Sunday, April 7, 2024

छकुली..!

आमची छकुली. सर्वांची लाडकी. मन मोकळी आणि सतत आनंदी राहणारी. स्वतः सोबतच इतरांना ही आनंदी ठेवणारी जाता जाता खूपच रडवून गेली. कधीच डोळ्यात पाणी न आणणाऱ्या दगडी काळजाला सुद्धा हंबरडा आवरला नाही मग त्यालाही शेवटी पाझर फुटलाच.

नात्यातला-गोत्यातला प्रत्येक जण तर रडतच होता पण शेजाऱ्यांचे सुद्धा डोळे पाणावले होते. असं वाटत होतं एखाद्या सुंदर आणि सुगंधी फुलांच्या बागेतील फुलांचा सुगंधच त्यांच्यापासून वेगळा होतोय, मग त्या फुलांना तरी दुःख होणार नाही, हे कशावरून..? 

कालही काहीसं असंच झालं. एका माळ्याने जीवापाड जपलेल्या बगीच्यातून “छकुली” नामी सुगंध वेगळा झाला. सदा प्रफुल्लित राहणारी फुलं काल जराशी हिरमुसली होती. कारण या फुलांना एका माळेत गुंफून ठेवणारा धागा आता कोणाच्या तरी गळ्यातला हार झाला होता. जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीनं आपली सगळी श्रीमंती कन्यादान म्हणून दिली. कोणी म्हणतं रक्तदान श्रेष्ठ, कोणी म्हणतं अन्नदान श्रेष्ठ, कोणी म्हणतं भुमिदान श्रेष्ठ, कोणी म्हणतं गौदान श्रेष्ठ पण जेंव्हा पोटात असताना पासून माया लावलेला पोटचा गोळा दुसऱ्याच्या पदरात टाकणारी आई, अगदी बाल वयापासून मोठं होईपर्यंत तिच्या प्रत्येक सुखासाठी रात्रं दिवस झटणारा बाप, ती वयात आल्यानंतर समाजात असणाऱ्या काळ नजरी दुःशासनांच्या घात पासून सतत तीच रक्षण करणारा भाऊ, जेंव्हा आपल्या घरची लेक कोणाच्या तरी घरची सून म्हणून दुसऱ्याच्या हवाली करताना केलं जाणारं “कन्यादान” हे विश्वात सर्वश्रेष्ठ आहे, हे तो दिवस सांगून गेला.

हो काल आमच्या छकुलीचं लग्न झालं आणि ती आता स्वतःच्याच घरची पाहुणी झाली. आईचे पाणावलेले डोळ्यात एकाच वेळी दोन भाव दिसत होते, एका डोळ्यात लेकीचं लग्न झाल्याचा आनंद तर दुसऱ्या डोळ्यात ती आता दूर जाणार याचं दुःख. वडिलांची ही काहीशी तशीच अवस्था होती, पोरीचं लगीन थाटात करून आक्खा गाव जेऊ घालण्याचं स्वप्न पूर्ण होताना दिसत होतं. सर्व भावंडे तर पंगती वाढण्यायामध्येच व्यस्त होती. लग्नासाठी जमलेल्या महिला रुकवत पाहण्यात गुंग होत्या. संसारोपयोगी वस्तूंनी भरगच्च सजलेला मंडप तिच्या सुखी संसाराची ग्वाही देत होता. नवऱ्या मुलाकडची मित्र मंडळी बँड च्या तालावर नाचण्यात रंगली होती. विवाहासाठी आलेली आप्तेष्ट मित्र मंडळी जेवणाचा आस्वाद घेत होती. लग्नात कुठलीच कसर बाकी राहिली नाही. 

आपलीशी असणारी बहीण त्यादिवशी परकी झाली. देवाला आता एकच मागणं आहे, तिच्या सुखी जीवनात दुःखाला कुठंही थरा देऊ नकोस. आमची छकुली सतत आनंदी राहावी, तिच्या चेहऱ्यावर असणारं ते गोड हसू कायम तसच राहावं, तिचं आनंदी आयुष्य आनंदानं भरून जावं. कधी आम्ही बसून निवांत बोललो ही नाही, कधी जास्त भेट ही नाही, पण का कोणास ठाऊक ती सासरी जाताना मन भरून आलं? ती फक्त माझ्यापासून दूर आहे, मनापासून लांब नाही.  पण तिची पाठवणी करताना डोळ्यात आलेलं पाणी नेमकं दुःखाचं होतं की आनंदाचं? हा प्रश्न प्रश्नच राहिला..!


कवी, व्याख्याते व कीर्तनकार
श्रीधर शिंदे चापोलीकर
9657167907

Saturday, January 21, 2023

अंबर..!


  मागच्याच आठवड्यात कसब्यात मित्राबरोबर बोलत थांबलो होतो.आमच्या शेजारून दोन ‘आज्या’ म्हणाव्या इतपत वयस्कर बायका बोलत चालल्या होत्या.”वहिनी उद्या पहाटे वेळेत येताय ना धुंधुरमासाच्या कीर्तनाला?”मग ‘वहिनींनीही किंचित खोकत,”होहो आज मुलालाच सांगून ठेवते सोडायला, उद्या नै हो उशीर होणार !”,बोलत दोघी पुढे निघून गेल्या.मला मात्र त्यानिमित्तानी कित्त्येक महिन्यांनी ‘धुंधुरमासाची’ आठवण झाली.

मग विचार केला की धुंधुरमास शब्द ऐकल्यावर म्हणजे काय?हा प्रश्न तरी निदान मला आणी माझ्या मित्राला पडला नाही.कारण नशिबानी माझ्या पिढीला तरी धुंधुरमास म्हणजे काय?हे सांगणारे लोक आजूबाजूला तरी होते.पण आजकाल अनेक ठिकाणी मुद्दलातच घोटाळा असतो.त्यामुळे आजच्या मुलांना धुंधुरमास म्हणजे काय ते सांगण्यासाठी चार शब्द तरी लिहायलाच  पाहिजेत.

 सूर्य धनु राशीत भ्रमण करतो तो म्हणजे धनुर्मास ऊर्फ ‘धुंधुरमास’.आयुर्वेदानुसार मकर संक्रमणाच्या आधी हेमंत ऋतूमध्ये येणाऱ्या ह्या धनुर्मासात सामान्य लोकांचा जठराग्नी (भूक)भल्या पहाटे जागृत होतो.त्यामुळे ह्या महिन्यात पहाटे उठून ह्या ऋतूमध्ये मिळणाऱ्या भाज्या,बाजरीसारखी धान्ये खायचे महत्व फार आहे.हे खाणं इतर ऋतुंमध्ये  पचायला जड असलं तरी ह्या महिन्यात/ऋतूमध्ये मात्र ‘राजस’ मानलं गेलंय.वर्षभर खाण्यातून मिळणारी ‘एनर्जी’ आपल्याला फक्त ह्या एका महिन्यातल्या खाण्यातून मिळवता येते,येवढं ह्याच प्रचंड महत्व पूर्वजांकडून सांगितलं गेलय.आत्ताच्या पिढीला हे माहिती असण्याची शक्यता कमी कारण आजकाल जिथे लोकांना मराठी महिनेच पाठ नसतात तिथे कालनिर्णय मधेही उल्लेख नसलेला ‘धुंधुरमास’ कोण लक्षात ठेवणार?

 ह्या ऋतुंमध्ये खरी चव मिळणाऱ्या गवार,फरसबी,वांगी,मटारासारख्या ‘लेकुरवाळ्या’ फळभाज्या आणि बाजरी सारखी पिठं,पहाटेच्या वेळी जेव्हा पोटातली भूक पूर्णपणे ऐन भरात असते त्यावेळी खाण्यातली मजा आणी त्यांची सहज होणारी पचनक्रिया ह्यांचा विचार,जेवणाकडे “अन्न हे पूर्णब्रम्ह”म्हणत वैज्ञानिक दृष्टीकोनातून बघणाऱ्या संस्कृतीत प्राचीन कालापासून केला गेलाय.हे लक्षात आलं की त्याबद्दलचा आदर एक ‘फुडी’ म्हणून आजही वाढतो.

काही वर्षांपूर्वीपर्यंत अनेक लहान गावातच नाही तर अगदी पुण्यात देखील ठिकठीकाणी धुंधुरमास वेगळ्याच आनंदात साजरा व्हायचा.शहरातल्या जुन्या,प्रमुख मंदिरात काकड आरत्यांना जोडून नामवंत कीर्तनकारांची कीर्तनं व्हायची.घराघरातून सूर्याला अर्ध्य देऊन नैवेद्य दाखवून पहाटे साग्रसंगीत जेवणं व्हायची.तरीपण वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टीकोन वगेरे बाजूला ठेऊन खाण्याची धुंधुरमासाची खरी मजा लुटायची असेल तर एखाद्या लहानश्या खेड्यातून जावं.

 काही दिवस आधी,रामाच्या पारी घरच्या शेतावर धुंधुर्मासातल्या चुलीवरच्या साग्रसंगीत जेवणाचा बेत ठरतो आणि एका सूर्योदयाच्या सुमारास शुचिर्भूत होऊन समस्त कुटुंब स्वतःच्या शेतावर हजर होतं.तो नजारा पाहण्यासारखाच असतो.

 तांबडं फुटत असतानाच घरच्या गड्यांनी लावलेल्या सगळ्यात मोठ्या चुलीवर थोरल्या जाऊबाईंनी पदर खोचून मटार,गवार,गावरान गाजरं ह्यांची लेकुरवाळी भाजी स्वतः करायला घेतलेली असते.माहेरी आलेली लेक मटाराचे दाणे तोंडात टाकत मोठ्या वहिनीशी गप्पा मारत बसलेली असते.शेजारच्या दुसऱ्या चुलीवर फ़र्माईशीवरून भरतासाठी वेगळ काढलेलं मोठं,हिरवं वांगं गोवर्यांवर भाजण्यात दुसऱ्या सुनबाई दंग असतात.काटे काढून भाजलेल्या वांग्यात शेतातल्या ताज्या काढलेल्या भुईमुगाचे ‘कवळे’ दाणे पडतात.मुठीत मावतील येवढ्या हिरव्या मिरच्या,हाताशी असावी म्हणून बांधावरून नुकतीच खुडलेली कोथिंबीर दिमतीला असतेच.भाजत,गार होत आणि शेजारी लावलेल्या लोखंडी तव्यावरून ‘परतीचा’ प्रवास करत वांग्याचे भरीत ताटात पडतं.घरातल्याच असणाऱ्या रखमाच्या हातांतून पाणी लावून तव्यावर सर्रकन पडलेल्या,मुबलक तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकऱ्यांच्या वासानी एव्हाना हृदयाचा ठाव घेतलेला असतो.नैवेद्याच ताट सूर्यदेवाला दाखवल्यावर जेवणं सुरु होतात.

 चुलीवरचे भाजलेले पापड पटापटा पानात पडतात.घरी विरजून आणलेल्या दह्याचं लोणी वाढायचं काम घरातल्या आईसाहेबांनी स्वतःच्या हातात ठेवलेलं असतं.एकीकडे प्रत्येकाच्या पानाकडे लक्ष देत,आपल्या मनासारखं लोणी वाढत त्यांची देखरेख सुरु असते.

 चुलीतून भाजून वेगळ्या काढलेल्या मिरच्यांचा ठेचा वाटायचं काम दिलेली घरातली एखादी परकरातली मुलगी मधेच लाजत येऊन पहिल्यांदाच केलेला ठेचा घाईनी ताटात वाढायला घेते.तिच्या वाढण्यावर लक्ष असलेल्या तिच्या आईची,“सुलक्षणे ठेचा डाव्या बाजूला वाढावा की ग !”,अशी हाक आल्यावर पटकन आपली जीभ चावत धाकट्या काकाच्या ताटात डावीकडे ठेचा वाढते. “सुलक्षणाताई,आत्ता ठीकाय,पन सासरी गेल्यावर कसं व्हायाचं तुमचं?” म्हणाल्यावर “गपे काका,मला नै कधी लग्न करायचं”,म्हणत लाजून पसार होते.ते ऐकून समस्त काका,काकू,आत्याच्या हास्याचा आवाज ‘समद्या’ माळावर पसरतो.त्या नादात जेवताना तिखट लागल्यावर घरून बांधून आणलेल्या गुळपोळ्या प्रत्येकाच्या पानात पडत रहातात.हास्यविनोदात नेहमीपेक्षा चार घास जास्ती गेलेले कोणाला लक्षातही येत नाही.

 तालेवार घराण्यांतून आलेल्या मोठ्या सुनांच्यापुढे बोलायची टाप नसलेली नुकतीच लग्न होऊन आलेली धाकटी सून,खांद्यावरचा पदर सावरत कोपऱ्यातल्या चुलीवर मंद आचेवर ठेवलेली मुगडाळीची खिचडी ढवळत मधूनच आपल्या धन्याकडे चोरटा कटाक्ष टाकत लाजत कोपर्यात उभी असते.सगळ्यांना तिची आठवण होते ती आज मोठ्यांच्या पंक्तीत बसलेल्या लहान मुलांची जेवणं उरकताना.नवीन धाकट्या काकुला सयेनी बिलगणारी घरातली मुलं मग तिचा धावा करायला लागतात.“धाकल्या सुनबाई खिचडी घ्या वाढाया”,असा सासुबाईंचा आवाज आल्यावर तंद्रीतून भानावर आलेल्या धाकल्या सूनबाई लगबगीनी मऊसुत खिचडी पुतण्यांच्या पानात एकेक करून वाढायला घेतात.

 कुटुंबातले थोरले आण्णा,तात्या औंदाच्या पिकपान्याची चर्चा करीत आपल्या ‘बारदानाकडे’ बघून मनात समाधानानी हसत असतात.गावोगावी रंगणाऱ्या धुन्धुरमासाच्या ह्या जेवणावळी म्हणजे एकत्र कुटुंब व्यवस्थेला बांधून ठेवणारी ‘जान’ होती.

 माझ्या माहितीत हेमंत ऋतूत भारतात इतरत्र कुठे अश्या जेवणावळी होत असल्याचं ऐकिवात नाही.असतील तर जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल.

पण आज महाराष्ट्रातही आजूबाजूला पाहिलं तर शहरात घरोघरी होणारे धुन्धुरमासाचे कार्यक्रम आता होताना दिसत नाहीत.रा.स्व.संघासारख्या संघटनांमध्ये काही ठिकाणी वैयक्तिक पातळीवर ह्या जेवणाची परंपरा टिकवून धरली जाते.जे जे लोक,संस्था ही अस्सल मराठी परंपरा टिकवून ठेवतायत त्यांचे प्रत्येकानी स्वागत करायला हवं.पुन्हा घरोघरी अश्या धुंधुरमास स्पेशल जेवणावळीची सुरुवात व्हायला हवी.

 कारण धुंधुरमासाच्या ह्या जेवणामध्ये “हाय कॅल्शियम,प्रोटीन्सच्या” खाण्याबरोबरच अदृष्य अशी ‘इंडीयन फॅमेली व्हॅल्यू” आहे.त्याची सर एसी हॉटेलात मेलामाईनच्या डिशमध्ये प्रत्येकी १२५ ग्रॅम पंजाबी भाजी,बटर रोटी आणि जीरा राईस खाऊन,वरती प्रत्येकी एक स्कूप आईसक्रिमवर सांगता होणाऱ्या शहरी गेट टू-गेदर्सना येणं केवळ अशक्य.


                               
             

चेहरे..!

गेले काही दिवस त्या नियमितपणे मॉर्निंग वॉकला जात होत्या. रस्त्यात अंतरा अंतरावर ठराविक चेहरे रोज दिसत. 
       सोसायटीतून बाहेर पडल्याबरोबर समोरून येणारी एक टीनएजर मुलगी दिसे. सडसडीत, फॅशनेबल कपडे वापरणारी, आकर्षक. तिच्या कुरळ्या केसांच्या अस्ताव्यस्त बटा तिच्या सौंदर्यात भर घालत. आताशा काकू दिसल्या की ती मिस्कीलपणे डोळे मिचकवून हसे. ही अनोळखी गोड पोरगी आवडू लागली काकूंना.
       जरा पुढे गेलं की भावल्यांसारख्या दिसणाऱ्या दोन चिमुरड्या जुळ्या मुली आणि त्यांची आई स्कूलबसची वाट पहात त्यांच्या सोसायटीच्या गेटपाशी उभ्या असायच्या.   
       तिथून पुढे सरकलं की पंचविशीचा एक उंचनिंच तरुण लांब ढांगा टाकत समोरून येत असे. एक मध्यमवयीन बाई काकूंना मागे टाकून जवळपास धावतच जायची. रोजची लोकल चुकू नये म्हणून असणार ! एकदा न राहवून काकू तिला थांबवत म्हणाल्या,"जरा सावकाश. धडपडून पडाल बिडाल एखाद दिवशी."
       रस्त्यातली भटकी कुत्री, झाडं, सगळंच माहितीचं झालं होतं. एकदा नाक्यावरच्या भल्या थोरल्या वृक्षाकडे काकू मान वर करून बघत होत्या. त्या कशाला तरी अडखळल्या आणि....... खालीच पडल्या एकदम. डोक्यात कळ गेली आणि त्यांच्या डोळ्यासमोर अंधारी आली.
       त्यांनी डोळे उघडले तेव्हा भलाथोरला घोळका त्यांच्याभवती जमला होता. त्यात नेहमी दिसणारे सगळेच होते. "काकू, मला 'धडपडशील' म्हणताना आज तुम्हीच धडपडून पडलात. आता बरं वाटतंय ना ?" ती लोकलवाली बाई म्हणाली. काकूंच्या काळजीने आज लोकल चुकण्याची पर्वा न करता ती तिथे थांबली होती. जुळ्या भावल्यांची सोसायटी अगदीच जवळ होती. कुणीतरी काकूंना दंडाला धरून उठवलं आणि सोसायटीत बाकड्यावर नेऊन बसवलं. सगळा घोळका मागोमाग आला.
        "काकू, पाणी हवंय का ?"  त्या टीनएजर गोड पोरीने पाण्याची बाटली काकूंसमोर धरली. जुळ्या भावल्यांची आई त्यांच्या शेजारी बसली. तिने त्यांचा हात हातात घेतला. केवढी ऊब होती तिच्या स्पर्शात ! "तुम्ही इथे जवळच रहाता ना? चला. मी तुम्हाला घरी सोडायला येते."
      "नको हो. आता मी जाईन."  
       "मी येते म्हणते तर !" ती खरोखरच काकूंना घरी सोडायला आली.
       "एवढ्या मोठ्ठ्या तीन बेडरूमच्या फ्लॅटमध्ये आम्ही दोघेच. दोन्ही मुलं अमेरिकेत. हे रिटायर झाले हल्लीच. हा फ्लॅट पूर्वीच घेऊन ठेवलाय. हे रिटायर झाल्यानंतर आता आलो इथे रहायला. पण ह्यांचं विश्व वेगळं. माझं वेगळं. दोघांचा स्वैपाक व्हायला कितीसा वेळ लागतो ! त्यामुळे वेळ खायला उठतो मला." काकूंनी सांगितलं.
       "ओके."
      "आज भाज्यांचं कटलेट केलंय नाश्त्याला. खाऊन बघा कसं झालंय."
       "काकू,  मला अहो जाहो करू नका. माझं नाव गौरी. कटलेट झक्कास झालंय. कसं केलं ?" 
       काकूंचा चेहरा खुलला. "वाटीभर मटार घेतले. बारीक चिरलेली फरसबी. गाजर, बीट किसून......." काकू रेसिपी सांगू लागल्या.
        आता रोज दिसणारे चेहरे अनोळखी राहिले नाहीत. काकू रस्त्यात थांबून सगळ्यांशी चार शब्द बोलू लागल्या. गौरी तिच्या मुलींना घेऊन वरचेवर काकूंकडे येऊ लागली. एकदा काकूंनी मुलींना पम्पकीन मध्ये बसून 'चल रे भोपळ्या टुणुक टुणुक'  म्हणत मॅन इटर टायगरला चकवून गेलेल्या स्मार्ट आजीची गोष्ट सांगितली. मुली बेहद्द खूश झाल्या. त्यांना गोष्ट आणि तालासुरात म्हटलेलं 'चल रे भोपळ्या टुणुक टुणुक' फार म्हणजे फारच आवडलं ! त्यांनी काकूंना ती एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगायला लावली. भोपळा, नरभक्षक वाघ हे मराठी शब्दसुद्धा मुलींना माहीत झाले.
       "काकू, तुम्ही संस्कार वर्ग घ्या ना !"
        "बापरे ! ते काय असतं ?" 
        "छोट्या मुलांना गोष्टी सांगायच्या. गाणी, श्लोकबिक शिकवायचे. असं सगळं. आणि पैसे घ्यायचे त्याचे."
        "पैसे बिसे नाही घेणार. पण तू म्हणते आहेस ते जमेल मला. माझी मुलं लहान होती तेव्हा मी रोज संध्याकाळी परवचा म्हणून घेत असे त्यांच्याकडून. आता काय ! सगळंच बदललंय. मुलं आणि आई वडील..... सर्वचजण मोबाईलमध्ये घुसून बसलेले असतात घरोघरी."
       काकूंचा संस्कार वर्ग सुरू झाला. खूप बोलबाला झाला त्याचा. चिमुरडी मुलं या छान, छान गोष्टी सांगणाऱ्या, उड्या मारून, नाचून गाणी म्हणणाऱ्या, रोज नवीन नवीन yummy खाऊ करून देणाऱ्या काकूंवर जाम खूष झाली.
        गौरीने काकूंना स्मार्टफोन व्यवस्थित वापरायला शिकवला. फेसबुकवर अकाउंट उघडून दिला. काकूंना अलीबाबाची गुहाच उघडल्यासारखं वाटलं !  पटलं, की सोशल मिडियाला आभासी जग वगैरे म्हणत असले तरी माहिती भरपूर मिळते तिथे. छान करमणूकसुद्धा होते. वेळ बरा जातो. खाद्यपदार्थ, स्वयंपाक याच्याशी संबंधित ग्रुप्स  जॉईन केले काकूंनी. त्यांच्या पारंपरिक रेसिपीजवर भरभरून लाईक्स, कमेंट्स येऊ लागले.
         ह्यापूर्वी काकूंना आयुष्यात रितेपण आल्यासारखं वाटत होतं. रोज बदलणाऱ्या या आधुनिक जगात आपण निरुपयोगी कुचकामी आहोत, अडगळीत पडल्यासारख्या झालोय अशी विचित्र नैराश्याची भावना मूळ धरू लागली होती. मात्र आता आपलाही उपयोग आहे, अनेक गोष्टी आपल्याला उत्तम जमतात, आपणही इतरांना ज्ञान, माहिती देऊ शकतो हा 'साक्षात्कार'  झाला आणि त्यांचं जगच बदललं ! निरुत्साह, निराशा, मरगळ पार कुठल्या कुठे पळून गेली ! तब्येतीच्या तक्रारी आपोआप दूर झाल्या. त्यांचं त्यांनाच जाणवलं की त्यांची दुखणी शारीरिक कमी आणि मानसिक जास्त होती.
        काकूंनी वीकएण्डला छोटीशी पार्टी द्यायचं ठरवलं. त्या रोजच्यासारख्या मॉर्निंग वॉकला गेल्या तेव्हा आता ओळखीच्या झालेल्या सर्व चेहऱ्यांना त्यांनी शनिवारच्या पार्टीचं आमंत्रण दिलं. एका पायावर तयार झाले सगळे !"
        गौरी खोदून खोदून विचारू लागली. "कशाबद्दल पार्टी ? काय कारण ? सांगा ना काकू."
      "आधी अनोळखी असलेल्या चेहऱ्यांमुळे मला माझा खरा चेहरा सापडला. म्हणून."
      "म्हणजे ?" गौरी गोंधळून गेली.
      "अगं, म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मला माणसात आणलंत. ही म्हातारी अजून कामाची आहे याची जाणीव करून दिलीत. मग कृतज्ञता व्यक्त करायला नको का ? मला माझी स्वतःची ओळख नव्याने पटली. माझा चेहरा मला मिळाला तुमच्यामुळे. म्हणून आहे ही पार्टी."
      गौरी आश्चर्याने बघतच राहिली काकूंकडे. त्यांचा चेहरा आत्मविश्वासपूर्ण, तजेलदार दिसत होता.


                                                  श्री पाटील..

मोठेपणा..!


मोठा माणूस हो, असा आशीर्वाद वडीलधारी मंडळी मुलांना देत असतात. वयाने मोठे तर सगळेच होतात, कर्तृत्वाने मोठे होणे महत्त्वाचे, कर्तृत्ववान बनायचे तर प्रत्येक कृतीत शिस्तबद्धता हवी. नीतिमत्ता आणि आचरण शुद्ध हवे. मोठा माणूस बनायचे तर खूप संपत्ती मिळवायला हवी. मग त्यासाठी कोणत्याही मागनि कुठल्याही थराला जाऊन संपत्ती मिळवणे हे एकच ध्येय काही लोकांचे असते. असतील शिते तर नाचतील भुते अशी एक म्हण आहे. पैसेवाल्यांशी लोक जवळीक वाढवतात. त्यांचा आदर सत्कार केला जातो. पैसा किंवा श्रीमंती शाश्वत नसते, त्यामुळे त्यातून येणारा मोठेपणा हाही शाश्वत नसतो, लोक स्वार्थासाठी जवळ आलेले असतात तसेच दूरही जातात. मान सन्मान आदर वगैरे फक्त समोर दाखवण्यासाठी नसावेत. एखाद्या मोठ्या माणसाच्या सन्मानानंतर त्याच्या अनुपस्थितीतही जेव्हा त्याच्याबद्दल आदराने बोलले जाते, त्याची स्तुती केली जाते, तेव्हा तो खऱ्या अर्थाने मोठा माणूस असतो. आपल्याला लोकांनी मोठा म्हणावे, मोठेपणाचा मान द्यावा, कायम आपल्या भोवती लोकांचा गराडा असावा, यातून फक्त अहंकाराला खतपाणी मिळत असते. मला मोठा म्हणा, चांगला म्हणा किंवा माझ्या नावाचा जयजयकार करा, असे लोकांना सांगण्याची वेळ आपल्यावर कधीही येऊ नये फुलाचा सुगंध दरवळत असतो. आपला सुगंध किती मनमोहक हे त्याला ओरडून सांगावे लागत नाही. आपली माणुसकी, आपले कर्तृत्व, नीतिमान आचरण हे सगळे बघून समाजात चांगला माणूस म्हणून आपोआप ओळख निर्माण होत असते.

इतिहासात जे थोर पुरुष होऊन गेले, त्यांनी समाजाच्या कल्याणासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करून, आपले आयुष्य खर्ची घातलेले असते. त्यांच्या स्मृती आपण जपतो. मोठेपणाचा हव्यास असणारी मीपणाचा अहंकार असणारी व्यक्ती, कधीही सर्वस्वाचा त्याग करू शकत नाही. थोर पुरुषाने प्रथम आपल्या अहंकाराची होळी केलेली असते. शिवरायांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता रयतेच्या शत्रूंशी लढून स्वराज्य मिळवले. कीर्तिमान, नीतिमान राजा म्हणून आजही जग छत्रपतींच्या नावाचा जयजयकार करते. आपल्या नावाचा जयजयकार व्हावा आपल्याला मोठेपणा मिळावा, हेच जर शिवरायांचे ध्येय असते तर कल्पना करा सध्याचे चित्र काय असते. मोठे व्हायचे म्हणजे सर्वस्वाचा त्याग करून संत किंवा महात्मा पदालाच पोहोचायला पाहिजे असे नाही. आपण माणूस आहोत आणि आपल्यातली माणुसकी कायम जिवंत राहावी यासाठी प्रयत्नशील असणारा प्रत्येक जण मोठा माणूस असतो..




ओझं..!


रणरणत्या उन्हात ते दोघे सोसायटीच्या गेटबाहेर आले...हा देखील बहुतेक नकारच. संधीवातामुळे आता आईचं येणं शक्य नव्हते म्हणून बापलेक दोघंच जायचे स्थळ बघायला. वडील साठी ओलांडलेले आणि मुलगी तिशीची...उशीरा झालेली..लग्नाचं अजूनही कुठे जमत नाही. आजचं कदाचित सत्तावीसावं किंवा कदाचित तिसावं स्थळ.... मुलाच्या चेहऱ्यावर नकार स्पष्ट दिसत होता. सोफ्यावर बसताक्षणी तिसऱ्या मिनिटात तो मोबाईलमधे डोकं खुपसून बसला. खोपोलीहून इतक्या धावपळीत दोन गाड्या बदलून येणं अगदीच फुकट गेलं.... तिला बाबांची काळजी सतत वाटते. आताशा त्यांना बीपीचा त्रास होतो. आईसारखे अगदीच सांधे कामातून गेले नसले तरी आता गुडघे कुरकुरतात त्यांचे....नंबर वाढलाय तो वेगळाच.

ती देखील अगदी चारचौघींसारखी. साधी सरळ, नाकासमोर चालणारी, खालमानेने वावरणारी, शांत, सोशिक....तिघांचाच संसार आणि इवलंसं विश्व. ती इतकी साधी की नाक्यावरची टवाळ पोरं तिची दखलही घेत नाहीत, कधीतरी आपल्याला बघून एकाने तरी शिटी मारावी अशी सुप्त इच्छा व्हायची तिला, ते कधीच झाले नाही. ती शेजारुन गेली की कडक मास्तरीण वर्गावर आल्यावर कार्टी गप्प बसतात तसा क्षणभर नाका शांत होई...

बाबा रिटायर होऊन तीन वर्षे...आई अंथरुणाला खिळलेली.... तिची टीचभर नोकरी... परिस्थिती ठीकठाक...तिचा छोटासा पगार आणि बाबांचं इवलंसं पेन्शन मिळून रुखुटुखु सुरु होतं. दोनेकशे माणसांचं जमेल इतपत लग्नाचं बजेट होतं बाबांचं. साधंच लावूया लग्न असं ती म्हणे... कधी होणार?

उन मी म्हणत होतं. दोघं निःशब्दपणे पावलं टाकत चालत होते. “सुनिता, रस घेऊया चल” बाबा म्हणाले. दोघं रसवंतीगृहात शिरले. किंचित बरं वाटलं. छन्नक छन्नक करत मशीन सुरु होतं... "अद्रक निंबू डालना हां" ...बाबा उगाच काहीतरी म्हणाले. "काका, मी सातारचा. मराठीतनं बोला की" रसवाला हसला. बाबा किंचित वरमले...
तिच्याकडे वळून म्हणाले, “त्या केळकर गुरुजींनी सांगितलेले अकरा सोमवार झाले का गं सुनिता?” वास्तविक पाहता ते सोमवार होऊन तीन महिने झाले होते आणि बाबांनी हा प्रश्न अनेकदा विचारुनही झाला होता..."हो" ती म्हणाली. केळकर गुरुजींच्या मते खरंतर खडतर योगच होते. तिच्या ऑफिसमधल्या रणदिवेचा चुलतभाऊ पत्रिका बघून म्हणाला होता, हिचं लग्न होणं next to impossible आहे.... अर्थात ते तिनं बाबांना सांगितले नव्हते.

रसाचे ग्लास आले. कोणीतरी अंतरात्म्यावर थंड अभिषेक करावा असं वाटलं. तिच्या घामेजलेल्या म्लान चेहऱ्यावर तरतरी आली. बाबा डोळे बंद करून रस पित होते. आताशा त्यांच्या चेहऱ्यावर थकवा आणि सुरकुत्या एकदमच दिसत होत्या. दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या चपलांच्या टाचा झिजल्या नसल्या तरी चपलांच्या कडांवरची धुळीची पुटं आता दिसत होती. साईबाबा बसायचे तसे एकावर एक पाय टाकून बसण्याची बाबांची जुनी पध्दत... आपल्यामुळे किती त्रास होत असेल या थकलेल्या जीवाला? तिच्या मनात आलं. बाबा शांतपणे रस पित होते....

तिचं लक्ष बाहेर गेलं. रसवंतीगृहाबाहेर उन्हाची तलखी कमी व्हायला पाणी शिंपडलं होतं. एक छोटीशी चिमणी तितक्यात आली, शेजारच्या इवल्याशा हौदात चोच बुडवून पाणी प्यायली आणि मग तेच पाणी त्या नखभर चोचीत घेत तिची आंघोळ सुरु झाली. सुनिता रस पिता पिता शांतपणे सगळं न्याहाळत होती. सचैल स्नान झाल्यावर ती एकटी चिमणी अंगणात थुईथुई बागडत कसलेसे दाणे टिपत होती. तिचं एकटेपण उपभोगत होती... तिचं कशातही लक्ष नव्हते. ती आणि तिचं स्वच्छंद एकटेपण...शेजारी अजून दोन चिमणा चिमणीच्या जोड्या आल्या. ते त्यांच्या त्यांच्यातच होते पण हिचं एकटेपण मोहक होतं. त्यात एक दिमाख होता...तिच्या वावरण्यात कुठेही औदासिन्य नव्हतं की एकटेपणाची कुतरओढ नव्हती. ती अतिशय आनंदाने बागडत होती. दाणे टिपून झाल्यावर पुन्हा थोडावेळ हौदात मस्ती केली आणि चिवचिवत उडून गेली....सुनिताचे डोळे एक क्षणभर भरुन आले आणि पुढच्या क्षणी.... 

“बाबा” तिने बाबांचं मनगट धरलं.... “अजून एकेक हाफ ग्लास घेऊया का?” बाबांना तिचं लहानपण आठवलं. फडतरे रसवंतीगृहात गेली की सुनिता अशीच एक फुल ग्लास आधी आणि नंतर एक हाफ ग्लास घ्यायची. पण आज एकदम अचानक? तेही हो म्हणाले...पुन्हा नव्याने ऑर्डर दिली. याक्षणी तिच्या मनावरचं औदासिन्याचं जळमट नावालाही जाणवत नव्हतं....रस पिऊन झाल्यावर दोघे एस्टीस्टँडकडे निघाले... 

“सुनिता....” बाबांची गाडी पुन्हा मूळपदावर आली “गांगल बाई म्हणत होत्या...त्यांच्या चुलत दीराचा मुलगा आहे म्हणे....निर्व्यसनी, पुण्यात स्वतःचं घर” तिने पुन्हा बाबांचा हात धरला...ते गप्प झाले. काय गं?... “बाबा ऐका ना...आपण स्पेशल कार करुन गणपतीपुळ्याला जाऊया? आईला पण खूप दिवसांत बाहेर कुठे नेलं नाहीये. तिलाही कोकण बघायचंय हो... थोडा चेंज...मी साठवलेत पैसे. होईल मॅनेज” तिच्या चेहर्‍यावर एक आगळावेगळा आनंद दिसत होता.... “हरकत नाही... पण ते गांगल बाई...” 

ती क्षणभर थांबली. बाबा पण थांबले.... “बाबा, एक सांगू? आता खरंच पुरे झालं हे सगळं. व्हायचं तेव्हा होईल लग्न किंवा होणारही नाही. आता मला खरंच काही फरक पडत नाही बाबा....आनंद हा सतत द्वैतातच का शोधायचा? कधीतरी कोणीतरी स्वतःतही अद्वैत शोधायला काय हरकत आहे? बाबा, आता यापुढे आपण चपला घासत कुठेही जायचं नाही म्हणजे नाही...आपण सोफ्यावर बसताक्षणी तो मुलगा पाच मिनिटात मोबाईलमधे डोकं खुपसून बसला? असल्या माजोरड्यांसोबत मला आयुष्य काढायचं नाही. तुम्हाला खरंच मनापासून सांगू? माझ्या नशिबात खरंच कोणी असेल तर येईलच की....आणि नसेल तरी ठीक आहे बाबा... एकट्याने आयुष्य आनंदाने जगता येतं हे आज मला कोणीतरी दाखवलंय” बाबांना नीट धड काही समजलं नाही...सुनिता लग्नाला तयार आहे पण यापुढे आपण दारोदार भटकायचं नाही हे नक्की.... त्यांच्यासाठी तेवढं पुरेसं होतं... 

उन्हं उतरली होती. एस्टीचा थांबा हळूहळू माणसांनी गजबजत होता. आज तिच्या डोक्यावरुन मणामणाचे ओझं उतरल्यासारखं झाले होते.... 

 
                                               श्री पाटील..

गुलदस्ता..!


नुकतेच मनू , माझ्या लहान मुलीचे लग्न होऊन तीन 
महिने झाले होते. . 
मी व बायको दोघेच घरी. . 
दोन हजार बारा सालातला  तो मे महीना होता. . 
मी या विश्वात याच महिन्यात प्रकटलो होतो
खरा तर हा आमचा उत्साहाचा महिना असतो. 
वाढदिवसाचे अवचित साधून आम्ही सी बीचवर जाण्याचे ठरवले.
आणि निघालो !!
जशी जशी आमची कार गगनबावड्याचा करुळ घाट उतरू लागली तसे अधिकच उत्साह जाणवू लागला.
हिरव्यागार निसर्गातुन ड्रायव्हिंग करणे  म्हणजे एनर्जीचा डोज घेतल्या सारखे वाटते . करुळ घाट उतरताना दिसणारे ते हिरव्यारंगाचे विविध छटाचे दृश्य, न्याहळताना डोळ्याचे पारणे फिटल्याचे अक्षरशः जाणवते
सगळ्याच घाटातला रस्ता नागमोडी असतो खरा , पण करूळ घाटातले  नागमोडी रस्ते वेगळाच भीतीयुक्त  आनंद देत असतात, एक थ्रिलिंग असते
एका वळणावर उंच पाहिल्यावर गगनगिरी महाराजांचा मठ दिसतो, तिथे न कळत मनांत हात जोडले जातात.
दोन तीन  वळणावर कार थांबण्यासाठी जागा केल्या मूळे
तिथे थांबून करूळ घाटाचा विस्तृत डोंगररांगा पाहता येतात
दहा अकरा वाजता तेथून जाताना   धुक्यामधून ऊन पसरलेले दिसते, त्या धुक्यातून दिसणारे अस्पष्ट डोंगर झाडी, खूप दूर वर दिसत असतात. 

भोगवेबीच वर आम्ही एक च्या दरम्यान पोहचलो
सामंत काका आमची वाट पहातच होते
त्यांच्या रिसोर्ट कडे जाताना, लांब गाडी पार्क करावी लागते  समुद्राच्या बाजूने गरम वाळूतून जाताना थोडी कसरत करावी लागते.
समुद्राकडे तोंड करून असलेल्या रूम मध्ये 
आम्ही बॅग ठेवली 
आणि पहिल्यांदा कोकणी  जेवणाचा आस्वाद घेतला,
संध्याकाळी समुद्र किनारी फेरफटका मारताना खूप आनंद वाटत होता
संध्याकाळच्या कातरवेळी त्या  लाटांकडे बघितल्यावर मनातली जळमटं पार विरून गेली.किती सुंदर होत्या त्या लाटा! एकेक लाट स्वच्छंदपणे खेळणारी , उत्साही, वेगळाच आहे हा भोगवे समुद्र किनारा.
त्या लाटांमध्ये तेवढ्याच मनमुरादपणे किनाऱ्यालगत आम्ही दोघे उभे. . . 
"वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आनंद"
कुमुदच्या गोड गळ्यातुन व्यक्त झालेली भावना ती हृदयातून आली होती
भावना तीच.....व्यक्त करण्याची अचूक  वेळ व ती हटके पद्धत मात्र वेगळी 
त्या सहजीवनातल्या व्यतीत झालेल्या जगण्यावर ती प्रेम करणारी  भावना माझ्या हृदयात स्थिरावली  आणि अश्या या वेळी  किनाऱ्यावर येणारी प्रत्येक लाट पाहताना मला अस वाटू लागलं की या लाटेनी  जणू पक्क ठरवलंय  की किनाऱ्याला भेटुनच यायचंच, कुणाचीही तमा न बाळगता.  आपलं प्रेम दर्शविणारी एकेक पांढरी लाट अन् त्यावर मावळत्या सूर्यप्रकाशाची सोनेरी किनार, ते बघताना , जरतारी पांढरे वस्त्र लेऊन ती लाट किनाऱ्याला भेटायला येते आणि
कुमुदच्या व्यक्त केलेल्या भावनेत मिसळून जाते , अश्या अनोख्या भेटी मुळे  मला माझा आजचा वाढदिवस खूप आगळा वेगळा वाटला

एकच मिनिट हं । 

कुमुद ने जपून आणलेला शिवाय स्वहस्ते केलेला केक कापून सागर किनारी वाढदिवस साजरा केला.
व्वा! किती सुंदर  . . . . !!!
रात्री रिसीर्ट वर एक वीस बावीस वर्षाचा ,हसरा तरुण भेटायला आला 
नाव काय तुझे ?

सागर  !  
उद्या सकाळी डॉल्फिन राईड करायची आहे ना, त्या साठीच भेटायला आलोय

फक्त डॉल्फिन राईड नको, कांही खास दाखवशील का?

म्हणजे ?

अरे  सुनामी बेट, शिंपली बेट ,कवडा  बेट
व  जवळपासचे सगळे पॉईंट बघून झालेत, 
थोडं कांही वेगळं दाखवशील का?

साहेब , पहाटे सव्वा पाचला तयार राहव्वा, नक्कीच कांही तरी वेगळं दाखवतो
मी फक्त त्याच्या कडे पाहून हसलो
कुमुद ने त्याला केक दिला, तो खुश झाला

पैसे किती द्यायचे?

समजून कांही पण द्या. . !

तो पैशासाठी काम करत  नव्हता,

पहाटे पाच लाच आम्ही तयार झालो
पाच दहा ला सागर ची हाक आली

साहेब sssss !!!

कांही अंतरापर्यंत आम्ही कार नी गेलो
थोडे डाव्याबाजूला चालत गेल्यावर समुद्र किनारा दिसू
लागला, सागर नी आपली बोट तयार ठेवली होती
खरतर ती फिशिंगची बोट होती, प्रवासी नव्हती

सागर, अरे   सेफ्टीजॅकेट कुठे आहेत ?

दोन मिनिट थांबा सायबानू लगेच आणतो

साधारण पाच चाळीस ला आम्ही सी राईड ला निघालो

अजून उजाडले नव्हते
समुद्र शांत होता

सायबानो तुमच्या साठी नाश्ता आणलाय बर का!
हे ठेवा।

त्यांनी आमच्या साठी घावन व खोबऱ्याची चटणी आणली होती, 

आई नी लवकर उठून  बनवलं. . 

किती प्रेमानी सांगत होता तो

व्वा ! छान, त्यांना धन्यवाद सांग

अर्ध्या तासात तो एका बेटा जवळ येऊन थांबला

हे बेट तुम्ही नक्कीच पाहिला नसणार,
कारण इथे कोणाला यायला परवानगीच नाही

आमच्या रिसोर्ट पासून आम्ही खूप लांब आलो होतो
आणि खरोखर आम्ही हे बेट पाहिले नव्हते

त्याच्या नांवेला त्यांनी नांगर केलं
व पूर्वे ला आम्ही चालत निघालो
त्या खडकाच्या बाजूने चालताना पाय घसरत होते
अजुनी पूर्ण उजाडले नव्हते
एका खडका जवळ जाऊन तो थांबला
आम्हाला त्या खडकावर त्यांनी बसवले
तो बाजूला थांबला
समोर अथांग सागर, पण शांत...!
हेलकावणार्या लाटा...!!
थंडगार वारा....!!!
जिकडे पाहिलं तिकडे नुसते पाणीच पाणी....!!!!
कांही क्षणात रंगी बेरंगी आकाश दिसू लागले
लाटांचा वेग वाढू लागला. .!
आम्ही बसलेल्या खडकावर त्या धडकू लागल्या
पूर्वेकडील क्षितिज तांबड्या,पिवळ्या,नारंगी रंगानी
सजू लागले        
आणि. . . !!!
सुर्यनारायणाच्या आगमनाची चाहूल लागली
बालसुर्यानी आपले अस्तित्व दाखवले
खूप लांबून समुद्राच्या पाण्यातुन तो उगवू लागला
तसे समुद्राच्या लाटांना वेग येऊ लागला व आम्ही
बसलेल्या खडकावर आदळून ते फेसळलेले समुद्राचे पाणी आमच्या वर पडू लागले
जस जसा सूर्य वरती वरती येऊ लगला तसे तसे त्या खडकावर आदळलेल्या लाटानवर सुर्यप्रकाश पडू लागला व ते फेसळलेले
पाणी सप्तरंगी होऊन आमच्यावर बरसू लागले
बराच वेळ आम्ही तो सप्तरंगी फवाऱ्यात मस्त खडकावर बसून 
भिजत राहिलो, अवर्णनीय आनंद मिळत राहिला,
इतक्यात सागर ची धडपड चालू झालेली दिसली
मी व कुमुद त्या खडकवरून उठलो

अरे सागर काय झाले?

साहेबानू, समोर पहा!

त्या अथांग समुद्रात बऱ्याच लांब,  एक बोट हेलकावताना दिसत होती
सागर ची नाव नांगरातून निसटून समुद्रात निघून गेली होती

साहेब तुमचे जरा ते सेफ्टीजॅकेट द्या

मी त्याला दिल्यावर 
साहेब घाबरू नका बर का
मी येतोच आपली बोट घेऊन 
असे म्हणून त्यांनी त्या बोटीच्या दिशेने उडी मारली सुद्धा...
आम्ही थक्क होऊन फक्त त्याच्या कडे पहात राहिलो
समुद्राच्या लाटावरून तो लीलया पोहत आपल्या बोटी जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता
आम्ही  त्या बोटी कडे व सागर कडे पहात खडकावर उभे होतो
काही वेळात ते दोघेही दिसेनासे झाले
मग मात्र आम्ही कांहीसे घाबरलो
पण  उसने धैर्य आणत एकमेकांना समजवत राहिलो
आठ वाजत आले होते , दोन तास आम्ही खडकावर बसून राहिलो होतो. समुद्रात उडी मारण्या अगोदर त्याचा मोबाईल
घड्याळ सगळं टाकून गेला होता तो
आम्ही रिसीर्ट मालकाला फोन करण्याचा वायफळ प्रयत्न करू लागलो , त्या बेटा वर रेंजच नव्हती
कुमुदने आणलेला कालचा केक व त्यांनी दिलेला नाष्टा व आणलेला कांही खाऊ आम्ही  तश्या भीतीयुक्त वातावरणात फस्त केला, 
आता नऊ वाजत आले होते
आमचा कोणाशीच संपर्क होत नव्हता
चार तास झाले तरी सागरचा कांहीच पत्ता नव्हता
नको नको ते विचार येत होते
पण व्यक्त कसे करायचे असे एकमेकांना वाटू लागले
आताआम्ही ज्या खडकाजवळ थांबलो होतो तिथे समुद्राने आपले अस्तित्व विस्तारले होते 
प्रत्येक लाटे बरोबर खेकडे येऊ लागले होते 
कांही मिनिटात खूप खेकडे आजूबाजूला जमा झाले
आम्हाला भीती वाटू लागल्याने
त्या बेटाच्या वरच्या भागात जाण्या साठी रस्ता शोधू लागलो
एका ठिकाणी पाय वाट दिसली, एकएकटे जाऊ शकत होतो.
पायवाटेने जाताना बऱ्याचदा काट्याची झाडे हाताला लागत होती, रस्ता वळणाचा होता त्या मुळे पुढे काय असेल याचा अंदाज येत नव्हता, पुढे कुमुद होती व ती चालत असल्याने मला तिच्या मागे जावेच लागत होते
वाऱ्याने पाने सळसळली तरी एक अनामिक भीतीची लकेर
उठायची 
जरी छोटे बेट वाटत असले तरी आता खूप चालतोय असे वाटू लागले होते
चालता चालता कुमुद एकदम थांबली
त्या बेटा वरती छोटेशे पठार होते
एक बऱ्यापैकी उंच झाडा भोवती स्वच्छ केलेली जागा दिसली
ती शेणाने सारवल्या सारखी दिसत होती, व एक कोपऱ्यात
नुकतीच लावलेली उदबत्ती होती,तिचा सुगंधी वास पसरला होता
स्वच्छ जागा व उदबत्ती लावलेली दिसल्या मुळे नक्कीच
कोणीतरी असावे म्हणून हाका मारल्या
पण कोणीच प्रतिसाद दिला नाही
पुन्हा एक अनामिक भीती मनांत उदभवली,
आम्ही दोघे ही तिथे खालती बसलो
थोड्याश्या विश्रांती नंतर आम्ही नकळत  तिथे बसून गुरुगीता म्हणू लागलो, गुरुगीता झाली आरती म्हंटली आणि जयजयकार केला,  थोडे धैर्य आले

आता अकरा वाजत आले होते
सागर चा तरी पत्ता नव्हताच तो म्हणाला होता या बेटा वर यायला परवानगी नाही म्हणून
म्हणजे आता कोणच  इथे आले नाही तर....!!!
पुन्हा गुरुदेवांना नमस्कार केला व विनवणी केली
आम्हाला आमच्या जागेवर सुखरूप पोहचवा
तेव्हड्यात तिथे मोबाईल वाजू लागला
रिसोर्ट मधून फोन होता
आम्ही थोडक्यात सर्व सांगितले
कांही वेळात दुसरी बोट आली  आणि आम्ही रिझोर्ट वर सुखरूप पोहचलो
रिसोर्टच्या मालकांनी विचारले

कसे काय गेलात त्या बेटावर?  सागर पण वेडा मुलगा आहे

सागर कसा आहे, कुठे आहे तो

अहो तो अजून सापडला नाही  त्याच्या शोधत गेलेत आठ दहा बोटी.
काळजात चर्र झाले

तीन वाजता आम्ही त्याच्या घरी गेलो
त्याची आई दारातच बसली होती
आतून सागरचा आवाज आला
साहेबानू  आत या की
घाबरला नाही ना? 
सागर तू केंव्हा आलास
आत्ताच, अर्धा तास झाला
अहो बोट खुप लांब चालली होती
मध्येच एका डॉल्फिन चुकून बोटीत पडला
ते पाहून तीनचार डॉल्फिन ने बोट अडवली
मी तीन चार तास समुद्रात पोहून दमलो होतो
बोट काय हाताला लागत नव्हती
पण डॉल्फिन ने अडवल्या मुळे मला बोटी जवळ जाता आले
मी बोटीत जाऊन त्या अडकलेल्या डॉल्फिन ला बाहेर काढले
मग कांही केल्या बोट चालू  होईना
पोहून दमल्या मुळे वल्हवता पण येईना
लांबून बोट जात होत्या
त्यांना इशारा करत होतो
एकच्या दरम्यान आठ दहा बोटी एकदम आल्या
त्यांच्या मदतीने परत आलो
आता तुमच्या कडेच  येणार होतो
कांहीच झाले नसल्या सारखे तो बोलत होता,
आम्ही रिसोर्ट वर आलो
असा आगळा वेगळा वाढदिवस साजरा झाल्याने आम्ही दोघांनी गुलदस्त्यातच ठेवण्याचे ठरवले  कारण जावई व मुली न कडून ओरडा खायचा नव्हता, खूप फिरायचे होते

पण अजून पर्यंत त्या बेटावर त्या वेळी कोणी उदबत्ती लावून गेली होती ते मात्र कळत नव्हते..


                                                    श्री पाटील..


टाईमपास..!


जोशीकाका पुणे महानगरपालिकेतून निवृत्त झाले त्याला चार पाच वर्षे होऊन गेली होती. काकांना ना चित्रपटांची आवड ना टीव्हीवरच्या मालिकांची. त्यामुळे निवृत्तीनंतर ते टाईमपास कसा करतात हा त्यांच्या मित्राला पडलेला यक्षप्रश्न.

"जोशा, लेका तुला ना काही छंद , ना वाचनाची आवड, ना अध्यात्माची. रिटायर झाल्यावर टाईमपास तरी कसा करतोस तू ?"

जोशी काकांना आपल्या मित्राच्या भोचकपणाची आणि नसत्या चौकशा करण्याच्या वृत्तीची चांगली कल्पना होती. त्याच्या डोक्यात एकदा हा कीडा वळवळला आहे म्हणजे त्या शंकेचं निरसन होईस्तोवर तो आपल्याला काही सुखाने जगू देणार नाही हेही त्यांना ठाऊक होतं. 

"तुला कालचीच गोष्ट सांगतो," काकांनी शंकासमाधानाला सुरुवात केली. "मी आणि बायको गेलो होतो पु ना गाडगीळमध्ये. पाचच मिनिटे दुकानात डोकावलो. बाहेर येऊन बघतो, तर दुकानासमोर पार्क केलेल्या गाडीशी ट्रॅफिक पोलीस येऊन ऊभा - हातात पावतीपुस्तक.

आम्ही दोघेही कावरेबावरे होत त्याच्याकडे गेलो आणि अजीजीने त्याला सांगू लागलो - "बाबा रे, मोजून पाचच मिनिटे गेलो होतो रे. एक वेळ सोडून दे." 

तशी तो म्हणू लागला, "सगळेजण दर वेळी असंच म्हणतात. आपली चूक कबूल कोणीच करत नाही. हजार रुपयांची पावती फाडावी लागेल. एकदा पावती फाडली म्हणजे पुढच्या वेळी चूक होणार नाही."

"तसे नाही, आमची चूक समजली आम्हाला. पुन्हा नाही होणार असं. आणि हजार रुपये म्हणजे फार होतात हो. आम्ही निवृत्त कर्मचारी आहोत हो. आमच्या पांढऱ्या केसांकडे तरी बघा."

"लाखांच्या गाड्या फिरवता, पु ना गाडगीळमध्ये खरेद्या करता,  कायदा मोडता आणि तुम्हाला हजार रुपये जड होतात होय ? बरं चला, तुम्ही वयस्कर आहात, म्हणून तुमच्याकडून फक्त दोनशे रुपये घेतो आणि देतो सोडून तुम्हाला या वेळी."

" 'त्या दोनशे रुपयांची पावती मिळेल ना ?' माझा निरागस प्रश्न" - जोशी काका सांगत होते. तशी वस्सकन अंगावरच आला तो हवालदार. 

"ओ, पावती हवी असेल तर हजारचीच होईल हो. दोनशेची काही पावती बिवती मिळणार नाही."

"असं कसं ? पैसे दिल्यावर पावती नको ? सगळं कसं नियमानुसार व्हायला नको का ?  सरळ सांग ना, तुला लाच खायची आहे म्हणून."

माझ्या या बोलण्याने तो एकदम भडकलाच. आणि मग माझंच वाक्य धरून बसला. 

"अस्सं म्हणताय काय ? सगळं नियमानुसार व्हायला पाहिजेल काय ? मग होऊनच जाऊ दे. मी म्हटलं म्हातारी माणसं आहेत, जरा सबुरीने घेऊ, तर तुम्ही मलाच अक्कल आणि कायदे शिकवताय ! चला, सगळे नियमच काढतो तुमचे आता." हवालदाराने रौद्र रूप धारण केले.

आणि मग तो हात धुऊन गाडीच्या मागे लागला. एक आरसाच तुटलेला आहे, मागची नंबर प्लेटच नीट नाहीये, PUC संपलेलं आहे - तीन चार हजार रुपयांपर्यंत मामला गेला.

हे फारच वाढतंय म्हटल्यावर मी बायकोला म्हटलं - तू सांगून बघ, तुझं ऐकतोय का तो ते.

ती त्याला म्हणाली, "अरे बाळा, तू असं रागावू नकोस. हे काय बोलले ते मनाला लावून घेऊ नकोस. सोडून दे. त्यांच्याकडे लक्ष नको देऊस तू. हे घे दोनशे रुपये."

पण आता तो हवालदार काही ऐकण्याच्या पलीकडे गेला होता. 

"नको मला तुमचे ते दोनशे रुपये. आता पावतीच फाडणार मी."

मग पुढे पाच दहा मिनिटे हे असंच चाललं, ती त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होती आणि दुखावला गेलेला तो, पावत्या फाडल्याशिवाय थांबणार नव्हता." जोशी काका सांगत होते.

"अरे बाप रे ! दोनशे रुपये वाचवायला गेलास आणि हे भलतंच होऊन बसलं. मग काय केलं काय तुम्ही शेवटी ?" - मित्राची पृच्छा.

"मग काही नाही, आमची बस आली, आम्ही त्यात चढलो आणि घरी आलो." 

"आं ? मग गाडी ? तिच्या पावत्या ? दंड ? आणि तो हवालदार ?" मित्राला काहीच उमगेना.

"काय संबंध ? ती गाडी आमची नव्हतीच रे. आम्ही तर बसने आलेलो.

तू मला विचारलंस - मी टाईमपास कसा करतो, ते मी तुला सांगत होतो.

आम्ही बसमध्ये चढलो तेव्हा त्या हवालदाराच्या तोंडावरचे भाव मात्र पहाण्यासारखे होते - आत्ता तुझ्या चेहऱ्यावर आहेत ना, तसेच होते अगदी !"

जोशी काका निर्विकारपणे म्हणाले आणि आणखी टाईमपास करायला नवीन गिऱ्हाईक शोधू लागले..


                                                      श्री पाटील..