्ट मधून फोन होता
आम्ही थोडक्यात सर्व सांगितले
कांही वेळात दुसरी बोट आली  आणि आम्ही रिझोर्ट वर सुखरूप पोहचलो
रिसोर्टच्या मालकांनी विचारले

कसे काय गेलात त्या बेटावर?  सागर पण वेडा मुलगा आहे

सागर कसा आहे, कुठे आहे तो

अहो तो अजून सापडला नाही  त्याच्या शोधत गेलेत आठ दहा बोटी.
काळजात चर्र झाले

तीन वाजता आम्ही त्याच्या घरी गेलो
त्याची आई दारातच बसली होती
आतून सागरचा आवाज आला
साहेबानू  आत या की
घाबरला नाही ना? 
सागर तू केंव्हा आलास
आत्ताच, अर्धा तास झाला
अहो बोट खुप लांब चालली होती
मध्येच एका डॉल्फिन चुकून बोटीत पडला
ते पाहून तीनचार डॉल्फिन ने बोट अडवली
मी तीन चार तास समुद्रात पोहून दमलो होतो
बोट काय हाताला लागत नव्हती
पण डॉल्फिन ने अडवल्या मुळे मला बोटी जवळ जाता आले
मी बोटीत जाऊन त्या अडकलेल्या डॉल्फिन ला बाहेर काढले
मग कांही केल्या बोट चालू  होईना
पोहून दमल्या मुळे वल्हवता पण येईना
लांबून बोट जात होत्या
त्यांना इशारा करत होतो
एकच्या दरम्यान आठ दहा बोटी एकदम आल्या
त्यांच्या मदतीने परत आलो
आता तुमच्या कडेच  येणार होतो
कांहीच झाले नसल्या सारखे तो बोलत होता,
आम्ही रिसोर्ट वर आलो
असा आगळा वेगळा वाढदिवस साजरा झाल्याने आम्ही दोघांनी गुलदस्त्यातच ठेवण्याचे ठरवले  कारण जावई व मुली न कडून ओरडा खायचा नव्हता, खूप फिरायचे होते

पण अजून पर्यंत त्या बेटावर त्या वेळी कोणी उदबत्ती लावून गेली होती ते मात्र कळत नव्हते..


                                                    श्री पाटील..


टाईमपास..!


जोशीकाका पुणे महानगरपालिकेतून निवृत्त झाले त्याला चार पाच वर्षे होऊन गेली होती. काकांना ना चित्रपटांची आवड ना टीव्हीवरच्या मालिकांची. त्यामुळे निवृत्तीनंतर ते टाईमपास कसा करतात हा त्यांच्या मित्राला पडलेला यक्षप्रश्न.

"जोशा, लेका तुला ना काही छंद , ना वाचनाची आवड, ना अध्यात्माची. रिटायर झाल्यावर टाईमपास तरी कसा करतोस तू ?"

जोशी काकांना आपल्या मित्राच्या भोचकपणाची आणि नसत्या चौकशा करण्याच्या वृत्तीची चांगली कल्पना होती. त्याच्या डोक्यात एकदा हा कीडा वळवळला आहे म्हणजे त्या शंकेचं निरसन होईस्तोवर तो आपल्याला काही सुखाने जगू देणार नाही हेही त्यांना ठाऊक होतं. 

"तुला कालचीच गोष्ट सांगतो," काकांनी शंकासमाधानाला सुरुवात केली. "मी आणि बायको गेलो होतो पु ना गाडगीळमध्ये. पाचच मिनिटे दुकानात डोकावलो. बाहेर येऊन बघतो, तर दुकानासमोर पार्क केलेल्या गाडीशी ट्रॅफिक पोलीस येऊन ऊभा - हातात पावतीपुस्तक.

आम्ही दोघेही कावरेबावरे होत त्याच्याकडे गेलो आणि अजीजीने त्याला सांगू लागलो - "बाबा रे, मोजून पाचच मिनिटे गेलो होतो रे. एक वेळ सोडून दे." 

तशी तो म्हणू लागला, "सगळेजण दर वेळी असंच म्हणतात. आपली चूक कबूल कोणीच करत नाही. हजार रुपयांची पावती फाडावी लागेल. एकदा पावती फाडली म्हणजे पुढच्या वेळी चूक होणार नाही."

"तसे नाही, आमची चूक समजली आम्हाला. पुन्हा नाही होणार असं. आणि हजार रुपये म्हणजे फार होतात हो. आम्ही निवृत्त कर्मचारी आहोत हो. आमच्या पांढऱ्या केसांकडे तरी बघा."

"लाखांच्या गाड्या फिरवता, पु ना गाडगीळमध्ये खरेद्या करता,  कायदा मोडता आणि तुम्हाला हजार रुपये जड होतात होय ? बरं चला, तुम्ही वयस्कर आहात, म्हणून तुमच्याकडून फक्त दोनशे रुपये घेतो आणि देतो सोडून तुम्हाला या वेळी."

" 'त्या दोनशे रुपयांची पावती मिळेल ना ?' माझा निरागस प्रश्न" - जोशी काका सांगत होते. तशी वस्सकन अंगावरच आला तो हवालदार. 

"ओ, पावती हवी असेल तर हजारचीच होईल हो. दोनशेची काही पावती बिवती मिळणार नाही."

"असं कसं ? पैसे दिल्यावर पावती नको ? सगळं कसं नियमानुसार व्हायला नको का ?  सरळ सांग ना, तुला लाच खायची आहे म्हणून."

माझ्या या बोलण्याने तो एकदम भडकलाच. आणि मग माझंच वाक्य धरून बसला. 

"अस्सं म्हणताय काय ? सगळं नियमानुसार व्हायला पाहिजेल काय ? मग होऊनच जाऊ दे. मी म्हटलं म्हातारी माणसं आहेत, जरा सबुरीने घेऊ, तर तुम्ही मलाच अक्कल आणि कायदे शिकवताय ! चला, सगळे नियमच काढतो तुमचे आता." हवालदाराने रौद्र रूप धारण केले.

आणि मग तो हात धुऊन गाडीच्या मागे लागला. एक आरसाच तुटलेला आहे, मागची नंबर प्लेटच नीट नाहीये, PUC संपलेलं आहे - तीन चार हजार रुपयांपर्यंत मामला गेला.

हे फारच वाढतंय म्हटल्यावर मी बायकोला म्हटलं - तू सांगून बघ, तुझं ऐकतोय का तो ते.

ती त्याला म्हणाली, "अरे बाळा, तू असं रागावू नकोस. हे काय बोलले ते मनाला लावून घेऊ नकोस. सोडून दे. त्यांच्याकडे लक्ष नको देऊस तू. हे घे दोनशे रुपये."

पण आता तो हवालदार काही ऐकण्याच्या पलीकडे गेला होता. 

"नको मला तुमचे ते दोनशे रुपये. आता पावतीच फाडणार मी."

मग पुढे पाच दहा मिनिटे हे असंच चाललं, ती त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होती आणि दुखावला गेलेला तो, पावत्या फाडल्याशिवाय थांबणार नव्हता." जोशी काका सांगत होते.

"अरे बाप रे ! दोनशे रुपये वाचवायला गेलास आणि हे भलतंच होऊन बसलं. मग काय केलं काय तुम्ही शेवटी ?" - मित्राची पृच्छा.

"मग काही नाही, आमची बस आली, आम्ही त्यात चढलो आणि घरी आलो." 

"आं ? मग गाडी ? तिच्या पावत्या ? दंड ? आणि तो हवालदार ?" मित्राला काहीच उमगेना.

"काय संबंध ? ती गाडी आमची नव्हतीच रे. आम्ही तर बसने आलेलो.

तू मला विचारलंस - मी टाईमपास कसा करतो, ते मी तुला सांगत होतो.

आम्ही बसमध्ये चढलो तेव्हा त्या हवालदाराच्या तोंडावरचे भाव मात्र पहाण्यासारखे होते - आत्ता तुझ्या चेहऱ्यावर आहेत ना, तसेच होते अगदी !"

जोशी काका निर्विकारपणे म्हणाले आणि आणखी टाईमपास करायला नवीन गिऱ्हाईक शोधू लागले..


                                                      श्री पाटील..

ना खंत ना दुःख..!


घरच्या देव्हाऱ्याच्या तोरणाची निर्माल्याच्या दिशेने रवानगी होत असताना तुटलेल्या धाग्यातून ओघळून एक झेंडू खाली पडला. 

तो कालच्या इतका टवटवीत नसला, तरी अजूनही रंग-रूप राखून होता. 
थोडं निरखून पाहिलं त्याच्याकडे, तो तटस्थ होता. 
आपले जीवितकार्य संपल्याचा शोक त्याच्या पाकाळ्यांवर दिसत नव्हता. 

गडद केशरी रंग आपली शान टिकवून होता. 
हिरव्या देठाचा भाग असंख्य पाकळ्यांना सांधून होता. 
हार करताना अंतर्बाह्य गेलेल्या सुईच्या जखमा पोटात दडवून होता. 
धागा आरपार जाताना नाईलाजाने विभक्त झालेल्या पाकळ्या झेंडूची ओळख लेवून बाहेर पडल्या होत्या. कित्येकांच्या पायदळी तुडवल्या जाऊनही त्यांच्या सुकोमलतेत रागाचा, द्वेषाचा, सुडाचा लवलेश नव्हता. 
त्यांच्या ठायी भावना होती ती फक्त समर्पणाची ! 

एवढी सहनशक्ती, एवढा संयम, एवढं समर्पण करूनही आपल्या दातृत्वाची कुठेही वाच्यता न करता, त्याने आपला प्रवास पूर्ण केला होता...

फुल असूनही गंध नाही,
रूप असूनही गर्व नाही,
सण लोकांचा साजरा केला,
आता निर्माल्य झाल्याचेही दुःखं नाही...


                                                श्री पाटील..

सातवी पिढी..!

जुन्या काळात प्रत्येक गावाला गायरान जमीन असायची. गावातील जित्राबे अर्थात गोधन तिथे चरत असते. त्या माळरानावरच गाईंचे आणि म्हशींचे पोषण होणार. थोडक्यात खायला घालायचा खर्च शून्य होता. 

शेण आणि गोमुत्र शेतात वापरले जाई... उन्हाळ्यात शेतात मेंढपाळ मेंढ्या आणून रात्री मुक्काम करत. त्यांच्या लेन्ड्यांचे खत शेताला होत असे. 

शेत जमीन बैल नांगरत असत. त्यामुळे शेतातील गांडूळ हे शेत जमिनीला सच्छीद्र ठेवण्याचे कार्य करत असत. 

दुध हे जवळ जवळ फुकट असे.. त्यामुळे ते किती निघते आहे याचा विचार कोणी करत नसे. घरच्या पुरते निघाले तरी खूप आहे हाच भाव असे. 

गायी आणि बैल जवळ जवळ फुकट चरत असत. थोडेफार अतिरिक्त म्हणजे शेंगदाण्याची पेंड द्यायची, घरातील आंबोण द्यायचे आणि वरून लागलेच तर शेतातील पिकांचीच उरलेली वैरण घातली जाई.  गोधनाचे ओझे वाटत नसे.  

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा खेड्यातून ब्राह्मण हाकलून दिले... 

मग गावातील पुढार्यांनी गायरान जमिनीवर अतिक्रमण करायला दलितांना उद्युक्त केले. 

मला सांगा स्वातंत्र्याच्या पूर्वी पण गावात दलित रहात होतेच ना ? त्यांना राहायला जागा होतीच ना ? 

पण स्वातंत्र्याच्या नंतर गायरान जमिनींवर अतिक्रमण करायची काय गरज पडली असेल , याचा विचार करा.

मी पूर्ण जबाबदारीने सांगतो आहे दलितांची अतिक्रमणे फक्त १० %  असतील. बाकीच्या सगळ्या जमिनी या गावातील गुंडांनी आणि पुढार्यांनी हडप केल्या आहेत. 

मग स्वातंत्र्यानंतर आपल्या सगळ्याच प्रशासनाला दलितांचा उमाळा आला होता. त्यामुळे गायरान जमिनींची सगळी अतिक्रमणे नियमित केली गेली.. रामदास आठवले या माणसाचे राजकीय करियर त्यावर घडले आहे.. 

या षडयंत्रात जोवर आठवले होते तोवर ते साधत होते आणि तोवरच ते पवारांचे लाडके होते. हा कार्यभाग संपला की आठवले यांना दूर केले गेले.. 

गायरान जमिनी संपल्या आणि मग शेतकऱ्याला गोधन स्वतः पोसण्याची वेळ आली. आता हा अव्यापारेषु व्यापार सुरु झाला. कारण गायीचे दुध इतके जास्त नसते की त्यातून तिच्या सर्व पालनपोषणाचे खर्च भागतील.. 

म्हणून मग जर्सी गायी आणि म्हशी वाढल्या... जर्सी गायी देशात आणताना नेत्यांनी खा खा पैसे खाल्ले.

यात देशी गोधन उध्वस्त झाले. म्हणजे ब्राझील आपल्या गायींची सुधारित जात निर्माण करतोय आणि आपण आपल्या देशी गायींचे वाण राखण करण्यात अपयशी ठरतोय.

आता म्हैस पोसणे परवडावे म्हणून ऑक्सिटोसिन हे संप्रेरक इंजेक्शन आले. त्याचा वापर सुरु झाला. ते बेकायदेशीर आहे पण धडल्ल्याने सुरु झाला आहे. 

यामुळे असे दुध पिणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात हार्मोन्स चे संतुलन ढासळू लागले आहे.

आजकाल बहुसंख्य आयुर्वेदिक डॉक्टर लहान मुलांना दुध देऊच नका असे चक्क सांगू लागले आहेत. 

कारण हार्मोन्स चे संतुला हरपले की मुली वयात लवकर येतात. हे संतुलन ढासळवणारे घटक म्हणजे अन्न. 

पहिले झाले संप्रेरक इंजेक्शन मारलेल्या जनावरांचे दुध आणि 

दुसरे अन्न म्हणजे कृत्रिम रित्या किण्वन प्रक्रिया करून तयार होणारे अन्नपदार्थ अर्थात सर्व स्वरूपाचे बेकरी उत्पादन. यात किण्वन कृत्रिम पद्धतीने केले जाते आणि हे अन्न पोटात गेल्याने सुद्धा हार्मोन्स चा balance ढासळू शकतो.  

आणि तिसरे डोळ्यांवर होणारा सेक्स चा भयंकर मारा..... 

यात आई बाप बेअक्कल झाले आहेत.. माझी पोरगी बॉलीवूड गाण्यावर किती छान नाचते वाली क्रेझ या मुलींचे बालपण गिळून टाकत आहे. सिरियल्स मधील व्यभिचार, चित्रपटातील आयटम सोन्ग्स नावाचे पोर्न. 

या लहान मुलींना वेगळे पोर्न पहाण्याची गरजच नाही.. टीव्ही , चित्रपट soft porn तुम्हाला रोज खायला घालतच आहे. 

परिणाम....

मुलींची पाळी लवकर येते आहे... 

या विषयावर एक तरी समाजशास्त्रज्ञ बोलताना दिसतो आहे का ?

शेतीच्या पातळीवर आपण नैसर्गिक खत वापर जवळ जवळ बंद केला आहे. त्यामुळे शेतात शेण गोमुत्र टाकणे, मेंढ्या बसवणे या गोष्टी घडत नाहीत. जोडीला tractor चा वापर सुरु झाला ज्यामुळे जमीन खोलवर नांगरली जाते आणि उलटीपलटी केली जाते , ज्यात जमिनीच्या पृष्ठभागालगत असणारे गांडूळ आणि अन्य सूक्ष्मजीव सूर्याच्या प्रकाशाला एक्स्पोज होऊन मरतात. शेतीची सच्छीद्रता संपते... 

आपण युरिया वापर सुरु केला आणि गांडूळ मारून टाकला. आता आपली शेतभूमी सच्छीद्र नाही. कारण नैसर्गिक jcb जो जमीन सच्छीद्र ठेवायचा तोच जागेवर नाही... परिणाम थोडा पाऊस पडला तरी आपली पिके नासून जातात. कारण पाणी जमिनीत मुरतच नाही. 

युरियाचा मारा केलेले पिक सुध्दा आपल्या पोटात जाते आहे त्याचा परिणाम सुद्धा हार्मोन्स चे संतुलन ढासळवण्यास कारणीभूत होतो आहे. 

या निंदनीय कृत्याला कळत न कळत शेतकरी कारणीभूत होतोय... हे त्याला तरी उमजते आहे का ?

हे सगळे चक्र उलट फिरवल्याशिवाय आपण अन्न म्हणून जे विष खातो आहोत ते थांबणार नाही. 

यातला सर्वात मुख्य घटक गाय आहे आणि तिला नीट पोसायचे असेल तर गायरान जमीन असणे आवश्यक आहे.  

यातला एक जरी मुद्दा चुकीचा वाटला तर शेतकरी बंधूंनी आणि मित्रांनी सांगावे. बदल केला जाईल... 

पण यात शेतकरी बंधूंनी हे सुद्धा समजून घेतले पाहिजे की गेले ४०-५० वर्ष तुम्ही ज्यांना निवडून देत आहात त्यांनी तुमचा आणि समाजाचा नक्की कुठे आणि कसा गळा कापला आहे. 


                                                 श्री पाटील..

दोष हा कुणाचा..!

एका हाॅटेलमध्ये जेवायला गेलो होतो. शेजारच्या टेबलावर चार मुली बसल्या होत्या. त्यांचं जेवण आटोपलं, वेटर ने बडीशेपचा बाऊल समोर ठेवला. चारही मुलींनी टिश्यू पेपरमध्ये बचकभर बडीशेप भरून घेतली आणि ती पुरचुंडी पर्समध्ये टाकली. आजूबाजूच्या १०० माणसांमध्ये असूनही आणि चांगल्या कुटुंबातल्या असूनही असं करताना त्यांना काहीही वाटलं नाही. 

अनेक काॅलेजवयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींना मी हाॅटेल्समधून चमचे चोरतानाही पाहिलं आहे. विमानातून प्रवास करताना काही मंडळी अक्षरश: ओंजळी भरभरून चाॅकलेट्स किंवा टाॅफीज् घेतात. काही रेल्वे प्रवासात पाण्याच्या बाटल्या प्रवाशांना दिल्या जातात. अनेकजण दोन-दोन किंवा तीन-तीन बाटल्या सुद्धा घेतात. रेल्वे प्रवासात (केवळ त्या प्रवासापुरतेच मिळणारे) टर्किश नॅपकिन्स सर्रास बॅगेत भरतात. साॅस किंवा साखरेची ट्रॅव्हलिंग पाऊचेस न विचारता उचलणे, टीबॅग्ज उचलणे, टिश्यू पेपर्सचा गठ्ठाच उचलणे हे प्रकार माणसं अगदी बिनधास्त करतात. 

एकदा एका ट्रेक ला गेलो होतो आणि एका रिसाॅर्टवर राहिलो. तिथं आलेल्या एकानं शॅम्पूचे सॅशे आणि साबणाच्या छोट्या वड्यांचा बाॅक्सच उचलून नेला. एका सुशिक्षित, जाणत्या बाईंनी लाॅबीमध्ये सहज म्हणून वाचण्याकरिता ठेवलेली दोन मॅगेझिन्स उचलली आणि पर्समध्ये घातली. हा प्रकार आजूबाजूची माणसं, हाॅटेल व्यवस्थापनातले कर्मचारी पाहत होते. पण कुणी काही विरोध केला नाही. 

घराजवळच्या हाॅट चिप्स च्या दुकानात गेलो होतो. दोन मुली आल्या. त्यांनी सात-आठ प्रकारचे वेफर्स टेस्ट करून पाहिले आणि काहीही खरेदी न करता निघून गेल्या.  दुकानाचा मालक म्हणाला, “ऐसे तो बहोत लोग आतें हैं , सब के सब पढें-लिखे और अच्छे घर के ही होतें हैं । पता नहीं, ऐसा क्यूॅं करतें हैं?” 

रस्त्यावरच्या एखाद्या फळविक्रेत्याकडे गेलात आणि फळं खरेदी करायची असतील तर एखादं फळ चवीपुरतं चाखायला देतो. काहीजण स्वत:च हात पुढं करून सात-आठ फळं तर उभ्या-उभ्या सहजच मटकावतात. चणे विक्रेते किंवा चुरमुऱ्यांची भट्टी चालवणाऱ्यांना तर हा अनुभव दररोज शंभरदा येत असेल. माणसं अगदी स्वत:चा हक्क असल्यासारखा हात घालतात. 

मंडईत गेलो होतो. कैऱ्या विकणाऱ्या एका वयस्कर विक्रेतीसमोर एक काकू उभ्या राहिल्या. विक्रेतीनं भाव सांगितला आणि कैरीची एक फोड कापून त्यांच्या हातावर ठेवली. कैरीची फोड खात-खात काकू एक अक्षरही न बोलता निघून गेल्या. आम्ही दोघेही शेजारीच उभे होतो. तो प्रसंग पाहून आम्हालाच कसंतरी झालं. 

चांगली शिकली-सवरलेली माणसं अशी का वागत असतील? आपण परदेशातल्या लोकांकडून त्यांची भाषा, राहणीमान, कपडे, फॅशन्स हे सगळं घेतलं पण सार्वजनिक आयुष्यात ती माणसं किती संतुलितपणे वागतात,हे आपण नाही स्वीकारत..! 
कॅरीबॅगसाठी दुकानदारांशी हुज्जत घालणारी सुशिक्षित जनता मी पाहतो, तेव्हा मला त्यांच्या सुशिक्षितपणाचाच अर्थ लागत नाही. नुसतंच बाह्यरूप पाॅश करून आपण सुशिक्षित असल्याचा आभास निर्माण करत राहण्याच्याच कृत्रिम देखाव्याच्या चक्रात माणसं अडकली आहेत का? 

हा बिनबुडाचा सुशिक्षितपणा केवळ अशा चोऱ्या-माऱ्या आणि उचलाउचलीचे उद्योग करून थांबत नाही. उघडपणे सामाजिक नियम मोडण्यातही हा वर्ग आघाडीवर आहे. 

पेट्रोलपंपावर मोबाईल फोनवर गप्पा मारणे, एटीएम सेंटरमध्ये गाॅगल्स, स्कार्फ किंवा टोपी घालून जाणे, सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर खुशाल धूम्रपान करणे, सार्वजनिक ठिकाणी भर रस्त्यात बिनदिक्कतपणे थुंकणे, या गोष्टी करून माणसं नक्की काय दाखवण्याचा प्रयत्न करत असतात? 

नामवंत काॅलेजेसमध्ये शिकणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी पार्किंग आणि नो पार्किंगमधला फरकही ओळखू शकत नाहीत का? सुशिक्षित माणसं मुद्दामच झेब्रा क्राॅसिंगवरच का थांबतात? शिकली-सवरलेली माणसं बसस्टाॅप सोडून भर रस्त्यावर गर्दी करून बसची वाट का पाहतात? खिशात पैसे असूनही बस कंडक्टर ला फसवून विनातिकीट प्रवास का करतात?

लक्ष्मी रस्ता हा जसा बाजारपेठेचा रस्ता आहे तसं ते माणसांच्या अतरंगीपणाची लक्षणं पाहण्याचंही एक ठिकाण आहे. माणसं रस्त्यातच आपली भलीमोठी चारचाकी गाडी थांबवून दुकानासमोर उतरतात आणि ड्रायव्हर ती गाडी रस्त्यातच उभी करून , काचा वर करून, आतमध्ये एसी लावून बसलेला असतो. बाकीची वाहतूक कोलमडून जाऊन याच्या नावानं शंख करत असते, पण हा एकदम कूल..! 

माणसं कुल्फी घेतील आणि काड्या रस्त्यावरच टाकतील. मक्याचं कणीस घेतील, उरलेला भाग रस्त्यावरच टाकतील. प्लास्टिकच्या ग्लासात काॅर्नभेळ घेतील, रिकामा ग्लास रस्त्यावरच टाकून मोकळे.. याच रस्त्यावर मोबाईल फोनवर बोलत रस्ता क्राॅस करणारे अनेकजण दिसतील. नो एण्ट्री तून वाहने चालवणारे अनेकजण दिसतील. ही सगळी मंडळी लौकिकार्थानं किमान ग्रॅज्युएट तरी निश्चित असतात. पण, सार्वजनिक ठिकाणी कसं वागावं आणि कसं वागू नये, असा कुठला पेपर त्यांच्या कोर्समध्ये नसतो, त्यामुळे त्या विषयाचा त्यांना गंध नसतो. त्यामुळे, सार्वजनिक जीवनात सगळे नापास!

अनेक ठिकाणी खाऊगल्ल्या आहेत, तिथले खाद्यपदार्थ विक्रेते संध्याकाळी व्यवसाय संपला की, सांडपाणी थेट रस्त्यावर टाकून देतात. त्यामुळे तो रस्ता अस्वच्छ, चिकट होतो, माशा घोंगावतात. पण सार्वजनिक ठिकाणचं त्यांचं हे वागणं आपण कुणीही मनावर घेत नाही.

भर रात्री बारा वाजता झोपलेल्या जगाला जागं करून वाढदिवस साजरा करणारा एक नवीन वर्ग तयार झाला आहे. ही मंडळीसुद्धा सुशिक्षित असतात. अनेकदा काॅलेजात शिकत असतात. पण, भर रात्री केकच्या दुकानाबाहेरच टोळकं जमवून ज्याचा वाढदिवस आहे अशा उत्सवमूर्तीच्या तोंडाला, डोक्याला येथेच्छ केक फासून, त्याला दारू पाजून लाथाबुक्क्यांनी बदडून काढणे, त्याच्या डोक्यात अंडी फोडणे असे प्रकार करतात. हे सगळं चांगलं वागणं आहे का? आणि एकविसाव्या शतकातल्या समाजाला हे शोभतं का?

ही मंडळी असं का वागतात, याला काहीही उत्तर नसतं.अशी कितीतरी लोकोत्तर व्यक्तिमत्त्वं आपल्याला ठायीठायी दिसतील. ही माणसं उघडपणे चोऱ्या करतात, गरिबांना नाडतात, त्यांना त्रास देतात,  स्वत:च्या वागणुकीनं इतरांचं सार्वजनिक आयुष्यही पार खराब करून टाकतात. 
आपण यावर कधी आक्षेप घेतला आहे का? 
लोकांना दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसेल पण स्वत:च्या ताटातलं मुसळ दिसणार नाही. 

गाय दूध देते तेव्हा ते चांगलंच असतं. पण, आपण ते नीट तापवलं नाही तर ते नासणारच. म्हणून, मग आपण गायीला दोष देणार का? तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं दही कळकलं तर दोष दह्याचा नसतो आणि भांड्याचाही नसतो, दोष दही तांब्याच्या भांड्यात ठेवणाऱ्याचा असतो. 
आपण नेहमी प्रशासनाकडे, सरकारकडेच बोटं दाखवत राहू, आरोप करत राहू. सरकारकडून आपल्या अपेक्षा फार मोठ्या असतात, पण साध्या साध्या गोष्टी जपण्यातही आपण स्वत: कमी पडतो. स्वत:ला पारखलं आणि स्वत:च्या वागण्यातले दोष दूर करायचं ठरवलं तर प्रगतीला सुरूवात होईल..सगळं मळभ जाऊन आभाळ स्वच्छ होईल..!


                                                   श्री पाटील..

घर ओसाड झालेले..!

 एक सेठजी होते, ते आपला व्यवसाय दिवसरात्र वाढवत असत. त्यांना फक्त शहरातील सर्वात श्रीमंत माणूस बनायचे होते. हळूहळू पण शेवटी ते शहरातील सर्वात श्रीमंत सेठ बनले.

या यशाच्या आनंदात त्यांनी भव्य घर बांधले. गृहप्रवेशाच्या दिवशी त्यांनी एक भव्य पार्टी आयोजित केली होती.
सर्व पाहुणे निघून गेल्यावर तेही झोपायला त्यांच्या खोलीत गेले. दमून ते बेडवर पडताच त्यांना आवाज आला...

"मी तुझा आत्मा आहे, आणि आता मी तुझे शरीर सोडत आहे!!"

सेठ घाबरले आणि म्हणाले, "अरे! तू हे करू शकत नाहीस!!, तुझ्याशिवाय मी मरेन."
बघा, अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर मला हे यश मिळाले आहे. आता या यशाचा आनंदाने उपभोग घेण्याची संधी चालून आली आहे.शंभर वर्षे टिकेल असे मजबूत घर मी बांधले आहे. कोट्यवधी रुपयांचे हे घर, सुखसोयींनी भरलेले आहे, मी ते फक्त तुमच्यासाठी बांधले आहे!, इथून जाऊ नका.

आत्मा म्हणाला, "हे माझे घर नाही, माझे घर तुझे शरीर होते, आरोग्य तिची शक्ती होती ...
मात्र कोट्यवधी कमावण्याच्या नादात तुम्ही त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले आहे.
आपल्या छंदांची रद्दी तो भरत राहिला, पण त्याला खंबीर बनवण्याकडे लक्ष दिले नाही. तुमच्या बेजबाबदारपणाने हे अमूल्य शरीर नष्ट केले आहे.

आत्माने स्पष्ट केले, "आता त्याला रक्तदाब, मधुमेह, थायरॉईड, लठ्ठपणा, पाठदुखी यांसारख्या आजारांनी घेरले आहे तुम्हाला नीट चालता येत नाही, रात्री झोप येत नाही, तुमचे हृदयही कमकुवत झाले आहे. तणावामुळे, न जाणो किती इतर रोग घर करून बसले आहेत, हे तुमचे शरीर!!"

"आता तूच सांग,
तुला अशा मोडकळीस आलेल्या घरात राहायला आवडेल का, कमकुवत आणि असुरक्षित भिंतींनी वेढलेले,
ज्याची चौकट ढासळत आहे,
वाळवी फर्निचर खात आहे,
प्लास्टर आणि पेंट उडून गेले,
साफसफाई नीट होत नाही,
इकडे तिकडे घाण साचून राहते.
ज्याचे छत गळत आहे.
तुम्हाला अशा घरात राहायला आवडेल का?
राहायला आवडणार नाही!! ,
त्यामुळे मीही अशा घरात राहू शकत नाही."

सेठ भीतीने पश्चातापाने थरथर कापुलागले!! आता जीवाला थांबवायची ताकद ना हिंमत त्यांच्या मध्ये उरली होती. एक दीर्घ श्वास सोडत आत्मा सेठजींच्या शरीरातून निघून गेला. त्यांचा मृतदेह बंगल्यात पडला होता.


                                                     श्री पाटील..

माहेरची मदत सासरचा घाटा..!



     "नाना, तुम्ही काय बोलताय? मेघाने ऐकलं तर वाईट वाटेल तिला, हे चुकतंय तुमचं" प्रदीप वडिलांना समजावून सांगत होता.
      "का? मी घाबरतो का तिला?मेघाच्या आईला ऑपरेशनसाठी दोन लाख रुपये तुम्ही दिलेत हे चुकीचं नाही? त्यांनी त्यांची सोय नको करायला? असं मुलीकडून घेणं शोभत का तिच्या माहेरच्यांना? आणि तूही परवानगी दिलीस " नाना तावातावाने बोलत होते आणि मेघा बेडरूममध्ये स्वतःला शांत करत होती.
      मेघा, स्वतः इंजिनिअर, ME झालेली, मोठ्या कम्पनीत चांगल्या हुद्द्यावर गलेलठ्ठ पगाराची नोकरी असणारी पण माहेरची परिस्थिती बेताची. भाऊ स्वतःच्या पायावर उभा होता पण अचानक आलेल्या एवढ्या मोठ्या खर्चाची जबाबदारी उचलण्याएवढं त्याचं saving नव्हतं. आईचं ऑपरेशन अचानक समोर आल्यावर तिने आपणहून निम्मा खर्च उचलला त्यामुळे दादा वहिनीला हायसं वाटलं. तसं माहेरही स्वाभिमानी असल्याने त्यांनीही कधी मागितलं नव्हतं.
     वातावरण निवळल्यावर मेघा मनाशी काहीतरी ठरवून हॉलमध्ये आली. "आई, नाना मला बोलायचंय तुमच्याशी. मगाशी मी मुद्दाम बाहेर आले नाही कारण शब्दाने शब्द वाढवायचा नव्हता. मागे एकदाही याच कारणावरून तुम्ही चिडचिड केली होती त्यामुळे मी आता माझं मन मोकळं करणार आहे."
      प्रदीपला मात्र टेन्शन आलं होतंच, आता भांडण होणार की काय? "माझे बाबा अत्यन्त गरीब घराण्यातून वर आलेले. पण आपल्यासारखं इतरांचं होऊ नये म्हणून त्यांनी खूप जणांना मदत केली त्यामुळे ते गेले तेव्हा त्यांच्याकडे फार शिल्लक नव्हती. पण परोपकाराच्या पुण्याची saving आणि गौरवाची प्रॉपर्टी होती, जी आजही आहे. 
      त्यांच्याकडे नसतानाही, 'ही मुलगी आहे, दुसऱ्याचं धन होणार' असा विचार न करता त्यांनी मला शिकवलं, मोठं केलं आणि आज माझ्या नावाचा दबदबा आहे. तुमच्या भाषेत तुम्हाला कळेल असं बोलायचं तर पहिले म्हणजे त्यांनी माझ्यावर जो खर्च केला त्यापेक्षा मी त्यांना आता दिलेली रक्कम खूप कमी आहे."
     "दुसरं असं, मी गेली बारा वर्षे नोकरी करते आहे. Average ५०,००० पगार पकडला तर वर्षाला सहा लाख म्हणजे एकूण ७२ लाख कमावलेत, त्यातले माझ्यासाठी स्वतःसाठी खर्च केलेले म्हणजे दागिने, कपडे, क्वचितच एखादा सिनेमा वा हॉटेलमधील जेवण, हे वजा करता कमीतकमी ६० लाख तर नक्कीच घरात दिलेत. शिवाय बाईसारखे राबण्याचे, स्वयंपाकाचे महिना पाच हजार वाचवले म्हंटलं तर निदान सहा लाख असे एकूण ६६ लाख, माझ्या शिक्षणावर ज्यांनी एक रुपयाही खर्च केला नाही त्यांच्यावर मी खर्च केले. जर हा माझाच संसार असेल तर माहेरचीही माणसं माझीच आहेत एवढं लक्षात ठेवा." मेघा ज्या शांतपणे गणितं मांडत होती नानांचा चेहरा पडत होता आणि प्रदीपला हसू येत होतं.
      "थांबा हं, अजून संपलं नाहीये. दोन प्रकारच्या मुली असतात. एक ज्या स्वावलंबी नसल्याने आयुष्यभर माहेरावर अवलंबून रहातात, बरेचवेळा स्वाभिमान गुंडाळून! आणि दुसऱ्या ज्या स्वतः स्वावलंबी होऊन माहेरचा अभिमान होतात. मी दुसऱ्या प्रकारातली आहे हे सांगायला नकोच. पहिल्या प्रकारातली कोण आहे हेही तुम्हाला माहित आहे !" असं म्हणताच प्रदीपला तर ठसकाच लागला आणि आई नानांचा चेहरा मुलीमुळे खाडकन उतरला.
       "नाना, तुम्हाला दुखावणे हा हेतू नक्कीच नाही. फक्त तुम्हाला समजेल अशा भाषेत समजावून सांगितलं. एका घरात आपण गुण्यागोविंदाने रहातो, एकमेकांना सांभाळून घेतो, मग तसेच जर मी माझ्या माहेरी वागले तर का सलतं? मी शिक्षित, नोकरदार असून जेवढं सासरसाठी करते त्याच्या एक शतांश जरी माहेरसाठी, ज्यांनी मला घडवलंय त्यांच्यासाठी करू शकले तर तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे. असं बोलू नये पण पहिलं आणि शेवटचं ठासून सांगते, मी गरजेला माझ्या माहेराच्या पाठीशी उभी रहाणारच! स्वतःचा संसार उघड्यावर टाकून परमार्थ करण्याएवढी मी महान नाही, ती अक्कल मलाही आहे. हे जर पटत नसेल तर माझ्या साठ लाखाचा हिशोब चुकता करा उद्याच्या उद्या मी दादाकडून पैसे परत मागते." मेघाच्या अंगातली झाशीची राणी आज प्रदीपने प्रथमच पाहिली होती. मेघाच्या बोलण्याशी सहमत असल्याची पावती तो त्याच्या मौनातून देत होता.
      चक्क सासूबाई म्हणाल्या, "खरंय पोरी तुझं. हे प्रत्येक लेकीने केलं पाहिजे. आम्ही चुकलो, पण आता नव्या पिढीने चूक सुधारावी!"
     "आलं लक्षात "म्हणत नाना त्यांच्या खोलीत गेले.
     हे सगळं बघणाऱ्या आर्याच्या डोळ्यात आईविषयी अभिमान आणि भविष्यातील आत्मविश्वासाची चमक दिसत होती.



                                                       श्री पाटील..

बाप लेकाचा अनोखा खटला..!

आपल्या मुलाबद्दल तक्रार करता यावी म्हणून एक वृद्ध माणूस न्यायालयात दाखल झाला. 
न्यायाधीशांनी विचारले की तुमची काय तक्रार आहे.
वृद्ध वडील म्हणाले, मला माझ्या मुलाकडून त्याच्या परिस्थितीनुसार महिन्याचा खर्च हवा आहे.
न्यायाधीश म्हणाले की, हा तुमचा अधिकार आहे. यामध्ये सुनावणीची गरज नाही. तुमचा सांभाळ तुमच्या मुलाने केलाच पाहिजे. ते त्यांचं कर्तव्यच आहे.
वडील म्हणाले की मी खूप श्रीमंत आहे. माझ्याकडे पैशांची कमतरता नाही. पण तरीही मला माझ्या मुलाकडून दर महिन्याचा खर्च घ्यायचा आहे.
न्यायाधीश आश्चर्यचकित झाले,ते त्या वृद्ध वडीलांना म्हणाले "जर तुम्ही इतके श्रीमंत आहात तर तुम्हाला तुमच्या मुलाच्या पैशांची काय गरज आहे ?"
यावर त्या वृद्ध वडीलांनी आपल्या मुलाचे नाव आणि पत्ता सांगितला. वडील न्यायाधीशांना म्हणाले, माझ्या मुलाला कोर्टात बोलावलं तर तुम्हाला सगळं नीट कळेल.
न्यायाधीश त्या मुलाला कोर्टात बोलावून घेतात आणि सांगतात की, तुमच्या वडीलांना दर महिन्याला तुमच्याकडून खर्च हवा आहे,मग तो कितीही असो, तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला तो द्यावा लागेल.
न्यायाधीशांचं बोलणे ऐकून मुलगा गोंधळून जातो आणि म्हणतो, माझे वडील तर खूप श्रीमंत आहेत, त्यांच्याकडे पैशांची कमतरता नाही मग त्यांना माझ्या पैशांची काय गरज आहे ?
न्यायाधीश म्हणतात, ही तुमच्या वडीलांची मागणी आहे आणि त्यांचा हक्क पण आहे.
मग वडील म्हणतात, न्यायाधीश महोदय, तुम्ही माझ्या मुलाला सांगा की, त्याने मला दरमहा फक्त १०० रुपये द्यावे, परंतु अट अशी आहे की त्याने स्वतःच्या हाताने मला पैसे आणून द्यावेत आणि ते पैसे देण्यास कोणताही विलंब होता कामा नये.
न्यायाधीश म्हणतात, ठीक आहे, तुमच्या मनासारखं होईल. मग न्यायाधीश त्या मुलाला सांगतात की, तुम्ही दर महिन्याला १०० रुपये तुमच्या वडिलांना विलंब न करता हातात आणून देत जावे आणि हा कोर्टाचा आदेश आहे, त्याचे तुम्ही पालन कराल ही अपेक्षा !
खटला संपल्यावर न्यायाधीश त्या वृद्ध वडिलांना आपल्याकडे बोलवतात. तुमची काही हरकत नसेल तर मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे. तुम्ही इतके श्रीमंत असताना तुमच्या मुलावर हा खटला का दाखल केला आणि मुलाकडून फारच तुटपुंजी किंमत का मागितली ? असे का ??
आता मात्र त्या वृद्ध वडीलांचे डोळे पाणावले. न्यायाधीश साहेब,मला माझ्या मुलाचा चेहरा पाहण्याची खूप इच्छा होती, तो त्याच्या कामात इतका व्यस्त आहे की, मला त्याला भेटून बरेच दिवस झाले आणि समोर बसून तर सोडाच पण मोबाईलवर ही कधी आम्ही बोललो मला खरच् काही आठवत नाही. 
माझे माझ्या मुलावर खूप प्रेम आहे.म्हणूनच मी त्याच्यावर हा खटला दाखल केला, जेणेकरुन दर महिन्याला तो माझ्यासमोर येईल, त्याला पाहून माझ्या मनाला आनंद होईल.
वृद्ध वडीलांचे म्हणणे ऐकून न्यायाधीशांच्या डोळ्यात अश्रू आले. न्यायाधीश म्हणाले, तुम्ही जर हे मला आधी सांगितले असते तर वडीलांना दुर्लक्षित केल्याचा आणि सांभाळ न केल्याच्या गुन्ह्याची शिक्षा मी तुमच्या मुलाला सुनावली असती.
यावर ते वृद्ध वडील हसतमुखाने न्यायाधीशांकडे बघतात आणि म्हणतात, माझ्या मुलाला शिक्षा झाली आणि ते ही माझ्यामुळे या सारखे वाईट काय ! कारण माझा त्याच्यावर खूप जीव आहे आणि माझ्यामुळे त्याला शिक्षा किंवा त्रास झालेलं मला कधीच सहन होणार नाही.
हे सर्व तो मुलगा लांबून ऐकत असतो. आता मात्र त्याच्याही डोळ्यातील अश्रूंचा बांध फुटतो. तो धावत येतो आणि वडीलांना मिठी मारतो. बस्स ! अजून काय हवं असतं म्हातारपणी आईवडीलांना....
मित्रांनो हजारो माणसं भेटतील आयुष्याच्या प्रवासात, पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आईवडील पुन्हा मिळणार नाहीत... हो ना ..!



                                                    श्री पाटील..

राधा ही बावरी..!


रंगात रंग तो श्यामरंग
पाहण्या नजर भिरभिरते
ऐकून तान, विसरुन भान
ही वाट कुणाची बघते
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनी
साद ऐकुनी होई
*राधा ही बावरी हरीची*
*राधा ही बावरी.....*

               बांदोडकरांच्या स्वप्नीलने गायलेल्या नि चंद्रशेखर सानेकरांनी लिहिलेल्या गाण्यानं साद घातली, की आपणही राधाकृष्णाच्या अनोख्या प्रेमानं राधेसारखे बावरे होतो. अभंगापासून ते फ्यूजनपर्यंत, उस्तादांच्या बंदिशीपासून ते *राधा ही बावरी* या नव्या गाण्यातल्या राधेच्या भक्तीचं आणि प्रीतीचं प्रतीक आपल्यावर विलक्षण भुरळ घालतं.

               या गाण्यातल्या ओळींचा जसा वेध घेऊ लागतो,श्रतसा राधा-कृष्णाच्या प्रेमसंबंधाची रंग, गंध, नाद आणि स्पर्शाच्या मार्गांनी नवी ओळख होते. त्या शब्दरुपांतून हिरव्या गर्दरानातली, सोनसळी पानांतली श्रावणसरींनी सचैल भिजलेली चारुगात्री राधा साकार होते. कृष्णाच्या बासरींत नादावलेली, मृदगंधानं भारावलेली राधा हरिदर्शनासाठी आतुरली आहे आणि त्यात हा उनाड वारा....कृष्णाच्या धीट अन् खट्याळ स्पर्शाची हुरहुर लावतो आहे. त्याच्या वेणूचे सूर सारखे खुणावत आहेत. बावरलेल्या नजरेनं, चिंब भिजलेली राधा त्या शामलवर्णी श्रीकृष्णाला तिथे शोधत आहे. तेवढ्यात, तो त्या कबतरुतळी साक्षात सामोरा येतो. राधेची पावले थबकतात, तोच हा मनमोहन, घनश्याम, ही त्याची सावळी तनु, त्याच्या डोईवरचं मोरपीस, अंगावरील रानफुलांच्या माळा, हाच तो वनमाळी.....हरपलेल्या चित्तानं राधा कृष्णाच्या स्वाधीन होते. त्याचे उष्ण श्वास आणि नसानसांतून ओसंडणारं प्रेम, त्याचा दिव्य स्पर्श....हे अलैकिक दृश्य पाहायला ढगाआडून चंद्र डोकावतोय. आपणही या रोमांचक अनुभवानं थरारतो. हे मिलन दोन मनांचं. माया आणि ब्रह्माचं....त्यातून विलक्षण ऊर्जा आपल्याला आयुष्यभर पुरुन उरणारी..



                                               श्री पाटील..

आमचं हळदी कुंकू..!


हॅलो... पिंकी.. अग ऐक ना... 
- काय ग सुमे.. आहेस कुठे.. किती दिवसांनी कॉल केलास? मी जिवंत आहे का खात्री करायला केलास का ग मने? 

ए हॅलो... जरा तोंड आवर ग... जिवंत आहेस म्हणूनच केला असंच समज, पण गप्प बस आणि मी काय सांगते ऐक. 

- बोल बाई बोल... ऐकते, शाळेत असतानाही तुझीच दादागिरी आणि आताही तुझीच. बोल तू... 

हो, दादागिरीच, आता शांतपणे ऐक आणि नंतर तुझ्या 'सोसो' बाईंना पण सांग, तुला जमणार नसेल सांगायला तर मी येऊन सांगते त्यांना, तू माझ्याकडे हळदीकुंकवाला येणार आहेस म्हणून, बावळटासारखी 'छाछु बाई मी ज्याऊ क्याय' करत बसू नको.
रविवारी माझ्याकडे हळदीकुंकू आहे... फक्त आपले म्हणजे तू , मी, पद्मि, कविता, विभा, अर्पि, अंजु, आणि अजून तुझ्या ओळखीत कोणी आपल्या सारख्या असतील तर त्यांना ही सांग. किमान बारा जणी व्हायला हव्यात. 

- काय... काय ग बरी आहेस ना... एकदम हळदीकुंकू? हे गं काय नवीन खुळ? ते ही फक्त आपले?? 

हो, फक्त आपले, नवरे नसलेल्या, लग्न न केलेल्या किंवा घटस्फोट घेतलेल्या बायकांचे. चल ठेवते फोन अजून बाकीच्यांना कॉल करायचे आहेत.. 

पिंकी आणि मनी दोघी अगदी बालवाडीत पासून एकाच वर्गात आणि एकाच वाडीत रहाणाऱ्या, साहजिकच शाळेत जाणं-येणं, खेळ, अभ्यास... सर्व एकत्रच होत असे. बालपणाच्या आठवणी मागे ठेवून ते दिवस कधीच कापरासारखे उडून गेले.. या दोघींच्या बरोबर सर्वच मित्रमैत्रिणी मोठे होऊन आपापल्या मार्गाला लागले.. अनेक मैत्रिणी लग्न होऊन वेगवेगळ्या गावी गेल्या आणि अगदी मोजक्याच या गावात राहिल्या!
मनी.. म्हणजे मनीषा.. जन्मजात तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेली... कधी एखादी वस्तू-खेळणं हवं म्हणून हट्ट करावा अथवा रडावं लागलं नाही, प्रचंड लाडात पण शिस्तीत वाढलेली! दुःख म्हणजे काय याची सावलीही तिला कधी शिवली नाही.. अर्थात तिच्या लग्नापर्यंतच. त्या नंतर सासर अगदी घराजवळ व तितक्याच तोलामोलाचं मिळालं.. खरंतर तिने कॉलेजला असतानाच अगदी प्लॅनिंगकरून त्याला जाळ्यात ओढलं आणि लग्न ही केलं. तशी ती जात्याच कोणालाही न घाबरणारी त्यातही खानदानी श्रीमंतीमुळे वागण्यात आलेला थोडा बेदरकारपणा यामुळे घरच्यांचा विरोध असतानाही तिने स्वतःच्या मर्जीने लग्न केलं, तिच्याच जातीतल्या मुलाशी, ते ही 'मी आत्ता लग्न करायला जातेय दाखवा अडवून' असं चॅलेंज देऊन! त्यामुळे नंतर जरी घरच्या लोकांबरोबर संबंध पूर्ववत झाले तरी चुकलेल्या निर्णयाची तोशीष तिने कधी माहेरच्या लोकांना लागू दिली नाही. लग्नानंतर काही वर्षातच दारुत आकंठ बुडालेला नवरा म्हणजे गळ्यातील धोंड झाली तिच्या. त्यातच त्याच्या पैशासाठी एकीने याला जाळ्यात ओढला आणि तो ही नवीन फ्लॅट घेऊन तिच्यासोबत राहू लागला. हे कळताच सासऱ्यांना भरीस पाडून प्रॉपर्टीची वाटणी करून घेत त्याच्यासह स्वतःचे नाव लावून घेण्याचा शहाणपणा दाखवला. मुख्य म्हणजे तेव्हा सासूबाईंनीही खंबीरपणे सुनेची बाजू घेतली! मी सर्व सोडून आलेय आता परत जाणार नाही, इथेच रहाणार तू जा घर सोडून असं नवऱ्याला निक्षून सांगून नंतर रीतसर विभक्त झाली होती ती. या गोष्टीलाही आता किमान दहा वर्ष होऊन गेली !
त्या नंतर मात्र कोणताही सण असला की तिच्या मनात एक अनामिक भीती निर्माण व्हायची. नटण्या मुरडण्याची आवड असणारी ती सण आला की कोशात जायला लागली. विशेषतः कुठे हळदीकुंकू असलं की तिच्या घरी बोलावणं तर यायचं पण हिला जाणवेल असं सासूबाईंच्या नावाचा पुकारा करत ते केलं जायचं व केवळ तोंड देखलं 'तू ही ये ग.. ' असं म्हणून तू येऊ नको हेच सुचवलं जायचं. सासूबाई कितीही प्रेमळ व खंबीर असल्या तरी या समारंभाच्या वेळी त्यांचीही द्विधा मनस्थिती व्हायची. एकदा त्या बळेच हिला स्वतः बरोबर हळदीकुंकवाला घेऊन गेल्या आणि तिकडून येताना आपल्याच मैत्रिणीच्या घरुन इतरांनी दिलेलं टोमण्यांचे वाण घेऊन घायाळ होऊन दोघीही परत आल्या! त्या नंतर मात्र दोघींनीही या समारंभाला जाणेच सोडले. दोन वर्षांपूर्वी सासरे अचानक गेले, आता तर आपल्याला हळदीकुंकवाचे कधीच बोलावणे येणार नाही हे स्पष्ट होताच तिच्यातला बंडखोरपणा उफाळून वरती आला आणि या वर्षी हळदीकुंकू करणारच असं तिने मनोमन ठरवून टाकलं! 

वरचा कॉल हा त्यासाठीच होता. 

सर्वात आधी तिला पिंकीच आठवली दोघींच्या आयुष्याची कथा फार वेगळी नव्हती... फक्त, पिंकीचे लग्न घरच्यांनी ठरवलेल्या मुलाबरोबर झालं, पदरात दोन कच्ची बच्ची टाकून एक दिवस तो जो गायब झाला त्याचा गेल्या पंधरा वर्षात कुठे पत्ता लागला नाही... सांगणारे सांगतात कोणी वेगवेगळ्या गावाची नावं घेत तिकडे पाहिला म्हणून, पण जोवर आपलं माणूस आपणाहून घरी येत नाही तोवर त्याला आपलं तरी कसं म्हणावं? असो... तर ही पिंकी मात्र अजूनही सासूबाईंच्या नजरेच्या धाकात. साधं भाजी आणायला बाजारात जायचं तरी त्यांच्या परवानगीने! त्यातही ती बाहेर पडताना त्यांच्या नजरेचे स्कॅनर निमिषार्धात सर्व गोष्टी टिपून घेतात तेव्हा हिला स्वतः चीच चीड येते आणि ती त्यावर काहीही करु शकत नाही म्हणून परत हतबल- निराश ही होते. जेव्हा नवरोबा गायब झाले त्याच वर्षी तिला हळदीकुंकवाला जायला सासूबाईंनी मनाई करून 'तुमचं कुंकू घरी आलं की जावा मिरवायला...' असं म्हणून हे तिच्या आनंदाचे क्षण कुपीत बंद करून टाकले! अर्थात एका अर्थी त्यांनी बाकी बायकांच्या तिला 'बिच्चारी' करुन टाकणाऱ्या नजरा व टोमण्यांपासून वाचवले ही.

एक एक करता करता आयुष्यात नवरोबाची जागा रिक्त असणाऱ्या ओळखीतल्याच सात आठ जणी सहज नजरेसमोर आल्या. प्रत्येकीची कथा वेगळी पण सारांश आणि व्यथा एकच! नवरा नाही म्हणून प्रत्येक सण-समारंभात सपत्नभावाची वागणूक! यांचा काहीही दोष नसताना सगळीकडे कानकोंडं होऊन वागायला लागायचं... सहज बोलतानाही समोरचा गोड शब्दात जखमेवरची खपली काढुन वार करुन जायचा! विशेषकरून यात ओळखीचे महिलामंडळच अग्रेसर!! 
या साऱ्या मनस्ताप देणाऱ्या मानभंग करणाऱ्या गोष्टी टाळून कोणत्याही दबावाशिवाय या साऱ्या मैत्रिणींसह मनसोक्त गप्पा मारत अगदी हसत खेळत हा कार्यक्रम व्हावा अशीच तिची इच्छा होती. यात तिच्या आई म्हणजे सासूबाईही साथीला होत्याच. खरोखरच दुसरी आई होत्या त्या! येणाऱ्या प्रत्येकीला लुटण्यासाठी काय ठेवायचं असा प्रश्न समोर येताच त्या उत्स्फूर्तपणे म्हणाल्या कुठे केवड्याचे पोये मिळतात का बघ.. आपलं बायकांचं आयुष्य तसंच असतं... केवड्या सारखं.. स्वतःला काट्यात बांधून संपर्कातील प्रत्येक गोष्ट सुगंधित करत जाणारं... अगदी वाळून गेलो तरी सुगंधाची उधळण करणारं...! 
आस्ते आस्ते तो हळदीकुंकवाचा दिवस उजाडला... त्या दिवशी नशिबाने केवड्याचे पोये ही मिळाले होते... पूर्ण घरभर केवड्याच्या गंध पसरला होता. सकाळीच मनिषाने मोहक आणि मयुरेशला - तिच्या मुलांना त्यांच्या फार्महाऊसवर पिटाळले होते, दोघेही लेक आता हाताशी आले होते, हळूहळू घरच्या व्यवसायात त्यांना सामील करुन घेत होती ती. ते गेल्यानंतर मात्र ती प्रत्येकीला कॉल करत संध्याकाळी येण्याची आठवण करुन देण्यात मग्न होती. आज येणारी प्रत्येक मैत्रीण-शेजारीण तिच्यासाठी खास होती... येणारीच्या आयुष्यातही आजची संध्याकाळ संस्मरणीय व्हावी अशी तिचीही मनापासून इच्छां होती! एक नवी सुरुवात काहीवेळ तरी मोकळा श्वास घेण्याची... लादली गेलेली बंधने काही काळ तरी झुगारून आपली नटण्या मुरडण्याची, खळखळून हसण्याची संधी आज प्रत्येक जण परत साधणार होती. आमंत्रण केलेल्या प्रत्येकीला घरातून निघताना नाही म्हटलं तरी थोडं दडपण असणार हे जाणून मनीषाने बाहेरच्या व्हरांड्याच्या बाजूच्या खोलीत पायातल्या खटव्या जोडव्यापासून गळ्यातल्या मंगळसूत्रापर्यंत आणि पावडर लिपस्टिक पासून टिकली, नेलपेंट, गजऱ्यापर्यंत सर्व तयार ठेवलं होतं. येणाऱ्या प्रत्येकीने तिकडे जाऊन नीट तयार होऊन यायचं ही अटच होती तिची! आज ती स्वतः तिच्या आईंसह अगदी भरगच्च बांगड्या, वेणीत गजरा, ठसठशीत कुंकू, मंगळसूत्र घालून तयार झाली होती. एक एक मैत्रीण यायला लागली, आधी नाही नाही म्हणत नंतर अगदी आनंदाने सर्व साजशृंगार करुन तयार झाल्यावर प्रत्येकीच्या चेहेऱ्यावर एक वेगळा आनंद विलसत होता. रोजच्या वागण्यातली मरगळ-उदासीनता कुठच्या कुठे पळून गेली होती. जसजशा बायका यायला लागल्या तसे एकमेकींबरोबरच्या गप्पा हस्यविनोदात घर बुडून गेलं.. प्रत्येक जण आपल्याला आलेले अनुभवही एकमेकांना सांगत होती. त्यातच आईंच्या ओळखीतल्या एक खूप वयस्क आजीची सामील होत्या, सर्वांनीच त्या येताच खूप मनापासून व जल्लोषात त्यांचं स्वागत केलं... त्याचे लग्न तर त्या केवळ बारा वर्षाच्या असताना झालं आणि प्लेगच्या साथीत सतराव्या वर्षी त्यांचा संसार संपला.. सर्व सुखाची- संसाराच्या इच्छा आकांक्षांची, सणवाराची आहुती तेव्हाच पडली होती. त्यांचं केशवपन झालं आणि अंगावर आयुष्यभरासाठी लाल लुगडं आलं.. आपल्या आयुष्यात परत कधी असा दिवस उजाडेल याची त्यांनी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. आधी थोडं कानकोंडं होत त्याही अट म्हणून किंचित पावडर लावून आल्या मात्र त्यांना असे बघताच मनिषाच्या सासूबाई त्यांना बळेबळेच परत खोलीत घेऊन गेल्या. त्यांची स्वतःचीच एक घडी न मोडलेली वजनाला हलकी अशी छान नऊवारी घेऊन आल्या आणि अगदी हक्काने आजींना ती नेसण्याचा आग्रह करकरून नेसायला लावली. नंतर सर्व आभूषणे अंगावर घातली आणि हलकेच मंगळसूत्र त्यांच्या हातात दिलं... हा निर्णय मात्र आईंनी त्या आजींच्यावर सोपवला! आपले थरथरणारे हात जास्तच कंपित होत आहेत असं आजींना वाटलं.. एकदम थिजून गेल्या त्या.. त्यांनी एकवार आईंकडे पाहिलं तेव्हा आईंची नजरच त्यांना 'घाला ते ही एकदातरी' असं सांगून सुचवून गेली. आजींनीही हलकेच आपला गळा त्या सौभाग्यलेण्याने भरुन टाकला आणि अनेक दशकांपूर्वी गमावलेल्या आपल्या जोडीदाराची आठवण येऊन सद्गतीत झाल्या. त्यांच्या खांद्यावर धीराचा आश्वासक हात ठेवत एक हात धरून आई आजींना घेऊन हॉलमध्ये येताच सर्वजणी आश्चर्याने त्यांच्याकडे पहातच राहिल्या मग तर त्यांचीही हलकी चेष्टा मस्करी झाली. जेव्हा मनिषाने मोबाईल मध्ये त्यांचा फोटो काढून त्यांना दाखवला तेव्हाचे त्यांच्या चेहेऱ्यावरचे भाव टिपून घेण्यासारखे होते. फोटो बघत असतानाच 'माझं आयुष्य जाळून कोळसा झालं ग चिमणे...' अस म्हणत त्या पुन्हा रडायला लागताच मनिषाने पटकन त्यांनाच उखाणा घेण्याची गळ घातली आणि सर्व जणींना शांत रहायला सांगितले. परत एकदा दुःखाचे भाव नाहीसे झाले आणि एक छानसा उखाणा घेऊन त्या सर्वांच्या आनंदात सामील झाल्या. "हे खरं हळदीकुंकू, माहित नाही पुढच्या वर्षी मी असेन नसेन पण आज मी आनंदात आहे अगदी तृप्त झाले" असं गहिवरून सांगत त्यांनी सर्वच जणींना शुभाशिर्वाद दिले. अशीच थोडी वेगळी कथा होती अस्मिताची.. 
अमित ची स्मिता म्हणून हीचे नाव लग्नात तिनेच हौसेने बदलायला लावून अस्मिता ठेवायला लावलं, पण... केवळ पाच वर्षांचा संसार करुन अमितला एका भीषण अपघातात गमावल्यावर तीन वर्षांची इरा पदरात घेऊन आता ती आयुष्याशी दोन हात करत होती. काही काळानंतर तिने परत एकदा संसाराचा सारीपाट मांडलाही असता पण आज मात्र ती इथे यांच्यातीलच एक होती! अस्मिता येताना सोबत इरालाही घेऊन आली होती आणि ही छोटी बाहुलीही आल्यावर मस्त नटून सगळीकडे सराईतपणे वावरत होती. अस्मिता रोज ऑफिसला जाताना जरी सौभाग्यलेणं घालत होती तरी त्या मागचा उद्देश वेगळा होता. आज मात्र इथे तिच्या मनात काहूर उठलं... अमितच्या आठवणींनी ती बेचैन झाली, मात्र काही मिनिटातच स्वतःला सावरुन ती सगळ्याजणींबरोबर आनंदाच्या या जल्लोषात सामील झाली! 
स्वयंपाकघर सांभाळत सर्वजणींची सरबराई करणाऱ्या सुशिलाताईनाही आज वेगळे नियम नव्हते, त्या ही आपलं वेगळेपण न विसरता जमेल तितकं सर्व गोष्टीत सामील होत होत्या. मात्र त्यांना त्यांचे अनुभव सांगायचा आग्रह केल्यावर अनुभव ऐकताना समाजातील श्वापदांचा निकटचा वावर सर्वांच्या अंगावर शहारे उमटवून गेला! शेवटी त्या मात्र निर्विकारपणे म्हणून गेल्या.. "भायेरचे लांडगे परवडले, मी समर्थ हाय अजून बी त्यांला धडा शिकवायला पन घरचा लांडगा लय वाईट त्याला रोकता  बी येत नाय नि घालवता बी येत नाय त्या परिस त्यो मेला त्येच बेस झालं न्हाईतर मीच एक दिस त्याचा मुडदा बशिवला असता. मला आजिबात वाईट वाटलं न्हाय कुकू मिटल्याचा"
नंतर सर्वजणींना गोड मिठाई, मसाला दूध आणि तिळगुळ देऊन तोंड गोड करत हातात एक छानसा कुंकवाचा करंडा, रोजच्या उपयोगात येईल अशी भेटवस्तू व केवड्याचा पोया असं सर्व एक सुंदर पिशवीत भरून देण्यात आले... हे सर्व सुरु असतानाच अचानक सागर तिथे आला.. हा सागर म्हणजे शहरातील नामवंत फोटोग्राफर! त्याचे आगमन होताच सर्वजणी अक्षरशः नाचायच्या बाकी राहिल्या! नंतर जवळजवळ तासभर केवळ आणि केवळ एकमेकींच्या गळ्यात गळे घालून तसंच वेगवेगळ्या पोज देत तर कधी एक एकटीचे फोटो काढण्याचा कार्यक्रम सुरू होता, सर्वच जणींच्या उत्साहाला उधाण आले होते... हे आनंदाचे क्षण फोटोच्या रुपात प्रत्येकीलाच परत परत अनुभवता येणार होते. जणू प्रत्येक फोटोत काळ गोठवून ठेवला जात होता... शेवटी सर्वजणींचा ग्रुप फोटो घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली!
त्या नंतर मात्र काहीजणी सर्व मेकअप वगैरे धुवून परत आपल्या आधीच्या कोशात सुरक्षितपणे बंदिस्त झाल्या... जणू सत्यातून स्वप्नात आणि स्वप्नातून परत सत्यात... वास्तवात परत आल्या!! आता हल्लीच्या प्रथेप्रमाणे एकमेकांचे नंबर शेअर करण्यात आले, लगेचच एक  छान व्हाट्सप ग्रुप तयार झाला!!
एकंदरीत सर्व कार्यक्रम मनीषा आणि तिच्या आईंच्या अपेक्षेपेक्षा खूपच छान झाला, अतिशय उत्साहात पार पडला. आज प्रत्येकीला परत एक सौभाग्याच्या आनंदाची गंगा सापडली होती जी दरवर्षी एकदा नक्कीच भरभरून वाहणार होती.. अगदी नक्कीच...!



                                                     श्री पाटील..


असेही एक वडील..!


ते जाणार हे सहा महिन्यांपूर्वीच माहित झालं होतं सर्वांना. शेवटच्या स्टेजला असलेल्या आतड्याच्या कर्करोगाचं निदान करायला निष्णात डॉक्टरची देखील गरज नव्हती. अण्णा आता काही महिन्यांचे सोबती होते. त्याने मुलगा म्हणून जे शक्य उपचार होते ते केले. शेवटचा महिनाभर तर हा स्वतः सबंध वेळ शेजारी बसून होता. बिनपगारी रजा काढून. 

आम्हा सर्वांनाच आश्चर्य वाटत होतं. तसं करायची काहीच गरज नव्हती. केस लास्ट स्टेजची होती. त्यांच्या जायची वाट पाहायची होती आणि कमीत कमी त्रास होऊन ते जावेत एवढी प्रार्थना करण्या पलीकडे कोणाच्याच हातात काही नव्हते. पण हा ऐकायला तयार नव्हता. 

शेवटी तो दिवस आला. अण्णा गेले. आम्ही जवळचे मित्र हेच त्याचे नातेवाईक. अण्णांच्या विचित्र स्वभावामुळे मुळातच कमी असलेले नातेवाईक केव्हाच दुरावले होते. इतके की त्यांना दोन वर्षांपूर्वी नानी गेल्या हे देखील माहित नव्हते. तेव्हा पासून अण्णा आणि हा दोघेच घरात.
     
नानी गेल्यावर अण्णांचं घरातून बाहेर पडणं कमी झालं. वाचन, टीव्ही कशाचीच विशेष आवड नव्हती त्यांना. BPT मधून निवृत्ती घेतल्यावर घरीच असायचे. मिळालेल्या फंडाची पै न पै फिक्स्ड डीपोझीटला टाकून त्याच्या व्याजावर आणि पेन्शनवर चालले होते त्यांचे. फालतू खर्च करायचा नाही हा अण्णांचा शिरस्ता. 'गरज' ह्या पलीकडे केलेला कोणताही खर्च वायफळ वाटे त्यांना. आयुष्यभर १८० फुटाच्या डबल रुम मध्ये राहिले. खरं तर ब्लॉक घेणे सहज शक्य होते त्यांना. पण नाही. हा म्हणायचाच, “माझा बाप कवडी चुंबक आहे म्हणून साला मी मित्रांची थोटक ओढून आणि बियर शेयर करून मी आनंद घ्यायचा. माझ्या वाढदिवसाला मित्रच पार्टी देणार. माझा बाप पैसे दाबूनच गचकणार."

बर ह्याला लहानपणापासून पोलियो. उजवा पाय पूर्ण लुळा. डाव्या हाताच्या हालचाली देखील restricted आणि बुद्धी सामान्यच्या खालची. शाळेत आमच्या बरोबर रमला. जेमतेम पास होऊन कॉलेजला आर्टसला गेला. ते काही झेपलं नाही. मग कॉलेज सुटलं मधेच केव्हातरी. मग बारीक सारीक नोकऱ्या, उद्योग. वडापावची गाडी, लॉटरीचा स्टाँल सगळं करून झालं. आमची शिक्षणं होऊन संसार सुरु झाले. ह्याचं लग्नकार्य काहीच नाही. तो म्हणायचा देखिल, “साला आम्ही रोकडा प्यारवाले. आम्हाला तुमच्या सारखं आयतं घरात नाही मिळत. आम्ही काँग्रेस हाऊस आणि सुखलाजी स्ट्रीटला जाऊन जेवतो.” 
ते बरोबर की चूक ह्यात आम्ही कधीच पडलो नाही किंवा त्याला सांगायला गेलो नाही. कारण तो करतो ते चूक मग बरोबर काय ह्याचे उत्तर निदान त्याच्या पुरते तरी आमच्याकडे नव्हते.

त्याने त्याच्यासाठी सोय शोधून ठेवली होती. अण्णांच्या ओळखीतून एका दुकानात मालाची बुकात एंट्री करायची नोकरी लागली. गेली अनेक वर्ष टिकली देखील. अण्णांच्या आजाराच कळल्यावर आम्ही सगळे मित्र वेळ मिळेल तसे भेटून येत होतो. सर्वांना जाणवलेला एक फरक म्हणजे त्याचं अण्णांशी बदललेल वागणं. अचानक तो अण्णांच्या खूप जवळ गेल्या सारखा वाटला. इतकी वर्ष आपला बाप कद्रूस आणि सणकी आहे म्हणून एक दुरावा ठेवून असलेला तो अण्णांच्या बाबतीत खूप भावूक झालेला जाणवला. मग ते बिनपगारी रजा घेऊन त्यांच्या शेजारी दिवसरात्र बसणं असो, ते गेले तेव्हा “अण्णा गेले रे” असा आम्हाला आलेला फोन असो किंवा त्यांना अँम्ब्युलंस मधून नेताना, “भटजीला कळवलं आहेस ना रे" अस मला विचारणं असो, हे सगळं आम्हाला नवीन होतं. 

अँम्ब्युलंस मध्ये त्याच्या डोळ्यात एक टिपूस नव्हतं. तो फक्त अण्णांकडे टक लाऊन पाहत होता. त्यांचा हात हातात घट्ट धरून स्मशान येई पर्यंत तो बसला होता. सर्व विधी पार पडले. बॉडी उचलून भट्टी जवळ नेली. भट्टीच्या ट्रोलीवर अण्णांचा कॅन्सरने पोखरून कृश झालेला मृतदेह ठेऊन सगळे मागे होऊन उभे राहिले. भट्टीचे लोखंडी दार उघडले. एकदम गरम हवेचा लोळ सर्वांच्या अंगावर आला. ती धग जाणवून सर्वच आणखी दोन पावलं मागे सरकले. तो तसाच उभा होता. शून्यात नजर लाऊन. ट्राँलीकडे पहात. 

ट्राँली आपोआप पुढे सरकली, लोखंडी दरवाजा ओलांडून आत गेली, आगीच्या अक्राळ विक्राळ ज्वाळांनी पांढऱ्या कपड्यात लपेटलेल्या त्या देहाला विळखा घातला आणि स्वतः मध्ये लपेटून घेतले. लोखंडी दार बंद झाले आणि इतका वेळ त्याने दाबून ठेवेलेला अश्रूंचा बांध सुटला. 

आम्हाला मिठी मारून तो लहान मुलासारखा ओक्साबोक्शी रडला. बराच वेळ. आवेग ओसरल्यावर बाहेर पडलो. पाऊस नुकताच पडून गेला होता. स्मशान समोरच्या टपरीवर चहा घ्यायला आम्ही सगळे थांबलो. फुक्यानी बिड्या पेटवल्या. ह्याने देखील दोन दम मारले. चहाचे दोन घोट घशाखाली गेल्यावर एक मोठ्ठा दम मारून तो बोलू लागला. “अण्णांचा कॅन्सर डिक्टेट झाला तो डायरेक्ट लास्ट स्टेजला. डॉक्टरनी सहा महिन्याचा टाईम दिला होता. अण्णा खंबीर होते. अण्णांनी मला एक दिवस लवकर घरी बोलावलं. मी समोर बसलो.

आपण शाळेत असताना ते अभ्यास घ्यायचे तेव्हा बसायचो तसा. साला मार्क्स कमी पडायचे, डोक्यात काही शिरायचं नाही तेव्हा पण त्यांनी कधी हात उचलला नाही की रागावले नाही यार. त्या दिवशी त्यांनी एक फाईल माझ्या हातात दिली. त्यात त्यांच्या सर्व गुंतवणुकीची माहिती, रिसीट, सर्टिफिकेट सगळं होतं. पुण्याच्या फ्लँटचे माझ्या नावाचे अँग्रिमेंट आणि अकरा महिन्याचं अँडवांस भाडे घेतल्याची पावती पण होती. 

मला म्हणाले, "माझ्या नंतर तुला काम करायची गरज नाही. मजेत जग फिरुन ये. स्वत:ची काळजी घे. खर्च केलेत तरी संपणार नाहीत ऐवढे पैसे मी तुझ्यासाठी ठेवले आहेत." मी ती फाईल घेऊन उठलो. अण्णा काँटवर झोपले. रात्री मी ती फाईल वाचून परत त्यांच्या कपाटात ठेवायला गेलो तेव्हा त्यांची एक डायरी माझ्या हाताला लागली. सहज उघडली. त्यात एक जुनं पत्र होतं. अण्णांनी कोकणातून नानीला लिहिलेलं. 

अण्णांनी लिहिलं होतं की, "आज पहाटे आपल्या घराबाहेर कापडात गुंडाळलेला एक मुलगा सापडला. धडका असता तर पोलिसांना कळवून अनाथाश्रमात पाठविला असता. पण हे खास पिल्लू दिसत आहे. आपल्याला महाशिवरात्रीला भल्या पहाटे वेळणेश्वराने दिलेला प्रसाद. त्याला मी आपला मानला आहे. तो जसा आहे तसा मला मान्य आहे. आता आणखी अपत्य नको. हाच आपला आहे. जसा आहे तसा. आपल्या नंतर त्याची सोय करणे महत्वाचे आहे. सबब आज पासून स्वत:वरील सर्व खर्च बंद. मी त्याला घेऊन उद्या कोकणातून निघणार आहे."

आम्ही सगळे सुन्न होऊन ऐकत होतो. प्रसाद बोलत होता. "तो भट्टीचा दरवाजा बंद झाला ना तेव्हा जाणीव झाली की मेल्या नंतर का होईना आपल्याला समोर दिसणारा माणूस तो दरवाजा बंद झाला की परत कधीच न दिसण्यासाठी निघून जातो. अण्णा परत कधीच दिसणार नाहीत हे जाणवले आणि मला राहवले नाही. जाम रडायला आलं. साला आयुष्यभर कद्रुसपणा करणारा माझा बाप. माझा बाप नव्हताचं रे. तो माझ्या उद्यासाठी स्वत:च्या आजचं बलिदान देत असलेला एक देव होता ज्याचं देवत्व मला त्याचा अवतार संपवायच्या जरा आधी लक्षात आलं. मला सत्य समजू नये म्हणून त्याने नातेवाईक तोडले. आणि मी. साला माझी लायकीच नाही यार त्याचा मुलगा म्हनवून घ्यायची."

डोळ्यातून ओघळणारे अश्रू पुसण्याचा प्रयत्न न करता प्रसाद त्यांना वाहू देत होता. मोकळा होत होता. थोडा थांबून तो म्हणाला, "मी अण्णाला कळू दिलं नाही की मला सत्य माहित झालं आहे. पण जमेल तेवढी त्यांची सेवा करुन आयुष्यात त्यांना त्यांच्या मागे दिलेल्या शिव्यांच प्रायश्चित्त करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला यार."

आम्ही ऐकत होतो. प्रसाद फुटून रडत होता. पाऊस जोरात सुरु झाला होता. अण्णांचा प्राण पंचतत्वात विलीन झाला होता. प्रसादच्या झोळीत आनंदाचे दान टाकून एक अवतार संपला होता. पाऊस अजून जोरात कोसळू लागला होता.


                                               श्री पाटील..

Friday, January 20, 2023

लेबल..!

एका विद्यार्थ्याने, खोडी करत, त्याच्या मित्राच्या पाठीवर एक कागद चिकटवला, ज्याच्यावर लिहिले होते, "मी मूर्ख आहे." त्या मुलाला याबद्दल काही कळू द्यायचे नाही, असे त्याने इतर विद्यार्थ्यांनाही सांगून ठेवले होते.

   

अशाप्रकारे दिवसभर बाकीचे विद्यार्थ्यी त्या मुलावर हसत होते. काही वेळाने गणिताचा तास सुरू झाला आणि त्यांच्या शिक्षकांनी फळ्यावर एक कठीण गणित मांडले.

 

त्याचे उत्तर लेबल लावलेल्या मुलाव्यतिरिक्त कोणालाही देता येत नव्हते. तो मुलगा फळ्याजवळ गेला आणि ते गणित त्याने सोडवले, पणं त्याला ह्याची अजिबात जाणीव नव्हती, की त्याच्या पाठीवर असलेल्या लेबलमुळे सगळे विद्यार्थी त्याच्यावर मनातल्या मनात हसत आहेत.  

आता शिक्षकांनी त्या मुलासाठी सगळ्यांना टाळ्या वाजवायला सांगितले आणि मुलाच्या पाठीवर चिकटवलेला तो कागद काढून टाकला, ज्याची त्याला कल्पनाही नव्हती.

  

शिक्षक त्या मुलाला म्हणाले, "मला वाटतं की तुझ्या पाठीवर चिकटवलेल्या या कागदाबद्दल तुला काहीच माहीत नव्हते, जो तुझ्या एका मित्राने चिकटवलेला होता आणि इतर विद्यार्थ्यांनी ही गोष्ट तुझ्या पासून लपवून ठेवली होती. नंतर शिक्षक बाकीच्या वर्गाकडे वळून म्हणाले, "तुम्हा सगळ्यांना शिक्षा करायच्या आधी, मी दोन गोष्टी सांगणार आहे :

 

पहिली गोष्ट म्हणजे, तुमच्या संपूर्ण आयुष्यात, लोकं तुमची प्रगती थांबविण्यासाठी, तुमच्या पाठीमागे अनेक वाईट गोष्टींची लेबलं लावतील. जर या मुलाला, पाठीवर चिकटवलेल्या लेबलबद्दल माहीत असते, तर तो प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी उठलाच नसता.

 

तुम्ही तुमच्या जीवनात फक्त एवढंच करा की, जेव्हां लोकं तुम्हाला लेबल लावतील, तेंव्हा त्याच्याकडे कानाडोळा करा आणि तुमची प्रगती, शिक्षण व स्वतःला अधिक चांगले घडवायच्या प्रत्येक संधीचा फायदा करून घ्या.”

    

“दुसरं म्हणजे, आता, हे  स्पष्टंच झाले आहे की, तुमच्यापैकी कुणीही या मुलाचा प्रामाणिक मित्र  नाही, ज्याने त्याला ते लेबल काढायला सांगितले असते. तुम्हांला किती मित्र आहेत याने काही फरक पडत नाही. मात्र, तुमच्या आणि मित्रामध्ये असणाऱ्या प्रामाणिकपणाला महत्त्व आहे.

 

जर तुम्हांला असे मित्र नसतील, जे तुमच्या पाठीमागे तुमचे रक्षण करू शकतील, वेळ-प्रसंगी तुम्हाला सांभाळून घेतील आणि खरोखरच तुमची काळजी घेतील, तर तुम्ही एकटे राहणंच अधिक चांगलं आहे.”

 

 

 

 

      श्री पाटील..

वाळू आणि दगड..!


 

जॉन आणि जेम्स दोघे चांगले मित्र होते. त्या दोघांच्यात अनेक वेळा काही कारणांनी भांडणं होत असत, पण त्यांनी त्यांची मैत्री कधीच तोडली नाही. एकदा ते दोघे नोकरीच्या शोधात बाहेर पडले आणि पैसे कमावण्यासाठी बऱ्याच ठिकाणी फिरु लागले. त्यांनी अनेक स्थळे, गावं, खेडी, जंगले आणि समुद्रतटांना पार केले. पूर्ण यात्रे दरम्यान ते एक-दुसऱ्याला साथ देत राहिले.

 

एके दिवशी ते एका वाळवंटात पोहोचले. त्यांच्या जवळ अन्न आणि पाणी फार कमी राहिले होते. जॉन म्हणाला की, "आपण खायच्या वस्तू आणि पाणी पुढच्या प्रवासासाठी जपून ठेवायला हवे.” पण  जेम्स नाराज झाला कारण त्याला तहान लागली होती म्हणून पाणी प्यायचे होते. ते भांडायला लागले. जॉनने जेम्सला थप्पड मारली आणि नंतर ते तेथून गप्प होऊन पुढे निघाले. जेम्सने वाळूवर लिहिले, “माझ्या सर्वात चांगल्या मित्राने मला थप्पड मारली!”   

 

शेवटी ते एका हिरवळीच्या प्रदेशात (ओएसिस) पोहोचले. त्यांना फार आनंद झाला आणि त्यांनी पाण्यात खूप मस्ती केली. जेंव्हा ते पाण्यात मस्ती करत होते, तेंव्हा जेम्स अनावधनाने पाण्यात बुडू लागला. जॉन घाईने त्याच्याकडे गेला आणि त्याने त्याचा जीव वाचवला.

   

जेम्सने मित्राला मिठी मारून त्याचे आभार मानले. तेथे त्यांनी थोडा वेळ विश्रांती घेतली आणि पुढे जाण्याचा निर्णय घेतला.

  

ते जायला निघणार, तेव्हां जेम्सने दगडावर कोरले की, “आज माझ्या सर्वात चांगल्या मित्राने माझे प्राण वाचविले!”

 

तो जॉनला म्हणाला, "जेव्हां तू मला थप्पड मारलीस, तेंव्हा मी ते वाळूवर लिहिले.आता वाऱ्यामुळे,मी वाळूवर लिहिलेले पुसले गेले असेल.पणं जेंव्हा तू माझे प्राण वाचविलेस, तेव्हां मी ते  दगडावर कोरले.कारण ते कायमस्वरूपी आता तीथेच राहील.”

 

 

 

      श्री पाटील..

Wednesday, January 18, 2023

स्त्री..!


        काही सहस्त्र वर्षापासून विशेषता मनुस्मृतीच्या काळापासून स्त्रियांवर अनेक बंधने आली होती. ' न स्त्री  स्वातंत्र्यम्   अह्रति'  ही मनुस्मृति स्त्रीच्या तोंडावर सतत फेकली जात असे.  चूल  आणि मुल हेच तिचे कार्यक्षेत्र ठरवून तिला चार भिंतीच्या आत अडकवले गेले होते.  दुबळी, अबला, अशी तिची टेहळणी केली जात असे, तर काही ठिकाणी गृहदेवता, स्वामिनी कोणत्या शब्दातील बंधनात टाकले जात असे. दागिन्यांनी मढलेली अर्धांगी कुणी आपल्या प्रतिष्ठेचे प्रतीक मानत असे. पुन्हा ती आपल्या पायाची दासी वाटे.

 गेल्या शतकात अनेकांच्या प्रयत्नातून स्त्री थोडी बंधनातून बाहेर पडत आहे. शिक्षणाची दारे खुली झाल्यावर तिने आपल्या प्रगतीचा वेग वाढला आहे. मानवी जीवनातील कोणते क्षेत्र तिला आता नवे राहिलेले नाही. पुरुषाच्या बरोबरीने ती प्रत्येक क्षेत्रात अगदी रणांगणावर ही आपली कर्तबगारी गाजवत आहे. आजही स्त्री मुक्त आहे, असे म्हणता येईल का ?

 स्त्रीमुक्तीच्या या प्रश्नाचा विचार करताना दोन वेगवेगळ्या पातळीवर हा विचार केला पाहिजे. शहरी स्त्री आणि ग्रामीण पातळीवरील स्त्री. स्त्रियांनी ज्ञानार्जन केल्यावर त्या शिक्षिका झाल्या, प्राध्यापक, प्राचार्य, डॉक्टर, इंजिनीयर, वकील, न्यायाधीश, संशोधक, वाहन चालक, अधिकारी, मंत्री, पंतप्रधान, राष्ट्रप्रमुख ही झाल्या, पण अशी ही कामगिरी करणाऱ्या स्त्रिया मूठ भरच. बाकीच्या सर्वसामान्य स्त्रियांचे प्रश्न सुटतात का ?  खरोखर ती मुक्त झाली आहे का ?

 ज्ञानरचना मुळे स्त्री ही आता गुलाम राहिली नाही. अगदी बंगल्यातील आणि झोपडीतही   स्त्री आपल्यावर होणारा अत्याचार मुकाट्याने सहन करत नाही. पण म्हणून आज तिच्यावर अन्याय होत नाही असे नाही. झोपडीत राहणार्‍या गरीब स्त्रिया आज शहरात  मजुरीची कामे करून  चार पाच  हजार रुपये कमावतात.  त्यावर त्या आपल्या मुला बाळाची, कुटुंबाची गुजराण करतात. प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन मुलांना चांगल्या शाळेत घालतात. त्यामागे त्या माऊलीचा हेतू एकच असतो की, त्या मुलांचे भवितव्य उज्ज्वल व्हावे. पण अशा या कष्टकरी महिलांचे दारुडे पती कामधंदा न करता या स्त्रियांना मारहाण करून दारूसाठी पैसे उकळतात. म्हणजे स्त्री मुक्त आहे का ?


 याला कारण आजही आपला समाज तिकडे थोड्या  शशांक वृत्तीने पाहतो. आज-काल समाजातील  घटस्फोटाचे प्रमाण वाढले असले, तरी अजूनही समाज त्या घटस्फोटित स्त्रियांकडे थोड्या उपेक्षेने पाहतो. समाजाची ही दृष्टी बदलायला हवी. आजची स्त्री सुशिक्षित  स्त्री घरदार धोनी सांभाळत असते. ज्ञानसंपादन त्यामुळे तिला स्वतःचे क्षेत्र निर्माण झालेली असते,   आज ते  क्षेत्र गाजवत असते. सोबत आपले घरदार सांभाळत असते, मुलांच्या विकासासाठी धडपडत असते; परंतु ती मुक्त नसते. तिलाही आपले  घर टिकवण्यासाठी होण्यासाठी अनेक तडजोडी कराव्या लागतात; क्वचित स्वतःच्या मतांना, इच्छांना मुरड घालावी लागते.

 अशा घरातून अनेकदा हुंड्यासाठी तिला जाळण्यात येते, तिची हत्या केली जाते. क्वचित तिच्यावर बलात्कार केला जातो. स्त्रियांवर अन्याय करणाऱ्या एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला शिक्षा  करून स्त्रीवरील अन्यायास संपणार नाही. पुरुष श्रेष्ठ व स्त्री कनिष्ठ हा मुळातील अन्यायकारक दृष्टिकोन नाहीसा झाला पाहिजे. खरेतर सर्व माणसे समान आहेत, या तत्त्वाला आपल्या जीवनात जेव्हा मानाचे स्थान मिळेल, तेव्हा स्त्रीला  सुद्धा समाजात मानाचे स्थान मिळेल.  आत्मनिर्भर, मुक्त स्त्री निर्माण होईल व त्यातून निकोप आणि निर्भीड समाज निर्माण होईल.

 आज बातम्या आणि वृत्तपत्रांमध्ये स्त्रियांवर होण्याला अन्याय-अत्याचार, घरगुती हिंसाचार अशी कित्येक उदाहरणे दररोज बघायला मिळतात. एकीकडे आपण स्त्री स्वातंत्र्याची आणि मुक्तीचे गोडवे गातो दुसरीकडे अजूनही काही स्त्रिया पारतंत्र्यात बंदिस्त आहेत. त्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले असले तरी संपूर्ण स्त्री जीवन पूर्णपणे स्वातंत्र्य नाही ही चिंतनीय व खेदाची बाब आहे. त्यामुळे नारी सम्मान, स्त्री सन्मान तसेच स्त्रियांना त्यांचा दर्जा आणि प्रत्येक कार्यात सहभाग संधी दिल्यास नक्कीच स्त्री पुरुष समानता ही तुलना करण्याची कधी वेळच येणार नाही.

 

       श्री पाटील..